🌟शिवजयंती उत्सव सप्ताह विशेष : छत्रपती शिवाजी महाराज : महाराष्ट्र इतिहासच्या मुखपृष्ठावर कायम....!


🌟सन २००१ सालापासून १९ फेब्रुवारी या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते🌟

महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारताचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवरायांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. शिवाजीरिजे आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांचा संयुक्त नामोल्लेख शिवशंभू असा होतो. सर्वसाधारणपणे इतिहासकार शिवाजी महाराजांचा जन्म- १६३० ते औरंगजेबाचा मृत्यू- १७०७ या ७७ वर्षांच्या काळास शिवकाल असे म्हणतात. शिव छत्रपतींबद्दल पुरेपूर माहिती लिहिण्याची आपली काय औकात? असे म्हणत श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार यांनी शब्दबद्ध केलेले काही प्रसंगच वाचकांच्या सेवेत... संपादक.

       शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात 'शिवजयंती' म्हणतात. ती राज्यभर एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. त्यांच्या जन्म दिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा तरी साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सन २००१ सालापासून १९ फेब्रुवारी या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले, जे शिवराय म्हणूनही जगविख्यात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे कोणतेही पुस्तक पाहिले तर मुखपृष्ठ हे छत्रपती शिवाजी महाराजांचेच दिसेल. कारण ते येथील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्य यांच्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य महाराजांनी उभे केले आणि इ.स.१६७४मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल-इतिहासाचे ज्ञाते, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्चीकरणात नेमके हल्ले, यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे हाताळले होते. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर त्यांनी उभे केले. किनारे आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले होते.

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर दि.१९ फेब्रुवारी १६३० रोजी छ.शिवाजी महाराजांचा जन्म झाला.  इतिहासाच्या अभ्यासांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ अर्थात शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७- वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला माता जिजाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा, अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. त्यांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली होती. आई जिजाई छोट्या शिवबासह पुण्यात रहायला गेल्या. त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवराय व कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि त्यानंतरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजामातेनी खंबीर मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला त्यांना जिजाऊंनी स्फूर्ती दिली, असे काही इतिहासकार सांगतात. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजी राजांकडून दप्तर व न्यायव्यवस्थेचे शिक्षण, परकीय सत्तेविरूद्ध लढा देण्यात आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण माता जिजाऊकडून मिळाले, असे उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाऊंनी शिवबांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड आदींच्या माध्यमातून त्यांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. 

     शिवरायांची राजमुद्रा: छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती अशी- "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!" त्याचा मराठी अर्थ- "ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो. तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल!"

     पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली, की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी. खिंडीतील लढाई ते स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले, असा संदेश मिळेल. बाजीप्रभु देशपांडे- यांनी वचन दिले, की जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत, तोपर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमध्येच झुंजवत ठेवतील. महाराजांना ते पटेना, पण बाजीप्रभूच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केली. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे त्यांनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, मात्र बाजीप्रभूंचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजीप्रभूंनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव त्यांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड होती.

     मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार करणे, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवरायांच्या लाल महालातच तळ ठोकला. महाराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा! लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री जवळूनच जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत त्यांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली. तेवढ्यातच त्यांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची हाताची तीन बोटे कापली गेली. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवराय किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये ते घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स.१६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

     शिवछत्रपतींच्या अशा अनेकानेक पराक्रमी व विजयी घोडदौडी झाल्या. त्यानंतर प्रदीर्घ आजारपणामुळे छ.शिवाजी महाराजांचा मृत्यू दि.३ एप्रिल १६८० रोजी रायगड येथे झाला, असे सांगितले जाते.

!! शिवजयंती निमित्ताने शिव छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्वांना प्रेरणादायी शिवमय हार्दिक शुभेच्छा!!

      - संकलन व सुलेखन -

                          श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.                        

                          मु. पो. ता.  जि. गडचिरोली

                          फक्त व्हॉट्सॲप. नं. ९४२३७१४८८३.                         

                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या