🌟बालभारती : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ....!


🌟महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ-बालभारती स्थापना दिन🌟

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था असून बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. केवळ बालभारती या नावानेही ती ओळखली जाते. याबद्दलची रोचक व ज्ञानवर्धक संकलित माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी सदर लेखात प्रस्तुत केली आहे...संपादक.

      महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत. निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोगकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे, या क्षमता आत्मसात कराव्या, तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तकनिर्मितीमागचा आहे. दरवर्षी सुमारे १९ कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून बालभारतीची पुस्तके वापरली जातात. या पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमती मधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी, अशी शिफारस करण्यात आली. 


कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन वसंतराव नाईक सरकारनेे २७ जानेवारी १९६७ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना केली. याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते दोन फेब्रुवारी १९६७ला झाले. मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी़ यांच्याकडे सोपविण्यात आली. तर मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक म्हणून शिक्षणतज्ज्ञ बापूराव नाईक होते. संस्थेचा सध्याचा पत्ता- बालभारती, सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११ ००४ असा आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ होय. ते दि.२७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापन झाले. शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशा स्वरूपाची शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने सन १९६६ साली केली होती. तिला अनुसरून या मंडळाची स्थापना झाली. प्रस्तुत मंडळ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे.

           मंडळाची उद्दिष्टे- १) शालोपयोगी पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तके व विद्यार्थ्यांसाठी व्यवसायपुस्तके तसेच शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे, २) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर शाखा यांतील अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांच्या सुधारणेसाठी तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती, साहाय्यभूत शैक्षणिक साधने आणि विविध शिक्षणसाधने यांवरील साहित्याविषयी संशोधन करणे, ३) शिक्षणाच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे, त्याचा विकास करणे आणि शासनास किंवा अन्य  योग्य प्राधिकरणास त्याची शिफारस करणे, ४) सर्व शाखांमध्ये शिक्षणाची प्रगती व्हावी यासाठी उपयुक्त किंवा आवश्यक अशा पुस्तकांचे व साहित्याचे मुद्रण, विक्रय व वितरण करणे, ५) शासनास देणगीदाखल मिळालेल्या कागदपत्रांचा संग्रह व उपयोग करणे आणि त्यासंबंधीचा हिशोब ठेवणे तसेच शासनाच्या वतीने पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्याविषयी योजना कार्यान्वित करणे, ही आहेत. मंडळाचे पुढीलप्रमाणे नऊ विभाग पाडण्यात आले आहेत- १) विद्याविभाग, २) सामान्य प्रशासन विभाग, ३) वितरण विभाग, ४) वित्त विभाग, ५) अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग, ६) निर्मिती विभाग, ७) संशोधन विभाग, ८) ग्रंथालय विभाग, ९) किशोर विभाग. मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील बालभारती नामक इमारतीत असून निर्मिती विभाग वरळी,मुंबई येथे आहे. यांशिवाय पुणे, नागपूर, मुंबई-गोरेगाव व औरंगाबाद या चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे व वितरण केंद्रे आहेत. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी करून क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक-विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किंमतीवर १५ टक्के वटाव दिला जातो. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये क्रमिक पुस्तकांचे वितरण सहकारी संस्थेमार्फतच केले जाते.  मंडळाच्या धोरणविषयक सर्व बाबी नियामक मंडळ आखते व या नियामक मंडळातर्फेच पाठ्यपुस्तक  मंडळाचे व्यवस्थापन चालते. राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष आहेत. नियामक मंडळावर या दोघांसह नऊ पदसिद्ध व सहा अपदसिद्ध सदस्य असतात. अपदसिद्ध सदस्यांची नियुक्ती शासनातर्फे सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी होते. 

         मंडळाचे व्यवस्थापन पुढील समित्यांमार्फत चालते- १) कार्यकारी समिती, २) वित्त समिती, ३) विद्यापरिषद, ४) संशोधनसल्लागार परिषद व ५) निर्मिती व वितरण परिषद. मंडळाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार अधिक समित्या व उपसमित्या नियुक्त करण्याचे अधिकार नियामक मंडळास आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी भाषा विषयांच्या एकूण सात समित्या मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, इंग्रजी या आहेत. तसेच इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र, या भाषेतर विषयांसाठीही समित्या आहेत. मंडळाच्या स्थापनेच्या वेळी शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध पाठ्यपुस्तके किंमत रु.४२·८१ लक्ष तसेच रोख २७·६० लक्ष रु.वेळोवेळी कर्जरूपाने दिले. त्या सर्व रकमेची मंडळाने व्याजासह परतफेड केली आहे. मंडळाला दरवर्षी लागणारे खेळते भांडवल सुमारे ८ ते १० कोटी रु.हे बँकांकडून कर्जरूपाने पुस्तकसाठ्याच्या तारणावर वेळोवेळी मिळविले जाते व त्याची परतफेड पुस्तकविक्रीद्वारे मिळालेल्या रकमेतून केली जाते.

        पाठ्यपुस्तकांची निर्मितीमंडळ अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत इयत्ता १ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. मंडळनिर्मित इ.१ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी आणि सिंधी (अरबी व देवनागरी लिपीत) या सात भाषांत प्रकाशित करण्यात आली. राज्यात सन १९७२मध्ये १०+२+३ या नव्या आकृतिबंधानुसार इयत्ता ८ ते १०च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता ८ वी इतिहास, बीजगणित व भूमिती या विषयांची पाठ्यपुस्तके मंडळाने खाजगी प्रकाशनासोबतच प्रकाशित केली. सन १९७३-७४ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या इयत्ता ८ ते १२च्या पाठ्यपुस्तकांची छपाई व वितरणांचे काम मंडळाने स्वीकारले. अशा प्रकारे आतापर्यंत मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतची एकूण ३९५ पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या एकूण ३३१ पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण यांचे कामही मंडळ प्रतिवर्षी करत आहे. इयत्ता १ ते ७च्या भाषा व गणित या विषयांच्या नव्या मालेचे काम मंडळाने पूर्वीच क्रमश: हाती घेतले असून गणिताच्या मालेतील अखेरचे म्हणजेच इयत्ता ७ वीचे गणिताचे पाठ्यपुस्तक १९८४-८५ या वर्षी प्रकाशित झाले आहे. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे एक पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध केले. पाठ्यपुस्तकांतील काही निवडक कविता तसेच स्फूर्तिगीतांतील काही गीते निवडून मंडळाने १८ गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत. त्यांचे संगीत दिग्दर्शन वसंत देसाई यांनी केले तसेच बालभारती गीतमंजुषा प्रसिद्ध करून या गीतांची स्वरलिपीही उपलब्ध करून दिली.

         मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. २०१३ पासून बालभारतीच्या सहाव्या मालेचे प्रकाशन सुरू आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे. बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत. पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. पाठ्यपुस्तकांखेरीज इतर अनेक पुस्तकांचे प्रकाशन बालभारती करते. ही पुस्तके अध्ययन-अध्यापनाला पूरक असतात. दि.१४ नोव्हेंबर १९७१पासून आठ ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी किशोर हे मासिक मंडळाने सुरू केले. त्यातील उत्तम साहित्याचे १४ खंड प्रकाशित झाले आहेत,  हे कार्य उल्लेखनीयच!

!! बालभारती मंडळ स्थापना दिनाच्या समस्त शिक्षणप्रेमी भावाबहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

    - संकलन व सुलेखन -

                  श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                  फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

               

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या