🌟विश्व भूगोल दिवस विशेष : भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा,हेच दुर्दैव आपले....!


🌟भूगोल विषयाची बेइज्जतीच भूगोल दिनास मारक 🌟

अलीकडे भूगोल विषयाचे महत्त्व सर्वच संबंधितांना कळेनासे झाले आहे. शालेय पातळीवर तर सर्वच संबंधित मंडळी केवळ ४० गुणांचा विषय म्हणून त्याकडे दुर्लक्षित करतात. फक्त इंग्रजी, विज्ञान व गणित हेच जणू शालेय विषय असल्याचे मानून सामाजिक शास्त्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे विकासाच्या कोणत्याही समस्येमध्ये स्थानिक भूगोलाचे ज्ञान महत्त्वाचे असते. गाव आणि पंचक्रोशीचा भूगोलदेखील स्थानिक समस्या सोडविण्यास उपयोगी ठरतो. मात्र शासनाने फारसा विचार न करता "जिल्हा - भूगोल" ही संकल्पनाच सोडून दिली, असे इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमावरून लक्षात येते. असा श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजींचा हा संकलित लेख वाचनीयच...संपादक


    सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली सोसायटी दी जिओग्राॅफी, सन १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, सन १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, सन १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डीला ब्लैंचे यांनी योगदान दिले.

         गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात जियोमॅटिक्स आणि इतर संबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती- आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती, समालोचनात्मक भूगोल अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. यामुळे भूशास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.

          भूगोल दिनाचे कर्मकांड-

मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. मात्र भूगोल दिनाबद्दल गोल दिला जातो- काहीही माहिती दिली जात नाही. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी भूगोल दिन साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे... हेच दुर्दैव आपले! गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. विषयानुरूप दिन पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली आहे. मराठी दिन- २७ फेब्रुवारी, विज्ञान दिन-२८ फेब्रुवारी, तर संस्कृत दिन- आषाढस्य प्रथम दिवसे इत्यादी. त्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल. देशाच्या पातळीवरील भूगोल विषयतज्ज्ञ प्रोफेसर चं.धुं. ऊर्फ सी.डी.देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सन १९८६मध्ये पुणे येथे पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ.सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ.देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर भूगोल दिन म्हणून विशेषतः शालेय पातळीवर फक्त नावालाच सुरू आहे. मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी भूगोल दिन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जावेत. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जावेत, असे अभिप्रेत आहे. वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जावेत, हे अपेक्षित असते.

        अलीकडे भूगोल विषयाचे महत्त्व सर्वच संबंधितांना कळेनासे झाले आहे. शालेय पातळीवर तर सर्वच संबंधित मंडळी केवळ ४० गुणांचा विषय म्हणून त्याकडे दुर्लक्षित करतात. फक्त इंग्रजी, विज्ञान व गणित हेच जणू शालेय विषय असल्याचे मानून सामाजिक शास्त्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे विकासाच्या कोणत्याही समस्येमध्ये स्थानिक भूगोलाचे ज्ञान महत्त्वाचे असते. गाव आणि पंचक्रोशीचा भूगोलदेखील स्थानिक समस्या सोडविण्यास उपयोगी ठरतो. मात्र शासनाने फारसा विचार न करता "जिल्हा - भूगोल" ही संकल्पनाच सोडून दिली, असे इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमावरून लक्षात येते. एकूणच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांसाठी कृती-पुस्तिका, शिक्षकांसाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिका, शिक्षकांचे प्रबोधन, विषयातील नवनवीन संकल्पना व संज्ञा त्याचबरोबर संदर्भ पुस्तके या सर्वच बाबतीत निदान भूगोल विषयाबाबत अत्यंत उदासीनता निर्माण झालेली आहे. ही उदासीन वृत्ती एवढ्या टोकाला गेलेली आढळते की पाठ्यपुस्तके कशीही असोत, जड व बोजड असोत, असंख्य चुकांनी भरलेली असोत, त्यातील नकाशांचे स्वरूप कितीही चुकीचे व क्लिष्ट असो, वर्षानुवर्षे अशी पुस्तके तशीच शिकविली जातात! अध्यापकांनाही विषय-ज्ञान नसते, पदवीला विषय एक व अध्यापन दुसऱ्याच विषयाचे! असा प्रकार असल्यावर त्यांना आत्मविश्वास कसा वाटणार? याउलट विषयज्ञान पक्के असेल तर विषय अध्यापनाच्या विविध पद्धती- मॉडेल्स हाताळता येतील. पण प्रत्यक्षात शिक्षकांचे जाऊ द्या, तर डिटी.एड् किंवा बी.एड्ला जे मेथड-मास्टर्स असतात त्यांचाही पदवीला भूगोल विषय नसतो! तरीही असे बहाद्दर अध्यापक भूगोल विषय कसा शिकवावा? यावर खोट्या आत्मविश्वासाने शिकवित असतात! त्यांच्यासाठी तर ज्ञानरचनावाद ही सध्याची कळीची संकल्पना "कोसों दूर है!" अगदी खरं सांगायचं तर बालभारती व राज्य शिक्षण मंडळामधली तथाकथित तज्ज्ञ लेखकमंडळी पाठ्यपुस्तके तयार करताना केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत असतील व असंख्य चुका करीत असतील तर एकूणच आपल्या राज्यात भूगोल विषयाचे अध्यापन केवळ ‘दिन’ साजरे करून कसे सुधारणार? शेवटी दीनच राहणार.

         तज्ज्ञांच्या उ​द्विग्नतेची प्रमुख कारणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१३ मध्ये प्रकाशित झालेले १०वीचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक, हे पुस्तक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कसे घातक व भयानक आहे, हे स्पष्ट करूनही मंडळ त्यावर जून २०१८ पासून कार्यवाही करून बदल करणार. इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंत एकाही पाठ्यपुस्तकात भारतात पर्जन्यमानाचे वितरण दाखविणारा नकाशा अंतर्भूत केलेला नाही. चुका करणारे मंडळ पूर्वीच्या सरकारने बरखास्त केल्यावर विद्यमान सरकारने पुन्हा त्यातील कथित तज्ज्ञांना नवीन समितीवर घेतले आहे. विधानसभेत एकूण ४८ आमदार जोशात उभे राहिले व दहावीच्या पुस्तकाचा निषेध करून विविध शिक्षा सुनावीत होते. ते सर्व विरोधी पक्षातील आमदार आता स्वस्थ आहेत, कारण आता त्यांचे राज्य आले आहे. महाराष्ट्राच्या लोहमार्ग दाखविणाऱ्या नकाशात शिर्डी व उस्मानाबाद स्थानकांचा पत्ता नाही, तरीही तेथील आमदार काहीच कसे बोलत नाहीत? अशा १०० चुका दाखविल्यावरही शालेय शिक्षणखाते गप्प आहे. कशाला करावा साजरा भूगोल दिन? त्यापेक्षा श्राद्ध घालावा, असे वाटते. अशी भूगोल विषयाची बेइज्जतीच भूगोल दिनास मारक आहे, हे आधी ध्यानी घ्यावे लागेल.

!! भूगोल दिन निमित्त देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

 - संकलन व शब्दांकन -

              श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजी.

               रामनगर वॉर्ड,गडचिरोली.

               फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३.


                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या