🌟परभणी येथील ऊर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रशासनाला सहकार्य करा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी गावडे यांनी नागरिकांना केले आवाहन🌟 

परभणी (दि. 22 जानेवारी) : परभणी शहरात सय्यद शाह तुराबुल हक येथे 01 फेब्रुवारी 2024 पासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे केले. 



जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी गावडे बोलत होते. यावेळी  खासदार श्रीमती फौजिया खान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, प्रादेशिक वक्फ बोर्ड अधिकारी खुसरो खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी सय्यद अमिनुज्जमा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

ऊर्सकाळात येथे येणाऱ्या अनुयायांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, सोयीसुविधांबाबतची माहिती देणारे फलक जागोजागी दर्शनी भागात लावणे, दुकानांचे परवाने सहज मिळावेत, यासाठी येथे संबंधित विभागांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देणे, मदत केंद्राचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिले. या काळात विविध परिसरातून संदल निघतात यामध्ये उंटाचा वापर करण्यात येतो या प्राण्यांची पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-यांनी तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच  शहरातील विविध भागातून येणा-या यात्रेकरू अनुयायांच्या प्रवासासाठी एसटी बसेस पुरविणे, अग्निशमन यंत्रणेच्या अधिका-यांकडून यात्रा काळात करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्यानुसार दुकानांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आयोजकांना दिले. 

वक्फ बोर्डाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक आणि जिल्हा व पोलिस यंत्रणेसोबत योग्य समन्वयन ठेवून यात्रा काळात यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  आयोजकांना केले आहे.ऊर्स यात्रा काळात महावितरणकडून विद्युत यंत्रणा चोख ठेवणे आणि यात्रास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिल्या. 

खासदार श्रीमती फौजिया खान यांनी ऊर्स काळात व्यापारी यांच्या दुकानांचे फायर ऑडिट करुन अग्नीशामक यंत्रणा बसविण्याची, या काळात बाहेरगावावरुन येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था, अग्नीशामक वाहनांसाठी वाहन जाण्याची व्यवस्था इत्यादी कामे वक्फ बोर्डाने करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तसेच  महानगरपालीकेने मनपांच्या रस्त्यांची  दुरुस्ती तसेच रस्त्यांवरील बंद लाईटची तात्काळ दुरुस्ती  करण्याची मागणी यावेळी केली.

यात्राकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यावसायिक दुकानदारांची संपूर्ण माहिती वेळोवेळी पोलीस विभागाला देणे अनिवार्य राहील. या काळात नाईट व्हिजन कॅमेरे संबंधित ठिकाणी लावणे, एलईडी स्क्रिनची व्यवस्था करणे तसेच या कालावधीत वक्फ बोर्डाने पोलीस यंत्रणेसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी आयोजकांना दिले. 

महानगर पालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे ऊर्स काळात महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणा-या सर्व सोयीसुविधांचे शुल्क वक्फ बोर्डाला भरावे लागणार आहे. तसेच महानगपालीकेच्या रस्त्यांची व रस्त्यांवरील बंद असलेल्या लाईटची दुरुस्ती महानगरपालीका करणार असल्याचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या यावेळी प्रशासनाकडे यावेळी केल्या......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या