🌟महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलाकारांचा लोककला व संस्कृतीचा अनोखा अविष्कार....!


🌟महोत्सवात बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा युवक मंडळाने वासुदेव हा पारंपरिक लोककलाप्रकार सादर केला🌟


परभणी : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, परभणी  यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णू जिनिंग मिल, वसमत रोड, परभणी येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी  स्थानिक कलाकारांनी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचा अनोख्या अविष्काराचे सादरीकरण केले.महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न राज्य असून, आपल्या ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट हे विविध लोककलेची संपन्नता जोपासत आहेत.


महाराष्ट्रातील याच लोककला व संस्कृती जोपासण्यासाठी तसेच स्थानीक लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी परभणी येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांनी वासुदेव, लोकनाट्य, पोतराज व गारुडी, वाघ्या - मुरळी, धनगर गीत, कोळी नृत्य, करपल्लवी, मसनजोगी, बहुरूपी, पोवाडा, गोंधळ, जागरण या पारंपारिक दुर्मिळ या लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे आज बहारदार सादरीकरण केले. 

महोत्सवात बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा युवक मंडळाने वासुदेव हा पारंपरिक लोककलाप्रकार सादर केला. तर राजीव गांधी युवा फोरम संचाने जलयुक्त शिवार अभियानावर पथनाट्य सादर केले. क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट यांनी पोतराज व गारुडी कलाप्रकार सादर केले. प्रियभूषण डान्स ॲकेडमी संचाने बाल कलाकारांनी पंढरपूर दिंडीवर आधारित गीतावर नृत्य सादर केले. 

शिवाजी व सुनील सूक्ते यांच्या संबळ व ढोलकीच्या बहारदार जुगलबंदीने प्रेक्षकांची मने जिंकली. अभिषेक नांदुरे आणि श्री बोराडे यांनी धनगर गीत सादर केले. तर शुभम म्हस्के प्रीती भालेराव यांनी गीत सादर केली. मधुकर कांबळे यांनी समई नृत्य तर नागवंशी प्रतिष्ठाण संचाने कोळी नृत्य सादर केले. रामदास कदम व संचाने करपल्लवी आणि क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या लोककलावंतानी मसनजोगी आणि बहुरूपी लोककलाप्रकार सादर केले.

आजच्या महोत्सवात अभिनेते संदीप पाठक यांची उपस्थिती मुख्य आकर्षण होते. यावेळी संदीप पाठक यांनी परभणी जिल्ह्याशी असलेले नाते उलगडत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालय लंडन या लोकप्रिय नाटकातील काही प्रसंगाचे सादरीकरण केले. त्यास परभणीकरानी प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला.यावेळी नाट्यकर्मी किशोर पुराणिक यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमेश शहाणे या युवकास हार्मोनियम वादनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्याचा जिल्हा प्रशसनाच्यावतीने सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या