🌟'परभणी ग्रंथोत्सव 2023'चे उत्साहात उद्घाटन’अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन.....!


🌟ग्रंथाच्या माध्यमातूनच माणूस म्हणून विकसित होणे शक्य : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे🌟


🌟ग्रंथोत्सवामुळे ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी (दि.23 फेब्रुवारी) : पुस्तके आपले आयुष्य बदलण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून पुस्तकासारखा श्रेष्ठ मित्र या जीवनात दुसरा कोणीही नाही. आपल्याला जीवनामध्ये माणूस म्हणून विकसित व्हायचे असेल तर ते ग्रंथालयाच्या आणि ग्रंथाच्या माध्यमातूनच ते शक्य असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांनी केले. 


तर ग्रंथोत्सवामुळे विद्यार्थी आणि वाचकांमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल. त्यामुळे वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथोत्सवाची मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय व ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे आयोजित दोन दिवसीय 'परभणी ग्रंथोत्सव 2023' चे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ. ढोक, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, प्रकाशन प्रतिनिधी केशव बा. वसेकर, प्राचार्य रामेश्वर पवार, मुख्याध्यापक श्री. गोंगे उपस्थित होते. 


यावेळी श्री. लोमटे म्हणाले की, अनेक पुस्तकांनी आपणाला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिलेली असते. पुस्तके आपल्याला जीवनाची एक दिशा देतात. भावी पिढीला उपदेश हा सांगण्यातून न देता तो कृतीशिल अशा संस्कारातून दिला पाहिजे. या जगातील कोणतेही तंत्रज्ञान वाईट नाही, परंतू त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायाचा याचा विवेक आपल्याकडे असणे आवश्यक आहे.  जगातील मोठ्या व्यक्तीनींही पुस्तकातून ज्ञान मिळविले आहे.

वाचनाचे महत्व पटवून देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंह यांचे पुस्तकावर असलेले प्रेम यावेळी त्यांनी सांगितले. आजच्या दैनंदिन जीवनात आपले वाचन खुप कमी झाले असून, आपण मोबाईलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. त्यामुळे आपल्याला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आपल्या जिल्ह्यात शतकांची परंपरा असलेली ग्रंथालये उपलब्ध असून, त्यांचा परभणीकरांनी लाभ घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले. आपल्याला दुसऱ्या देशात जायचे असेल तर पासपोर्टची गरज लागते, पुस्तके हि आपल्या पासपोर्टचे काम करतात. कारण ती आपल्याला दुसऱ्या जगात घेऊन जात असल्याचेही ते म्हणाले. 

मोबाईल आपला शत्रू नसून, ती आजच्या युगातील गरज आहे. फक्त त्याचा योग्य वापर करणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येकाने दररोजच्या जीवनात दिवसाला किमान एक-दोन पान वाचन करणे आवश्यक आहे. ग्रंथ हेच आपले गुरु आहे. जे वाचन करतात ते आज प्रशासनात मोठ्या अधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. समाजात वाचन चळवळ वाढावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रुघुनाथ गावडे यांनी यावेळी केले आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, आजच्या युगात वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी होत चालली असून, वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक आहे. पुस्तकासारखा दुसरा कोणताही मित्र या जगात उपलब्ध होणार नाही. आपल्या देशाला खूप मोठा इतिहास लाभलेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुस्तक वाचनाविषयी त्यांनी आपले अनुभव यावेळी  सांगितले. 

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धींगत करणे हा  ग्रंथोत्सव आयोजनामागचा हेतू आहे. नव्या पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रंथांकडे वळविणे आवश्यक आहे. ग्रंथ जीवनाचे अविभाज्य अंग असून सर्वांनी अवांतर वाचन करावे, असे आवाहन सहायक ग्रंथालय संचालक श्री.हुसे यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ढोक यांनी केले, कल्याण वसेकर यांनी आभार मानले.  ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनांचे उद्घाटन ‘परभणी ग्रंथोत्सव 2023’ निमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनी व विक्री दालनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या  प्रकाशनांच्या दालनांमध्ये विविध विषयांवरील ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध असून, उद्या शनिवार सायंकाळपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल,  वाचन प्रेमी तसेच केंद्रीय विद्यालय, श्री. छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी राजगोपालचारी उद्यान परिसरात ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले. ग्रंथदिंडीला श्री. छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही दिंडी राजगोपालचारी उद्यान ते जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात पोहचली....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या