🌟एक पत्रकार - गडगंज श्रीमंत माणूस : विचार स्वभावाची श्रीमंती ही मदन बापू कोल्हे यांची खरी श्रीमंती.....!


🌟बापु ही श्रीमंती मद़न बापू कोल्हे यांना आयुष्यभर पुरून उरणारी श्रीमंती आहे🌟

लेखक - दि.फ.लोंढे 

'कागबन' हे माणसाचं समाजात मोठेपण सजविण्यासाठी, विकास व प्रगती ह्या भाऊ-बहिणी ला सर्व बाजूच्या वाटा बंद असलेले अडगळीच्या ठिकाणी आडमार्गावर वसलेले तालुका वसमत जिल्हा हिंगोली मधील एक लहानसे खेडेगाव .एका गडगंज पत्रकार असलेल्या श्रीमंत माणसाचे जन्मगाव, मदन मुंजाजी कोल्हे त्या माणसाचे शुभ नाव .

त्या माणसाला गावकाळीच्या शिवारात मालकीची जमीन नव्हती टीचभर . गावपांढरीलाही नव्हते धड घर. ते घरही गावाबाहेर ,गावच्या मुख्य वस्ती पासून फार दूर . जात कुळीही नव्हती थोर .अस्पृश्य जातीमधील जात होती त्यावेळची महार, पण स्वभाव मात्र नव्हता गावकामगारासारखा महार , तो होता भीमा कोरेगाव सारखा लढवय्या महार . तलवारीने नाही तर होते शस्त्र विचार . वृत्तपत्रक हाती होते हत्यार .म्हणून तो गडगंज श्रीमंत माणूस होता पत्रकार. विचार स्वभावाची श्रीमंती ही खरी श्रीमंती असते . ती त्यांच्याकडे होती . त्यांची पत्रकारिता ही गुणसंपत्ती सहवासाने अंगी आलेली नव्हती तर ती त्यांच्या रक्तातच गुणसंपत्ती होती .मदनराव कोल्हे यांचा जन्म 17 जानेवारी 1948 रोजीचा . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरापूर्वीचा आणि हुकूमशहा हैदराबादच्या निजामाने आर्थिक ,सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक बाबतीत पिळून व छळून काढलेल्या मराठवाड्याच्या कंगाल भुमीतला . त्यात भौतिक साधन संपत्तीच्या ,श्रीमंतीचा बहार नसलेले मदनरावजी कोल्हे हे कंगाल असलेले गर्भश्रीमंत माणूस . ते कंगाल यासाठी की , ते सन 1973 पासून आजतागायत पर्यंत त्यांनी आपल्या आयुष्याची कमाई कमविण्यासाठी फक्त आणि फक्त सायकल वरूनच भ्रमंती केली ,आणि आजही ते अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केल्यानंतरही करीत आहेत . अशा त्यांच्या खडतर आयुष्याच्या जीवन प्रवासाची कमाई काय असेल तर ती आहे  'बापू ' . 

बापु ही श्रीमंती त्यांना आयुष्यभर पुरून उरणारी श्रीमंती आहे . बापू हे त्यांचे प्रेमाच्या आदराचे नाते नाव हृदयाच्या कप्प्यात परिचितांनी जपून ठेवलेले आहे. ' बापू ' ही श्रीमंती कमविण्यासाठी मदनबापुंनी पत्रकारितेपासून सुरुवात केलेली आहे .1973 साली त्यांना पत्रमहर्षी कै.देविदासराव गं.रसाळ ्यांनी दैनिक गोदातीर समाचार ची पत्रकारिता बहाल केली. त्या कामगिरीचा शुभारंभ नांदेड येथुन झालेला आहे तर 1974 ला त्यांच्यावर परभणी येथील दैनिक गोदातीर समाचार चा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला . 1975 ते 1980 पर्यंत ची लातूर येथील गोदातीर समाचार च्या स्वतंत्र आवृत्तीची कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे .ज्या कागबन गावात घरावरील  पत्रांशिवाय दुसरे पत्रच माहीत नव्हते त्या गावातील मदन मुंजाजी कोल्हे हे पोर 'आधी कळस मग पाया ' असे पत्रकारितेत किमया करते . वंशपरंपरागत कोणताच वारसा नसताना. ते केवळ जिद्द, चिकाटी व कसोटीच्या बळावर .

अंगभूत कर्तृत्ववान व्यक्तीला परकेपणात कार्य करण्याने मनशांती लाभत नसते .ह्या नैसर्गिक तत्त्वगुणामुळे मदनराव कोल्हे यांनी १९८३ पासून साप्ताहिक धर्मभूमी हे आपले स्वतःचे पत्रक सुरू केले . त्या पत्रकाच्या नावातच त्यांनी आपल्या मनाला निती आदर्शाचे दर्शन घडविलेले आहे . ते निती आदर्श म्हणजे सदाचार संपन्न नैतिकता ,चारित्र्यसंपन्नता, कर्तव्य पारायणता , समता ,स्वातंत्र्य व बंधुता हे सगळे कोणासाठी करायचे तर जनसामान्यासाठी . त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस . ही सगळी 'बापू ' ह्या प्रेमाच्या नात्याची व्यापकता आहे . .

वृत्तपत्र हे मदन (बापू) कोल्हे यांचे पोट भरण्याचे साधन नव्हते तर अन्यायग्रस्त माणसाला न्याय मिळवून देण्याचे शस्त्र ते शस्त्र त्यांनी आजपर्यंत धारदार ठेवलेले आहे . कोण्या धनिकाचे बटकुरेपण पत्करुन त्यांचे रखेलीत्व स्विकारलेले नाही.की कोण्या राजकारण्याच्या ताटाजवळचे मांजरही झालेले नाही,

म्हणून त्यांच्या नावाला 1985 पासून राव जोडून उच्चारण्याला सार्थक रूप आले. मदनराव कोल्हे , हे राव श्रीमंतीच्या थाटाचे नाही ,तर आदरयुक्त भीतीचे आहे 'उद्याच्या अंकात अमुकाचे वाचा' अशी तंबी देऊन ,जिरवुन चरण्याचे आडमुठ शहानपण दाखविण्याची भीती त्यांनी 53 वर्षाच्या पत्रकारितेच्या आयुष्यात कोणालाही, ही किमया केलेली नाही .की पत्रकार म्हणून पत्रकारितेचा तोराही मिरवलेला नाही व कधीही ज्येष्ठ पत्रकारितेचा आवही आणलेला नाही.त्यांची पत्रकारितेतील नम्रताही,पातीव्रत्य सोडण्याच्या पातळी पर्यंत आलेली नाही.ही त्यांची कधीच न संपणारी गडगंज श्रीमंती आहे .असले की दिवाळी आणि नसले की शिमगा ,अशी सा.धर्मभूमी वृत्तपत्र चालविण्याची मर्दुमकी कधीच केली नाही .'अंथरून पाहून पाय पसरविणे' ही त्यांच्या वृत्तपत्रकारितेच्या आयुष्यातील जमा खर्चाची कीर्द आहे साप्ताहिकाचे दैनिक ,दैनिकाचे पुन्हा साप्ताहिक आणि मग बंद साप्ताहिक,अशी वाताहात मदनराव कोल्हे यांनी आपल्या सा.धर्मभूमी पत्रकाची होऊ दिली नाही. पोटच्या लेकरासारखे वृत्तपत्र सा. धर्मभुमीला जगविले आहे .

समाजसेवेसोबतच नवतरुण पत्रकारांना मार्गदर्शन व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी , गेली ३३ वर्षांपासून पत्रकारांच्या विविध संघटनांशी सलग्न राहुन कार्य करत आहेत . मागील तीन वर्षांपासून अंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या , इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली चे महाराष्ट्र राज्यातील, परभणी जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे मदन ( बापू)कोल्हे पार पाडत आहेत, या शिवाय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतं असलेली राष्ट्रीय स्तरावरील ' महिला उन्नती संस्था (भारत) , या संस्थेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे , तसेच क्ल्यु इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट नवी दिल्ली चे सदस्य म्हणून त्यांना घेण्यात आलेले आहे.

मदनराव कोल्हे हे कॉम्रेड ही आहेत .1971 -72 मध्ये त्यांनी लाल निशाण पक्षांतर्गत ट्रेंड युनियन च्या मार्गाने रोड गॅंगमन ,इरिगेशनचे गॅंगमन ,कामगार ,कोतवाल ,साखर कारखान्यातील मजूर व शेतमजूर यांच्या समस्यांना वाचा फोडण्याची कामगिरी त्यांनी केलेली आहे .

त्यासाठी त्यांना काॅ. दत्ता देशमुख, यशवंत चव्हाण, एस के लिमये ,मधुकर कात्रे ,भास्कर जाधव व डी.डी. कुडले या काॅम्रेड नेते मान्यवरांचे मोलाचे सहकार्य व सहवास लाभलेला आहे. ही मदनराव कोल्हे यांची सहकार श्रीमंती .भौतिक साधन संपत्तीच्या दृष्टीने मदनराव कोल्हे फाटके माणूस आहेत पण त्यांनी आयुष्यभर आपले फाटकेपण न झाकता दुसऱ्याचे फाटकेपण झाकण्याचे कामं केलेले आहेत.जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचेच जगणे हे समाजाला मोठे करणारे असते ,म्हणून ते 'समाजभूषण' आहेत व,पद नाही कृतीचे .

14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ' जी जात नाही ती जात ' घालविण्याची व माणसाचा देव च बदलण्याची महान क्रांती केली, हे एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण की, आजही आमच्या बौद्ध बांधवात आंधवन ,लाडवन,सोमवंस आदी ही हिंदू धर्मातील घाणीच्या महारकीची गुलामगिरी बहुसंख्यांनी जपणारी आहेत. 1972 मध्ये बौद्ध उपासक मदनरावजी कोल्हे यांनी आपला विवाह आपल्या पोट जातीच्या बाहेर जाऊन केला ,म्हणून त्यांना त्यावेळी पोटजातभाईंशी संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष त्यांनी जिंकला .मदनरावचे ते मदनरावजी झाले . दुसऱ्याशी संघर्ष करुन जिंकणे सोपे, पण जवळच्याशी  संघर्ष करून जिंकणे सोपे नसते. संघर्षाचे बाळकडू मदनरावजी कोल्हे यांना आई-वडिलांकडूनच मिळालेले आहे. आज पर्यंतच्या आयुष्यात त्यांनी जे जे काही मिळवलेले आहे, ते ते संघर्षातुनच मिळविलेले आहे,म्हणून ते  'संघर्षसु्त ' मदनरावजी कोल्हे आहेत .

बाबू हरदास एल.एन.यांनी जात अंतर्गत ज्या साडेबारा उपजाती मोडण्यासाठी कार्य केले तसेच कार्य मदनरावजी कोल्हे यांनी अंशात्मक रुपात केले .एक मात्र निश्चित की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वप्रणाली,विचार कलंकीत करण्याचे पाप नाही केले आयुष्यात मदनराव कोल्हे यांनी जे ही काही केलं , ते सगळं 'सबका मंगल होय रे  !' या भावनेतून केले. म्हणून त्यांच्या पत्रकारितेचे कौतुक बुद्ध धम्म विचार प्रचारक भंतेजी मुखे जनसामान्यांच्या कानी गेलेले आहे . हे ही भाग्य त्यांच्या स्वच्छ करणीच्या पदरी पडलेले आहे.

मदनराव कोल्हे यांनी वृत्तपत्रीय प्रपंच नीतिमत्तेने केला ,आणि आपल्या संपादकीय लेखनाला हिनकसपणा येऊ दिला नाही .म्हणून सात दिवसाला धमकेतूप्रमाणे निघणारे साप्ताहिक धर्मभूमी मधील संपादकीय लेखनामुळे मदनराव कोल्हे हे आपल्या पत्रकारितेमधील मित्र परिवारात एका वेगळ्या उंचीने सर्वांना सुपरिचित आहेत .जेष्ठ पत्रकारितेशिवाय .'फाटके असावे पण स्वतःचे असावे' या बाण्याने त्यांच्या त्या स्वाभिमानी स्वभावाचा व निर्मळ हृदय असलेल्या कार्यरत सरळ मनाचा महाप्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे ,तो महाप्रसाद म्हणजे दर महिन्याला शासनाच्या तिजोरीतून लाख अंकांच्या भाषेतील चलनी रक्कम आपल्या घरी आणणारे शासकीय सेवेतील  तीन अधिकारी आहेत .दोन मुलं , एक सुनबाई .आज मदनरावजी कोल्हे हे भौतिक श्रीमंतीच्या बाबतीत ही ते गडगंज श्रीमंत आहेत.

  ' साधी राहणी,उच्च विचारसरणी 'असलेले,हसऱ्या चेहऱ्याचे मित्त भाषी व्यक्तिमत्व, 

मदनरावजी कोल्हे यांना ७६ व्या वाढदिवसानिमित्त

 हार्दिक ! हार्दिक !! हार्दिक !!! शुभेच्छा !

नमो बुद्धाय  !

जय भीम !! 


       लेखक - दि.फ.लोंढे 

           'फकीरा' निवास   ,

 अजिंठा नगर ,वांगी रोड, परभणी.

 मोबा. 81 800 20 358 

      / 98 902 015 8 7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या