🌟परभणी शहरात नायलॉन मांजाचा वापर टाळा ; अन्यथा कारवाई.....!


🌟महानगर पालिका आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांचा नायलॉन मांजा विक्रेत्यांना इशारा🌟

परभणी (दि.10 जानेवारी) :  पतंग व दोरा विक्री करणार्‍या दुकानदारांनी नायलॉन मांजा दोरा विक्रीस ठेवू नये, तसेच नागरीकांनीही नायलॉन मांजाचा वापर करु नये,अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी दिला आहे.


                नायलॉन अविघटनशील (नॉन बायोडिग्रेडेबल) आहे. नायलॉन मांजा अतिशय बारीक असतो, त्यामुळे तो धारदार असतो आणि सहजासहजी दिसून येत नाही. या कारणामुळे हजारो पशु-पक्ष्यांना दुखापत होते. त्यात कित्येक पशुपक्षी मरण पावतात. तसेच रस्त्यावरही या मांज्यामुळे अनेक दुर्घटना होतात. 2017 पासून सरकारने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली आहे. नायलॉन मांजा विक्री करणारा तसेच वापरणार्‍या व्यक्तीस भारतीय दंड संहितेनुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

             पतंगबाजी करताना आपल्याकडे नायलॉन मांजा वापरत नाहीत ना? याकडे लक्ष द्यावे. मांजामुळे जखमी झालेले पक्षी किंवा प्राणी दिसल्यास त्यावर प्रथमोपचार करून पक्षी तज्ञांच्या मार्गदर्शनात त्यांची काळजी घ्यावी. पतंगबाजी करताना घ्यायची काळजी, कटलेली पतंग तुटताना रस्त्यावर बेधुंद धावू नका, कठडे नसलेल्या इमारतीवरून पतंग उडविण्याचे टाळावे. गच्चीवरून पतंग उडविताना मोठ्या आवाजात गाणे वाजवून शेजारी किंवा आजारी लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वनि प्रदूषण टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ‘यावर्षी नायलॉन मांजाला नाही म्हणूया पशु-पक्ष्यांना वाचवूया’ असा संकल्प करण्याचेही आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या