🌟‘परभणी ग्रंथोत्सव-2023’ चे शुक्रवारी उद्घाटन : राजगोपालचारी उद्यान येथून सकाळी ग्रंथदिंडी.....!


🌟परिसंवाद,कवी संमेलन,काव्यवाचन, कथा-कथनाचे आयोजन🌟

परभणी दि.22 फेब्रुवारी) : महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने जिल्हा ग्रंथालय कार्यालय, वसमत रोड येथे शुक्रवारपासून (दि. 23)  दोन दिवसीय ‘परभणी ग्रंथोत्सव 2023’चे आयोजन करण्यात आले आहे.


शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजता अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथदिंडी राजगोपालचारी उद्यान ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय दरम्यान होणार आहे.  तर सकाळी अकरा वाजता साहित्या अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांच्या हस्ते ‘परभणी ग्रंथोत्सव-2023’ चे उद्घाटन होणार आहे. यावेळी  प्रमुख अतिथी म्हणुन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा पालकमंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीमती फौजिया खान, खासदार संजय जाधव, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांची प्रमतुख उपस्थिती राहणार आहे. तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर  आणि सहाय्यक ग्रंथालय संचालक सु.सं. हुसे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.


सोमवारी दुपारी तीन वाजता ‘कवि-संमेलन’ आयोजित करण्यात आले असून कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवि तुकाराम खिल्लारे असतील तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरविंद सगर करतील. तर प्रसिद्ध कवी रेणु पाचपोर, आत्माराम जाधव, केशव खटींग, हनुमान व्हरगुळे, शिवाजी मरगीळ, डॉ. अशोक पाठक, अर्चना डावरे, अनुराधा वायकोस, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, मधुरा उमरीकर, मुरलीधर रणखांब, संतोष नारायणकर, मनिषा आंधळे, रवी कात्नेश्वरकर, राम सोळंके, यशवंत पाटील,  राम कटारे, महेश देशमुख, माधव गव्हाणे, आत्माराम कुटे, मारोती डोईफोडे, पल्लवी देशपांडे, डिगंबर रोकडे, सदाशिव वसेकर, श्यामसुंदर धोंडगे, यशवंत मकरंद, आत्तम गेंदे, प्रेमानंद बनसोडे, राही कदम, अविनाश कासांडे, अमोल देशमुख, प्रणिता रायखलेकर, अविनाश खोकले, महेश कोरडे हे प्रसिद्ध कवींच्या कविता ऐकायला मिळतील. 

ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवार (दि. 24) सकाळी साडेदहा वाजता ‘विद्यार्थी व्यक्तीमत्व जडण-घडणीमध्ये वाचनाचे महत्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाणे असतील तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बा.शं. देवणे करतील. तर शिक्षणाधिकारी (प्रा.) गणेश शिंदे, माणिक पुरी  आणि दिलीप श्रृंगारपुतळे यामध्ये आपले विचार मांडणार आहेत. तसेच ‘रयतेचे राजे : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ या विषयावरील परिसंवादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आत्माराम शिंदे असतील तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण वसेकर करतील. तर सुभाष ढगे आणि डॉ. भिमराव खाडे हे आपले विचार मांडतील. दुसरे  सत्र दुपारी अडीच वाजता कथा-कथनाने सुरु होईल. अध्यक्षस्थानी सरोजताई देशपांडे असतील तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बा.बा.कोटंबे करतील. तर कथा-कथनामध्ये राम निकम, बबनराव आव्हाड आणि राजेंद्र गहाळ सहभागी होतील.

सायंकाळी चार वाजता समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर कोषागार अधिकारी निलकंठ पाचंगे असतील. ग्रंथमित्र प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्राचार्य राहुल नितनवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, भास्कर पिंपळकर  या मान्यवरांच्या हस्ते परभणी ग्रंथोत्सवाला सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.ग्रंथोत्सवातील ग्रंथप्रदर्शन व विक्री दोन्ही दिवस सकाळी दहा वाजेपासून सुरु राहील. जास्तीत-जास्त वाचक, साहित्यप्रेमी नागरिकांनी या ग्रंथोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष सहाय्यक ग्रंथालय संचालक सु.सं.हुसे, सदस्य शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर, म.सा.प. परभणीचे अध्यक्ष भगवान काळे, प्रकाशन प्रतिनिधी केशव बा. वसेकर आणि सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ. ढोक यांनी केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या