🌟धम्म परिषदांच्या जत्थ्यातून फूलावेत माणूसकीचे मळे : जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे


🌟भारतात बौध्द धम्माच्या रोपट्याला नविन संजीवनी देण्याचे ऐतिहासीक काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले🌟


✍🏻लेखक प्रकाश कांबळे (प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत)

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीचा प्रारंभ सन १९५६ ला झाल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. भारतात १४ ऑक्टोंबर १९५६ हे बौध्द धम्माच्या रोपट्याला नविन संजीवनी देण्याचे ऐतिहासीक काम या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाले.आणि एक नवे पर्व तेव्हापासून सूरू झाले. त्याची मुळं आज पक्‍की होतांना आपण पाहतो आहोत. मनुस्मृतिच्या महाप्रहारांनी विकलांग,गुलाम,लाचार झालेल्या माणसाच्या मनात नवे विचार,नवे माणूसकीचे संकल्प घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती पुढे आली. जी आज अंकुरतांना दिसते. बाबासाहेबांनी नागपूर मुक्कामी धर्मातर करण्यापूर्वी भारतात बौध्दांची संख्या नगण्य होती. तत्कालीन खानेसुमारी नुसार दोन हजारावर हि संख्या होती. ती आज करोडोंचा आकडा गाठते याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीलाच आहे. लोक अजूनही बौध्द धम्माकडे वळताहेत,धर्मांतर करताहेत याचे ही श्रेय बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीलाच जाते. सन १९५६ ला बौध्द धम्माच्या प्रसार प्रचाराची कोणतीही मोठी संसाधणे उपलब्ध नव्हती, कोणतीही प्रभावी यंत्रना नव्हती, बौध्द साहित्य आणि प्रतिके नव्हती, बोटावर मोजण्या इतके सोडले तर बहुसंख्य भिक्षू ही नव्हते. तरिही लाखों लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर विश्वास ठेवून धर्मांतर केले.व धर्मांतराच्या अवाहनाला प्रतिसाद दिला आणि बौध्द धम्म स्विकारला. विश्वासाने आणि मनाने ठरविल्या नंतर काय होवू शकते हे नागपूरच्या धर्माँतर सोहळ्यातून सिद्ध झालेले आहे. मन परिवर्तनाने क्रांती घड़ू शकते हे कलिंगच्या युध्दा नंतर सम्राट अशोकाने 'युध्द घोषा ऐवजी धम्म घोषाचा' स्विकार करून आपल्या उर्वरित आयुष्यात जी बौध्द धम्माची प्रतिके उभी केली, त्याला इतिहासात तोड नाही. सम्राट अशोकाची महानता त्याने तलवारीच्या बळावर जिंकलेल्या साम्राज्यावर मोजली जात नाही तर ती सम्राट अशोकाने भगवान बुध्दाने सांगितलेल्या करूणेचा केलेला स्विकार आणि स्विकारलेल्या मानवतावादी सिध्दांतात आहे. त्याची महानता युध्दाचा मार्ग सोडून बुध्दाचा शांतीचा मार्ग स्विकारण्यात आहे. जो आज जगातील बलाढ्य देश आणि त्यांच्या साम्राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. 


सन १९५६ हे वर्ष विसाव्या शतकातील ऐतिहासिक वर्ष म्हणून ओळखले जाते. सन १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे घेतलेल्या दिक्षेचा संदर्भ आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी दिक्षा दिली ते ब्रम्हदेशाचे महास्थवीर भदन्त चंद्रमुणी सन १९५७ ला नागपूरच्या दिक्षेनंतर पुर्णेच्या पावन भूमीला ही त्यांचे पाऊल लागले. पुर्णेतही धर्मांतराचा मोठा कार्यक्रम झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीवर विश्वास ठेवून पुर्णेत महास्थवीर भदन्त चंद्रमुणी यांना पुर्णेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देवून येण्यास आग्रही असणान्या तत्कालीन पुर्णेच्या कार्यकर्त्यांना शतशः धन्यवाद द्यायला हवेत. त्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता एम.डी.नेरलीकर,यशवंराव गायकवाड, एम.सी.साबळे,एल.एस.साबणे, व्हि.टी.डोलारे,बन्सी कांबळे, जे.एल.शिवराम,ग्यानोजी जोंधळे,गंगाधर गायकवाड,मुंजाजी वाघमारे,राजाराम वाघमारे,परशुराम भालेराव, गंगाधर खर्गखराटे,मसाजी बनसोडे,काशिनाथ गायकवाड,सदाशिव सिर्से,शेकरराव झोडपे, मारोती आहिरे, दामोदर घुले यांच्या सह तत्कालीन अनेक कर्मचारी कार्यकर्त्यानी तन मन धनाने पुर्णेच्या धर्मांतराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वी केला. या पैकीची काही मंडळी थोडीफार शिकलेली,काही जण अक्षर ओळखण्यापर्यंत शिकलेले तर बाकीचे पूर्ण निरक्षर होते. परंतू हे सर्व लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर विश्वास आणि निष्ठा ठेवणारे होते. कोणत्याही प्रकाच्या त्यागासाठी हि पलटन सदैव तयार होती. बौध्द धम्माबहल त्यांचा फार मोठा अभ्यास नव्हत कि त्याबाबतच्या त्यांच्या जाणिवाही नसाव्यात पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा घेतलेला निर्णय हा आपल्या हिताचा आणि उत्कर्षाचा आहे. याची त्यांना मनोमन खात्री पटलेली होती. डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी नागपूरला धर्माँतराप्रसंगी “भारत बौध्दमय करण्याचे स्वप्न पाहिले जणू त्यांच्या स्वप्नपूर्तीला सकारात्मक हुंकार देण्यासाठी पुर्णेला धम्मदिक्षेच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.” आणि विशेषत्वाने हे नमुद करायला हवे की तो धर्मांतराचा पायंडा आजही चालू आहे अनेक लोक अनेक कुटुंबे सामूहिकरित्या पुर्णा बुध्द विहारात आणि विविध ठिकाणच्या धम्म परिषांमधून धर्मांतरीत होवून बौध्द धम्म स्विकारित आहेत. याचे श्रेय पुर्णेतील धम्म चळवळीला नक्कीच आहे ही धम्म चळवळ उभी करण्याचे अथक प्रयत्न निवार्णस्थ भदन्त संघरक्षित आणि भदन्त उपाली महाथेरो यांना जाते. त्यांनी घराघरात धम्मानुयायी निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्याकाळी प्रवासाच्या फारश्या सुविधा नसतांना बौध्द संस्कृतिचे अदान प्रदान होण्याच्या उद्धेशाने अनेक ठिकाणी धम्म सहली काढल्या कधी रेल्वे तर कधी पायी प्रवास करून “बुध्द” पेरण्यासाठी राज्यभर आणि देशभर भटकंती केली. समाजातील अनेक लोकांचे रोष पत्करून त्यांनी अखंडीत पणे धम्म प्रचाराचे कार्य केले. तेव्हाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. लोक सहजासहजी परिवर्तनासाठी तयार होत नव्हते. कित्येक लोक तर भिक्खू लोकांची टिंगल टवाळी करायचे. तर कधी त्यांच्या सोबत निरर्थक हुज्जत घालून त्यांना अपमानित करण्याचे प्रयत्न करायचे., तरिही भदन्त उपाली सारख्या स्थिप्रज्ञ भिक्खूने सर्व सहन करीत धम्माचे कार्य निरंतर चालू ठेवले होते. जिथे लोक स्वतःला परिवर्तीत करून कर्मठरूढी पंरपरांचात्याग करून बौध्द धम्म स्विकारण्यास धजत नाहीत. तिथे भदन्त उपालींनी भदन्त डॉ.उपगुप्त महास्थवीर यांच्या सारखा उच्च शिक्षित बौध्द भिक्खू तयार केला. हि साधी बाब नाही. डॉ.उपगुप्त महास्थवीर हे भदन्त उपाली महाथेरो यांचे शिष्य होत. भदन्त उपगुप्त महास्थवीर यांच्या कार्याबदल काय सांगावे ? त्यांच्या बदल सर्वांनाच चांगली माहिती आहे. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचा ठसा उमटिवतात. भदन्त उपालींच्या सहवानंतर भदन्त उपगुप्त यांना जगविख्यात बौध्द साहित्यीक विचारबंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दिक्षेचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडरांच्या विचारांचे व साहित्यांचे निर्माते पूज्य भदन्त डॉ.आनंद कौसल्यायन यांचा ही सहवास लाभला आणि त्यांच्या कार्याची छाप त्यांच्यावर पडली. आज ते अनेक बौध्द राष्ट्रात परिचित झाले आहेत. डॉ.भदन्त आनंद कौसल्यायनजी प्रमाणे भदन्त डॉ.उपगुप्त महास्थवीर यांचे अनेक शिष्य भिक्खू बनून महाराष्ट्रभर, विशेषत: मराठवाड्यात धम्माचे कार्य मोठ्या प्रमाणात करतांना आढळतात त्यात प्रमुख्याने भदन्त पंय्यानंद-लातुूर, भदन्त धम्मशील-बीड-हिंगोली, भद॒न्त बोधीधम्मा-धम्माचलऔरंगाबाद, भदन्त पंय्यातिस्स-सिरसाव्ठा, भदन्त पंय्यारत्न-नांदेड, भदन्त पंय्याबोधी-नांदेड, भदन्त मुदितानंद-परभणी, भदन्त शिलरत्न-नांदेड, भदन्त संघपाल-नांदेड,भंन्ते पंय्यावंश-पूर्णा, भन्ते संघरत्न-आम्रवण देवगांवफाटा, आदि. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात बौध्द धम्माच्या प्रचार प्रसाराचे आणि मोठे शिल्प निर्मीतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याला लोकांतुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.याशिवाय विदर्भात भदन्त डॉ.धम्मसेवक महाथेरो,मुळावा व प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे कार्य चालू आहे. औरंगाबाद येथे भदन्त इंदबंस महाथेरो,भदन्त एस. प्रज्ञाबोधी,भदन्त करूणानंद थेरो,भदन्त डॉ.ज्ञानरक्षीत थेरो, भदन्त एम.धम्मज्योती थेरो हे मोठ्या प्रमाणात धम्माचे कार्य करीत आहेत या सर्व भिक्खूंचे कार्य पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतरची धम्म प्रचार आणि प्रसाराची ही मोठी उपलब्धी आहे असे विधान केल्यास हे चुकीचे ठरणार नाही. कोणताही राजाश्रय नसतांना मोठ्या नेटाने धम्माचे काम कसोसिने होत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाणानंतर सहा धम्म संगिती झाल्याच्या नोंदी आहे. या सर्व धम्म संगितिंना तत्कालीन राजांचा राजाश्रय मिळाला. पहिल्या धम्म संगितीला राजा अजातशत्रू यांचा राजाश्रय होता, दुसन्या धम्म संगितीला राजा नंदवर्धन यांचा राजाश्रय होता,तिसन्या धम्म संगितीला राजा सम्राट अशोक यांचा राजाश्रय होता, तर चौथी धम्म संगिती श्रीलंकेत झाली, तिथे राजा बड्वगामिनी यांचा राजाश्रय होता,पाचवी धम्म संगिती म्यानमार (बरमा) येथे झाली तेथे राजा मिनदोन यांचा राजाश्रय होता तर सहावी धम्म संगिती बरमा येथील रंगुन येथे झाली तिथे प्रधानमंत्री उनू यांचा राजाश्रय मिळाला ही सहावी धम्म संगिती १९५४ साली झाली या धम्म संगितीसाठी भारतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते या सर्व धम्म संगितीमधून बौध्द तत्वज्ञान,भिक्खू संहितेवर सखोल मंथन होत असे आणि धम्म नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नवनविन प्रस्ताव भिक्खू संघ पारित करीत असत.आता धम्म संगिती होत नाहीत, आता होतात धम्म परिषदा या धम्म परिषदा देशातील आणि राज्यातील जिल्हा,तालुका,शहर आणि छोट्या गावांमधून सुध्दा होत आहेत. या धम्म परिषदातून केवळ बौध्दच नव्हे तर परजातीची आणि धर्माची मंडळीही सहभागी होतांना दिसते. धम्म परिषदा बौध्द धम्माच्या “सेतू” होत आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. इथल्या सनातन्यांनी प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नाना तन्हेने छळले त्यांची निंदा केली तरिही डॉ.बाबासाहेब आंबेडकर निंदेने खचले किंवा विचलीत झाले नाहीत. त्यांच्या समोर या देशातील सर्वाना स्त्री आणि पुरूषांना समान हक्क प्रदान करायचे होते. तो त्यांचा मनोदय त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमानी पूर्ण केला. भारत बौध्दमय करण्याचा आमचा जर संकल्प असेल तर आम्हालाही सर्वांशी संवादीत रहावे लागेल. अनेकांशी चर्चा कराव्या लागतील, त्यांच्या सोबत विचार मंथन करावे लागेल. परस्परातील विद्वेषाच्या भावनांना तिलांजली देवून समन्वयातून संवादी राहून बौध्द विचारांच्या परिवर्तनासाठी स्वाना तयार करावे लागेल. एक दुसऱ्याच्या सुखा दुःखात सहभागी व्हावे लागेल, पर्यटनातून सहवास आणि आनंद लुटत मनं घडवावी लागतील असे जत्थे धम्म परिषदातुन निर्माण व्हावेत आणि फुलावेत माणूसकीचे मळे.....


✍🏻लेखक : प्रकाश कांबळे (प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत)

पूर्णा तालुका जिल्हा परभणी (महाराष्ट्र)

 मो.नं.9423759667

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या