🌟महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री आजपासून.....!


🌟बचत गटांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले🌟

परभणी (दि.26 फेब्रुवारी) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत 8 लोकसंचलित संधन केंद्रामार्फत स्वयं सहय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू व मालाचे प्रदर्शन व विक्री उद्या मंगळवार, (दि. 27)पासून परभणी क्लब परभणी (सिटी क्लब) स्टेशन रोड, परभणी येथे ठिक 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत-जास्त महिला बचत गटांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गिता गुट्टे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, नाबार्डचे सहा.महाप्रबंधक एस.के. नवसारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय  कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी  राहुल गीते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एन. बी. आघाव, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अनंत चौधरी, आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण आदि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  विविध मान्यवराच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन व महिला स्वयंसहायता बचत गटाचे बँक कर्ज धनादेश वितरण व उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी विविध शासकीय योजनाची माहिती, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळांचे  आयोजन करण्यात आले आहेत.  दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शनात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य व पोषण विषयी जनजागृती कार्यक्रम, होममिनिस्टर, महिलांच्या स्पर्धा इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 01 मार्च 2024 रोजी प्रदर्शनात नव उद्योजक महिलांचे मनोगत, सन्मान पत्र वाटप व पुरस्कार वितरण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे .

या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे डाळी, अस्सल गावरान मसाले, पापड, लोणची, ज्वेलरी, पनीर, लोणी, दही, तूप, पाणीपुरी, भेळ, चाट भांडार, तृणधान्य, साड्या, महिलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, मातीची भांडी, लाकडी वस्तू, सेंद्रिय खाद्यपदार्थ व फळे भाजीपाला, बेकरीचे पदार्थ, उदबत्ती, मेणबत्ती  रेडीमेट गारमेंट तसेच  इतर उत्पादने  विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या