🌟परभणी तालुक्यातील सोन्न्यात भगरईतून विषबाधा : घटनेतील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर....!


🌟विषबाधा प्रकरणात पाचशेवर ग्रामस्थ हैराण :40 बालकांचा समावेश🌟

परभणी (दि.07 फेब्रुवारी) :  परभणी तालुक्यातील सोन्ना या गावी आयोजित केलेल्या सप्ताहा दरम्यान मंगळवारी रात्री एकादशीनिमित्त भगर खाल्लेल्या सुमारे पाचशेवर ग्रामस्थांना विषबाधा झाली. परंतु, आरोग्य विभागासह अन्य यंत्रणांनी मोठी सतर्कता दाखवून या ग्रामस्थांना तात्काळ सरकारी व खाजगी रुग्णालयात हलवून युध्दपातळीवर उपचार सुरु केले. दरम्यान, बालकांसह अबालवृध्द व महिला व पुरुष रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

           सोन्ना या गावातील ग्रामस्थांनी एकादशीचे औचित्य साधून भगर व आमटीचा बेत केला होता. मंगळवारी रात्री जवळपास साडेपाचशेवर ग्रामस्थांनी फराळाचा आस्वाद घेतला. परंतु, रात्री उशीरा यातील काही ग्रामस्थांनी अस्वस्थ वाटू लागल्याने प्रचंड धावपळ करीत परभणी गाठले. एका पाठोपाठ एक या तक्रारी घेवून जिल्हा शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल होवू लागले तेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ युध्द पातळीवर यंत्रणा हलवली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंदसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र गिते, जिल्हा शल्य चिकत्सक नागेश लखमावार आदींनी तात्काळ बेड, पुरेशी औषधी तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची टीम तैनात केली. एका पथकाने सोन्ना गाठून त्याच ठिकाणी उपचार सुरु केले. रात्री उशीरापर्यंत जिल्हा रुग्णालयात 229 रुग्ण दाखल झाले होते. तर खाजगी रुग्णालयात जवळपास सव्वाशेवर रुग्ण दाखल झाले होते. जिल्हा रुग्णालयात रुग्णांपैकी 30-40 बालकांचा व जवळपास दीडशेवर वृध्द पुरुष-महिला रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांना योग्य तो उपचार सुरु आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या