🌟विश्व पतंग महोत्सव विशेष : कोणीतरी पतंगालाच पायबंद घाला होऽऽऽ...!!


🌟पतंगांमुळे घडतात अंगाचा थरकाप उडविणाऱ्या अनेक घटना🌟

     आशा-आकांक्षांचे पंख लेवून आकाशात स्वैर विहार करणारा पतंग पाहून अनेक जण प्रफुल्लित होतात. आपल्या हाती असलेल्या दोऱ्याला जोडलेला पतंग आकाशात डोलतोय याचे अप्रूप पतंग उडवणाऱ्याला तर असतेच, पण त्याला साथ देणाऱ्या आणि पाहणाऱ्यांनाही आनंदी करणारा तो क्षण असतो. जगात कुठेही अत्यंत कमी किमतीत मिळणारे हे हलके खेळणे अनेक अर्थांनी जीवनाचे तत्त्वज्ञानही सांगते. आकाशात झेपावतानाही आपले पाय जमिनीवर आहेत, हे विसरता कामा नये. मातीशी, मूळ तत्त्वांशी असलेली नाळ तुटली की आपण कोणत्याही क्षणी जमिनीवर येऊ शकतो. आकाशात झेप घेणे हे काही एका झटक्यात होणारे काम नाही, त्यासाठीही अनेक प्रयत्न करावे लागतात. एकदा आकाशात गेल्यावर अर्थात यशस्वी झाल्यावर आपल्याला काही धोका नाही, या भावनेने गाफील राहू नये, आपण कधीही काटाकाटीचे बळी ठरू शकतो, हे तत्त्वज्ञानही पतंगबाजी शिकवते. जमिनीवरून हळूहळू आकाशाकडे झेप घेतली तरच त्याचा अथांगपणा लक्षात येतो, ही शिकवणही पतंग देतो. भारतीय आणि जगातील काही देशांच्या संस्कृतीत पतंगबाजीला विशेष महत्त्व आहे. हिवाळ्यातच पतंग उडवण्याचे आणखी एक कारण म्हणजे सकाळपासून थंडीत काकडणाऱ्या बच्चे कंपनीला तसेच मोठ्यांनाही गच्चीवर किंवा खुल्या मैदानात सूर्याची नैसर्गिक ऊब मिळते. एकूणच सकारात्मक तत्त्वज्ञान शिकवणारा, कुटुंबीयांना, मित्र-मंडळींना आनंद देणारा हा खेळ जेव्हा स्पर्धेची रंगत घेताना मर्यादा ओलांडतो, तेव्हा मात्र त्यातील नकारात्मकता अधिक जिव्हारी लागते. पूर्वी साधा दोरा किंवा अतिधारदार नसलेला मांजा वापरून पतंग उडवणे, काटाकाटी खेळणे, कटलेला पतंग पकडण्यास धावणे, असे चालत असे. आजही याप्रकारे पतंग खेळले तर ते ठीकच राहिल. परंतु या स्पर्धेसाठी आज नायलॉन धागा, प्लास्टिक, काच, धातूचा चुरा आणि विविध रसायने लावलेला धोकादायक मांजा वापरणे, हे अनेकांच्या जिवावर बेतणारे ठरते. पूर्वी मुले मांजा घरी घोटून तयार करत, ते तसे कमकुवतच असे. मात्र आजघटकेला मांजा दुकानातूनच चांगला मजबूत असा रेडिमेट मिळू लागला आहे. या अनुषंगाने संक्रांतीच्या पहिल्या वहिल्याच दिवशी अतिशय निराशाजनक, क्लेषदायक, दुःखद बातम्या धडकू लागतात, तेव्हा प्रियजनांच्या या महोत्सवाबद्दल काय प्रतिक्रिया उमटत असतील? याची कल्पना न केलेलीच बरी! त्यांचा टाहो आनंदाने रंगीबेरंगी पतंगाने फुललेला आसमंत चिरून टाकतो, "अहो साहेब, अशा बाजारातून मिळणाऱ्या रेडिमेट मांजावर बंदी घाला होऽऽ! नाहीतर कोणीतरी जीवघेण्या या पतंग उडविण्यालाच पायबंद लावा होऽऽऽ...!!"


  अंगाचा थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या हेड लाइन्स टिव्हीवर व पेपर्सवर अशा असतात- पतंगाच्या नादात तरूण पडला इमारतीवरून... जयपूरमध्ये कैक लोक पतंगबाजीत रमले खरे, मात्र मांजाने ३०० जण घायाळ. ...या शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये पतंगबाजीमुळे जखमी झालेल्या रुग्णांच्या रांगाच रांगा. सवाई मानसिंग रुग्णालयात २२७ पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू. कटलेला पतंग पकडण्याच्या नादात चार वर्षांचा मुलगा गच्चीवरून पडला, त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. तर एक तरुण दुचाकीखाली आल्याने दोन्ही पाय गमावून बसला. मांजाने चिरला शिक्षकाचा गळा. मांजाने सोलले पाणी भरणाऱ्या युवतीचे पाय. देशभरातील विविध राज्यांमध्ये अशी कित्येक उदाहरणे सापडतील. नाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने सुफियान निजाम कुरेशी हा १७ वर्षीय युवक मृत्युमुखी पडला. अकोल्यात दोघे जखमी तर राहत्यात आणखी एकाचा बळी गेला. अनेकदा दुचाकी चालवताना गळ्याशी केव्हा मांजा येतो आणि कधी गळा चिरून जातो, हे कळतही नाही. अशा दुर्घटनांमुळे बळी गेलेल्यांची, जखमींची संख्याही मागील काही वर्षांत वाढली आहे. इतकेच नव्हे, तर आकाशच ज्यांचे निसर्गदत्त विहार करण्याचे हक्काचेे स्थान आहे, त्या पक्ष्यांसाठीही मांजा काळ ठरला आहे. माणसे जखमी झाल्यावर उपचारासाठी धावाधाव तरी करतात. पण मुके प्राणी, पक्षी कोणत्या कोपऱ्यात रक्तबंबाळ होऊन पडतात, याचा थांग लागणे कठीणच. यासाठी अनेक पक्षिप्रेमी आणि सजग नागरिक, संस्थांनी जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. पतंग उडवताना सतर्क असणे, आपल्या तसेच इतरांच्या जिवावर ते बेतू नये, याची काळजी घेणे तसेच धारदार मांजाचा वापर कटाक्षाने टाळणे, अशी काही पथ्ये पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येते. त्याला पतंगवेड्यांनी उत्तमप्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे. 

     भारतात पतंग उडविण्यावर बंदीच आहे. पतंग उडविणाराला लाखो रुपयांचा दंड ठोठावून कडक कारवाई करण्याचे कायद्यात नमूद आहे. मात्र हा कायदा अजूनही बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. तो आजच्या घडीला उघडण्याची नितांत आवश्यकता भासत आहे. बाजारात मिळणारा रेडिमेट मांजा प्रथमात प्रथम बंद करण्यात यावा. जीवघेण्या मांजाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभरच मोहीम सकारात्मक अर्थाने प्रभावीपणे राबवली पाहिजे. शाळा, महाविद्यालयांमध्ये घातक मांजा वापरणारच नाही, अशी प्रतिज्ञा घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, हरित लवाद यांनी घातलेली बंदी कडक करावी. पोलिसांचे सहकार्य आणि नागरिकांनी दाखवलेली सजगता यामुळे चिनी, नायलॉन मांजाची विक्री कमी झाल्याचे आढळले पाहिजे. त्यामुळे दरवर्षीचा पतंगोत्सव असुरक्षिततेची भावना काही प्रमाणात का होईना कमी करणारा ठरला पाहिजे, यात हयगय होता कामा नये. राज्यभरातील पतंगप्रेमींनी हा कित्ता आवर्जून गिरवला पाहिजे. पतंगोत्सव साजरा करताना थोडे समाजभान ठेवले तर आनंदावर विरजणही पडणार नाही, तसेच भविष्यात पतंगबाजीवर सरसकट बंदीचा धोकादेखील उद्भवणार नाही. खरे तर हिवाळ्यातील थंडी आणि उन्हाचा एकत्रित अनुभव देणारा पतंग आपल्या भावी पिढ्यांनाही आनंददायी ठरावा, यासाठी आपणच काळजी घ्यायला नको का? पशू, पक्षी, मानव यांना घातक ठरणाऱ्या जीवघेण्या नायलॉन मांजाची आपणच खरेदी वा विक्री केली नाही तर होणाऱ्या घटनांना आपोआप ब्रेक लागेल, यात दुमत नाहीच!

श्री एन. के. कुमार गुरुजी.

                     (मराठी व हिंदी साहित्यकार)

                      पोटेगावरोड, गडचिरोली.

                     मोबा. ७७७५०४१०८६.


                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या