🌟ऋतुराज वसंत आरंभ विशेष : वसंतोत्सव: ऋतुनां कुसुमाकर...!


🌟वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे निसर्ग एरवीही सुंदर असतोच पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते🌟

निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. नेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणार्‍या देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. सहाजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहिल. निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित लेख आपल्या मनात आनंदासह ज्ञानात नक्कीच वसंतबहार आणेल... संपादक.

        वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत "ऋतूनां कुसुमाकरः" असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत. निसर्ग सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. वसंत असो वा वर्षा वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरच पृथ्वीवरून हात फिरवत असतो. आणि त्याच्या या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते.


     पाऊस नसतानाही सृष्टीला नवपालवी फोडण्याची ईश्वरी किमया वसंतातच साकार होते. म्हणूनच हा वसंत ज्याच्या अंगी भिनला आहे, त्याचे आयुष्य कधीही निराशेने ग्रासले जात नाही. त्याच्या जीवनात कायम वसंत नांदत असतो. भक्ती व शक्तीच्या सुंदर सहयोगातून त्याची जीवनदृष्टीही बदलून जाते. जगणे हेच एखाद्या गाण्यासारखे त्याला वाटू लागते. जीवनातील दुःखांकडे पाहण्याची त्याची दृष्टीच विधायक बनते. महापुरूषांच्या आयुष्यात आशेलाच सिद्दीत परावर्तित करणार्‍या साधनेचे मोठे महत्त्व आहे. असे लोक कल्पनांच्या राज्यात भरार्‍या मारणारेच नसतात, त्याचप्रमाणे रोजच्या धावपळीच्या जीवनात रसिकतेला स्थान नाही, असे म्हणणारे अरसिकही नसतात. जीवनात वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो. जीवनात प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाईल. जीवनात वसंत येईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. ईश्वराच्या स्पर्श झाल्यानंतर आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. सर्व सृष्टी चेतनामय वाटू लागते. सृष्टीचे सौंदर्य चाखण्यासाठी दोन डोळेही कमी पडतात, असे वाटते. कदाचित म्हणूनच की काय या काळात विवाह समारंभ होतात आणि विवाह करून आणखी दोन डोळ्यांच्या सहाय्याने आपण या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत असतो. सृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येते तिथून निराशा, निष्क्रियता, नीरसता हद्दपार होते. निसर्गाच्या सौंदर्यात व मानवी रसिकतेत ईश्वराचा स्वर न मिसळल्यास मानवी रसिकता विलासी जीवनाचा मार्ग पकडते आणि विनाशाच्या गर्तेत घेऊन जाते. म्हणूनच वसंताच्या संगीतात गीतेचा स्वर मिळायला हवा.

        वसंतोत्सव अमर आशावादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. शिशिरातल्या पानगळीप्रमाणे निराशाही त्याच्या आयुष्यातून गळून जाते. निराशेने ग्रासलेल्या आयुष्यासाठी वसंत हा आशेचा किरण असतो. यौवन आणि संयम, संकल्प आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन आणि विसर्जन या सगळ्यांचे समन्वय साधणारा आणि जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह निर्माण करणारा वसंत आपल्या जीवनात आला, त्याचवेळी आपण वसंताला पाहिले, अनुभवले आणि आपल्यात रिचवले असे म्हणता येईल.

!! ऋतुराज वसंत आगमनाच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

    - संकलन व सुलेखन - 

श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                      रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                      फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.


                           

                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या