🌟परभणीतील आपणा कॉर्नर भागातील दत्ता मिरासे खून प्रकरणातील दोघा आरोपींना जन्मठेप.....!

 


🌟प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा🌟 

परभणी (दि.१८ जानेवारी) : परभणी शहरातील मध्यवस्तीतल्या अपना कॉर्नर भागातील दत्ता गणेश मिरासे या युवकाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी दिपेश उर्फ दिपक माणिकराव मिरासे व भिमराव उर्फ नितीन नंदकिशोर नेमाणे या दोघा युवकांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्‍वर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड,दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

              नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदीना पाटी परिसरातील रामेश्‍वर प्लॉट भागात गणेश मिरासे व त्यांचे तीन भाऊ वास्तव्यास आहेत. त्यांचे वडिलोपार्जित घर असून त्यामध्ये वाटण्या झालेल्या आहेत. मोठा भाऊ माणिकराव हा घराच्या पाठीमागील भागात वास्तव्यास आहेत. माणिकराव यांना त्यांच्या हिश्श्यात मुख्य रस्त्यावरुन घरापर्यंत ये-जा करण्याकरीता पाच फुट रुंदीचा रस्ता सोडलेला आहे. परंतु, या रस्त्याच्या वापरावरुन माणिकराव मिरासे व गणेश यांच्या वाद सुरु होता. 30 फेबु्रवारी 2022 रोजी गणेश मिरासे यांनी त्यांची मोटारसायकल या वादग्रस्त रस्त्यावर उभी केली. त्यावेळी माणिकराव मिरासे व त्यांचा मुलगा दिपेश यांनी शिवीगाळ करुन मोटारसायकल ढकलून दिली. त्याचवेळी गणेश मिरासे यांचा मुलगा दत्ता याने मोटारसायकल का ढकलली असे विचारले असता माणिकराव मिरासे व दिपेश मिरासे यांनी शिवीगाळ केली. त्याच दिवशी अंदाजे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास दत्ता मिरासे व त्याची बहिण क्रांती हे दोघे दुध घेवून अपना कॉर्नर भागातून घराकडे येत होते. त्यावेळी परिवर्तन या दुकानासमोर आरोपी दिपेश मिरासे याने दत्ता यास पकडले व मारहाण सुरु केली. त्यावेळी माणिकराव, संताबाई, नितीन नेमाने व परमेश्‍वर मिरासे हे त्या ठिकाणी उपस्थिती होते. त्यापैकी एकनाथ पारडकर याने सोडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी दिपेश याने त्यासही ढकलून दिले व दत्ताच्या डोक्यात मोठी फरशी मारली. त्यामुळे दत्ता खाली पडला. त्यावेळी आरोपी नितीन नेमाने याने वस्तर्‍याने दत्ताच्या गळ्यावर वार केले. त्यावेळी माणिक व संताबाई हे दोघे दत्ताला जीवे मारा अशी ओरड करत होते. दरम्यान, या प्रकरणात आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. एकनाथ पारडकर, पांडुरंग चोपडे, कमलबाई मिरासे यांनी दत्ता यास जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून दत्ता यास मयत घोषित केले.

                 दरम्यान, या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.जी. सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच अन्य पुरावे जप्त केले. कमलबाई गणेश मिरासे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला व तपास सुरु केला. न्यायालयात खटला उभा केला. त्यावेळी 11 साक्षीदार न्यायालयाने तपासले. सरकार पक्षातर्फे तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीशी व अहवालास सुसंगत ठरली. या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेला वस्तरा आरोपीकडून जप्त करण्यात आला. त्या पाठोपाठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी न्यायालयात सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष सानप, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार दत्तराव खुणे, प्रमोद सूर्यवंशी आदींनी काम पाहिले. न्यायालयाने सूनावनी अखेर आरोपी दीपेश उर्फ दिपक माणिकराव मिरासे (वय 24) व आरोपी भिमराव उर्फ नितीन नंदकिशोर नेमाणे या दोघांना जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या