🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ घेण्यात यावी......!


🌟सामाजिक कार्यकर्ते स.जगदीपसिंघ नंबरदार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले स्मरणपत्र🌟

नांदेड (दि.१३ फेब्रुवारी) - नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य शासनाला पंधरा दिवसाचे आत निवडणूक प्रक्रिया सुरू न केल्यास परिणामी न्यायालयात खटला चालविण्यात येईल असा इशारा उच्च न्यायालयाने दिल्यानेच शासनाने गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीचा विषय प्रलंबित ठेवण्यासाठी नवा कायदा अस्तित्वात आणल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदीपसिंग नंबरदार यांनी केला असून तात्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे आज मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी एका स्मरणपत्राद्वारे केली आहे.

        गुरुद्वारा बोर्ड निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये अवमान याचिका क्रमांक 511/2023 वर सुनावणी चालू आहे. न्यायालयाने दि. 18 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाला निवडणूक प्रक्रिया सुरू करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला होता. परंतु राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया प्रलंबित ठेवून घाईगडबडीने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे.त्यास नांदेड जिल्ह्यासह देशभरातून विरोध होत आहे तसेच न्यायालयीन खटला प्रलंबित असताना राज्य शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे याचिकाकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी म्हटले आहे.

       महसूल व वन विभागाचे मुख्य सचिव यांना नंबरदार यांनी निवेदनाद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पालन करीत नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ निवडणूक घेण्याचे आदेश देण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी रोजी स्मरणपत्र दिले असून अन्यथा यासंदर्भात पुन्हा न्यायालयाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा दिला आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या