🌟आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रभावी कामकाज करावे....!


🌟विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांचे परभणी जिल्हा प्रशासनाला निर्देश🌟 


परभणी (दि.18 जानेवारी) : आगामी काळात  होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्याची मतदार यादी अचूक, निर्दोष होण्यासाठी काळजीपूर्वक अचूक काम करावे, तसेच युवा नव मतदारांची जास्तीत-जास्त नोंदणी होण्याच्या दृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिले.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री. आर्दड हे बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त जगदिश मिणियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदानासाठी पात्र मतदारांची अचूक नोंद होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया ही अत्यंत काळजीपूर्वक राबविण्यात यावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती अचूक अद्ययावत करावी. मतदार यादीत नवमतदारांचा समावेश व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी जनजागृती करावी. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील 18 वर्ष पुर्ण असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनीची शंभर टक्के मतदार नोंदणी होईल याकरीता विशेष मोहीम राबवावी. जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर, युथ आयकॉन यांच्यामार्फत नवमतदारांना लोकशाही बळकटीकरणामध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. मतदार यादीमध्ये नावनोंदणीसाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना ही विभागीय आयुक्त श्री. आर्दड यांनी यावेळी दिल्या.


उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी यावेळी परभणी जिल्ह्याचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गंत सादरीकरणाद्वारे नवमतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न, नव मतदार नोंदणी, प्राप्त अर्ज, कार्यवाही केलेले अर्ज, स्वीकृत व नाकारण्यात आलेले अर्ज, प्रलंबित अर्ज, कार्यवाहीमध्ये येणाऱ्या अडचणी, मतदार केंद्र, मतदान केंद्रावरील अत्यावश्यक सुविधा,  ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदार जनजागृती, पदांचा आढावा यांची माहिती त्यांनी सादर केली सुरवातीस विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी परभणी तहसिल कार्यालयास भेट देवून निवडणूक विषयक बाबींची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या अभिरूप मतदार केंद्रास भेट देवून प्रत्यक्ष मतदान करून संबंधित कर्मचारी यांच्याकडून संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतलीं.


* विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा :-

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्याकडून जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. काळे यांनी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती/अतिवृष्टी अनुदान वितरण, दूष्काळ सदृश्य परिस्थिती, जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणी पातळी, टंचाईकृती आराखडा, जनावरांची संख्या व चारा उपलब्धता, आरोग्य सुविधा, शेतकरी आत्महत्या, शासकीय वसुली आणि पदांचा आढावा सादरीकरणाद्वारे सादर केला.

राज्यात परभणी जिल्ह्यात बालविवाहचे प्रमाण अधिक आहे. बालविवाह रोखण्यासठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. परंतू यामध्ये आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अचानक शाळा सोडणाऱ्या मुलींबाबत वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे. मुलींच्या पालकांची समस्या जाणुन घेत त्यांचे समुपदेशन करावे. तसेच मुलींसाठी एअर हास्टेस, फॉरेन लॅग्वेज,स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षणचे आयोजन करावे. तसेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या का होतात याचे संशोधन किंवा कारणे तपासावीत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक, आरोग्य, गावा-गावात स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण इतर उपक्रम राबवून मदत केल्यास शेतकरी आत्महत्या थांबण्यास नक्कीच मदत होईल असे विभागीय आयुक्त श्री. आर्दड यावेळी म्हणाले. 

यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते महानगरपालिका व नगरपालिका यांच्यातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व पंतप्रधान स्वनिधी योजना व रमाई घरकुल योजना यांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख वसंत निकम, जिपचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांच्यासह सर्व तहसिलदार आणि विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या