🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावी - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟प्रजासत्ताक दिनाचा 75 वा मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला🌟


परभणी (दि.26 जानेवारी) : आगामी कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नुकत्याकच प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.


येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची उपस्थिती होती.

लोकशाहीच्या उत्सावात सहभागी होण्यासाठी मतदार यादीत नांव नसलेल्या नागरिकांनी नमुना-6 अर्ज भरुन आपला मताधिकार सुनिश्चित करावा. तसेच 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या युवांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही आपले नाव नोंदणी करण्याची संधी आहे. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी तसेच नव मतदारांनी येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे श्री. गावडे म्हणाले.

यावर्षी जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने खरीपाचे पिक धोक्यात आले. तसेच जिल्ह्यातील 39 महसुली मंडळामध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली असून, यासाठी 23 कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि जूलै-2023 मध्ये जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिक नुकसानीकरीता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 21 लाखाहून अधिक नोंदी तपासणी केल्या. त्यानुसार 2 हजार 891 नोंदी आढळून आल्या असुन 2 हजार 823 लाभार्थ्यांना मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाज आणि इतर खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे श्री. गावडे यांनी आवाहन केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत या आर्थिक वर्षात 51 लाभार्थ्यांना 3 कोटी 86 लाख कर्ज वितरीत करण्यात आले असुन, आजपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी 1 हजार 111 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करुन 71 कोटी 87 लाख कर्ज पात्र लाभार्थ्यांना वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 8 लाख 75 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील पात्र लाभार्थ्यांना सुमारे 1 हजार 464 कोटीं रुपयांचे लाभ देण्यात आले. परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु असुन या संकल्प यात्रेच्या माध्यमातून देखील जिल्ह्यातील सर्व गावातील लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

बालविवाह रोखण्यासाठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. जिल्ह्यात मागील 2 वर्षामध्ये 277 बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच दारिद्र रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 3 लाखाहून अधिक पात्र लाभार्थ्यांना 100 रुपयांमध्ये शिधा संच मिळणार आहे. जिल्ह्याच्या सर्वागिंण विकासाकरीता सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 390 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला असुन, परभणी जिल्ह्यासाठी  461 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकुण 724 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले. 

प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्विकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक वाहन, अग्निशमन दल, आरोग्य, भारत निवडणूक आयोग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहिर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सुत्र संचलन प्रा. वायकोस यांनी केले. 

यावेळी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख वसंत निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, विशाल जाधव, डॉ. नामदेव आघाव, ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, शिक्षणाधिकारी प्रा. गणेश शिंदे, जिप मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, तहसीलदार संदिप राजपुरे, समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुट्टे, जिल्हा सूचना अधिकारी सुनिल पोटेकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी, पत्रकार, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची उपस्थिती होती......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या