🌟परभणी मनपाचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे नेते माजू लाला यांनी केला शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश.....!


🌟माजी उपमहापौर माजू लाला यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांचाही शिवसेनेत प्रवेश : काँग्रेस पक्षाला खिंड🌟

🌟शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मागील अनेक दिवसांपासून माजू लाला संपर्कात होते🌟

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी सहकारी माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

              गेल्या काही दिवसांपासून माजी उपमहापौर माजू लाला हे काँग्रेस पक्षात अस्वस्थ होते. विशेषतः जिल्ह्यातील काँग्रेस नेतेमंडळींबरोबर त्यांचे बर्‍यापैकी बिनसले होते. महानगरपालिकेंतर्गत राजकीय घडामोडी तसेच आपल्यासह सहकारी सदस्यांना सातत्याने डावलले जात असल्याचा सूर आळवून माजू लाला यांनी काँग्रेस नेतेमंडळींना या संदर्भात वारंवार सूचना पाठोपाठ इशारासुध्दा दिला. अलिकडे ते शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या संपर्कात होते. त्यामुळेच ते पक्षांतर करणार का ? असा प्रश्‍न निर्माण होत होता. या पार्श्‍वभूमीवरच माजू लाला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्णतः विश्‍वास ठेवून आपण सहकारी सदस्यांसह केवळ परभणी महानगराच्या सर्वार्थाने विकासाच्या दृष्टीकोनातून शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, असे जाहीर केले.

             शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या पाथरी येथील संपर्क कार्यालयात माजी उपमहापौर माजू लाला यांच्यासह त्यांचे सहकारी सदस्य भेटीस गेले होते. त्यावेळी सईद खान यांच्यासह शिवसेनेच्या नेतेमंडळींनी या सार्‍यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना माजू लाला यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी परभणी महानगराच्या विकास कामांचा अक्षरशः बट्याबोळ केल्याचा आरोप केला. सदस्यांना विश्‍वासात न घेणे, विकास कामांकरीता निधी न पुरविणे, असे प्रकार सातत्याने घडत होते. त्या विरोधात बोलूनसुध्दा काँग्रेसजणांनी दखल घेतली नाही, अशी तीव्र खंत व्यक्त करतेवेळी माजू लाला यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतेवेळी विकास प्रश्‍नच प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी परभणी महानगरपालिकेसह जिल्ह्यातील अन्य नगरपालिकेंतर्गत 50 माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्णतः विश्‍वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या