🌟बुलढाणा येथे स्व.जयराम गायकवाड स्मृती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.....!


🌟लेखकांनी अनुभव अन् निष्ठेशी प्रामाणिक राहून लेखन करावे - डॉ. सदानंद देशमुख 

🌟स्व.जयराम गायकवाड स्मृती पुरस्कार सोहळ्यात पत्रकार राजेंद्र काळे यांच्या हस्ते झाले पुरस्कारांचे  वितरण🌟 

बुलढाणा : साहित्य निर्मिती ही एक प्रकारची धुंदी असते, लिहिण्यासाठी काहीतरी प्रेरणा आवश्यक असते. साहित्य लिखाणातून नाव मिळते पण त्यातून पैसा मिळेलच असे मात्र नसते. साहित्य निर्मिती व लिखाणासाठी आपल्या रोजच्या दैनंदिन कामातून वेळ काढून जास्तीचे काम करावे लागते. प्रत्येकाने आपल्याला काय लिहायचं ? हे ठरवावं लागतं. आधीच्या पिढीने काय लिहिले ? याचाही अभ्यासही करावा लागतो अन् मग त्यातून निर्माण होणार साहित्य हे मनाला प्रसन्न करते.आपला अनुभव व निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून जे लेखन केले जाते त्या लेखनाला निश्चितच भविष्यामध्ये एक यशस्वी लेखन म्हणून समजले जाते, त्या लेखनाला दाद दिली जाते. म्हणून लेखकांनी अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे, असे मत प्रा.डॉ. सदानंद देशमुख यांनी स्व. जयराम गायकवाड स्मृती साहित्य पुरस्काराच्या विरतण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना केले.स्व.जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशन व सहर-ए-गझल अकादमीच्यावतीने गेल्या ४ वर्षापासून देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांचा वितरण समारंभ १४ जानेवारी रोजी प्रा. सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला गजानन अहमदाबादकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र काळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी प्रास्ताविकातून या पुरस्कारांचा उद्देश सांगतांना लेखकांकडून चांगले लेखन केल्या जावे व इतर नवोदित लेखकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम गेल्या चार वर्षापासून घेण्यात येत असल्याचे सांगितले. चंद्रशेखर भुयार यांच्या "समाधी "या गझल संग्रहाला मराठी गझल गौरव सन्मान किशोर मुगल यांच्या 'बस युही या' गझल संग्रहाला "दुष्यंत" गझल गौरव सन्मान फारूक रजा यांच्या 'अल्फाज का चेहरा' या गझलसंग्रहाला 'आबरु ये गझल अवार्ड' उत्तम बावस्कर यांच्या काळवाटा या कादंबरीला "कादंबरी गौरव" सन्मान, रवींद्र साळवे यांच्या 'अन्वय' या पुस्तकाला "परिवर्तन साहित्य पुरस्कार" तर डॉ. विकास बाहेकर यांनी लिहिलेल्या 'मना पाहिजे अंकुश' या पुस्तकाला "संत साहित्य सन्मान" पुरस्काराने गौरविण्यात आले या सर्व साहित्यिकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांनी सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी  साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रतिभा गायकवाड, राजू पाटील, सुनील जाधव, पंकज चतरकर, उमाकांत निकम, विकास जाधव, सचिन तायडे,स्वप्नील झनके, रोहन सुरडकर, नामदेव घट्टे,पंकज पाटील, राजु चव्हाण शहानवाज खान, अश्विनी च्व्हाण, दर्शना मोहुरळे, माधवी चव्हाण यांचेसह स्व. जयराम गायकवाड मेमोरियल फाउंडेशनचे सभासद व सहर गजल अकादमीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या