🌟अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतंर्गत बँकेकडे आलेले प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करा - अध्यक्ष नरेंद्र पाटील


🌟जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली🌟


परभणी (दि.09 जानेवारी) : राज्यातील तरुण/ तरुणींना स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करण्यास इच्छुकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेतंर्गत बँकेकडे आलेले कर्ज प्रस्ताव सकारात्मकता ठेवत प्राधान्याने मंजुर करा, अशा सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. कुशवाह, सुनिल हट्टेकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त श्री.खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी श्री. नरेंद्र पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे त्यांना स्वत:च्या व्यवसायामध्ये उभारी घेता यावी. सर्वसामान्य नागरिकांला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मराठा प्रवर्ग तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ आस्तित्वात नाही, त्यांच्यासाठी ही योजना राबविण्यात येते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबविण्यात येते. सर्व बँकेतील जिल्हा समन्वयक आणि शाखा व्यपस्थापक यांनी या योजना समजवून घेत, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. यासाठी विनाकारण विलंब करु नये. प्रस्तावात त्रुटी असतील तर त्याचे तात्काळ निराकरण करुन घ्यावे. विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत. तसेच बँकांनी एजंटच्या माध्यमातून कामे करुन नये. काही खाजगी बँकांनी चांगले काम केले असून राष्ट्रीय बँकांनी देखील यात प्रगती करणे आवश्यक आहे. बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी आपल्या शाखा व्यवस्थापकांना महामंडळाच्या योजनांचे महत्त्व सांगून प्राप्त प्रकरणे वेळेत मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या. 

या योजनेचा इतर लाभार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजन करण्यात यावा असे आमदार श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची योजना आहे. योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवा यासाठी बँकांनी वेळेत काम करणे आवश्यक आहे. यासाठी बँक व्यवस्थापकांची वेळोवेळी बैठक आयोजन करुन या योजनांबाबत आढावा घेण्यात येईल.प्रास्ताविकात श्री. खंदारे यांनी, या योजने अंतर्गत जिल्ह्यातील बँकांनी  1 हजार 111 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करत 71.87 कोटी कर्ज वितरीत केले आहे. महामंडळाने 8.57 कोटी लाभार्थ्यांना व्याज परतावा केलेला आहे. तर महामंडळाकडून 925 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु झाला असल्याचे सांगितले बैठकीत श्री. पाटील यांनी बँकेच्या जिल्हा समन्वयकांकडून बँक निहाय आढावा घेतला. तसेच उपस्थितांच्या समस्याही यावेळी जाणून घेतल्या. महामंडळाचे जिल्हा समन्वयक भारत गोरे, कैलास जाधव आणि गोविंद गायके यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा समन्वयक आणि मराठा समाजातील नागरिकांची उपस्थिती होती..... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या