🌟राष्ट्रीय मतदार दिन विशेष : प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्या : राष्ट्रीय मतदार दिन....!


🌟जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव होत असतो🌟

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव होत असतो. त्या लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार होय. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. त्याचे महत्त्व जाणून घ्या श्री. एन. के. कुमार जी. गुरूजींच्या या लेखातून... संपादक.    

       आपला भारतदेश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, प्रजासत्ताक- गणराज्य बनला. त्यासाठी तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव होत असतो. त्या लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार होय. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मौल्यवान आहे. एका-एका मताने येथे विरोधक जिंकतात आणि सत्ताधीश कोसळतात. म्हणूनच अरुणाचल प्रदेशमध्ये एका मतदारसंघात असेही एक मतदान केंद्र उभे करण्यात आले होते. जेथे फक्त एकाच मतदाराची नोंद करण्यात आली आहे. हयुलियांग मतदारसंघातील हे केंद्र देशातील सर्वात छोटे मतदार केंद्र होते. अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात हयुलियांग मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अत्यंत तुरळक मतदार आढळतात. यातील सर्वात पूर्वेकडील मालोगाम मतदार केंद्रात मागच्या लोकसभेला केवळ दोन मतदारांची नावे नोंदवण्यात आली होती. यावेळी मात्र एकाच मतदाराचे नाव नोंदवण्यात आले. हे मतदान केंद्र सर्वात छोटे केंद्र ठरले होते. पण एका मतदारासाठी देखील येथे मतदान घ्यावेच लागेल, अशी सूचना निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाला केली होती.

    अधिकाधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकार दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करते. दि.२५ जानेवारी १९५० हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस होता. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरा केला जातो. स्वागत भाषणातून कार्यक्रम सुरू होतो, लोकनृत्य, नाटक, संगीत, वेगवेगळ्या थीमवर चित्रकला स्पर्धा इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचे मूलभूत अधिकार आहेत. देशाच्या नेतृत्वात, सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यास, बदल घडवून आणण्यास सक्षम वाटतो, असा नेता निवडीचा प्रत्येक मतदाराला अधिकार आहे. मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत प्रभावी सहभाग वाढवणे आवश्यक आहे. यापूर्वी मतदारांचे पात्रता वय २१ वर्षे होते; परंतु १९८८मध्ये ते कमी करून १८ वर्षे केले गेले. भारतीय तरुणांची राजकीय जागरूकता पातळी प्रौढांपेक्षा खूपच जास्त आहे आणि येत्या काळात ते देशातील राजकीय बदलांमध्ये सर्वांत मोठे योगदान देतील. भारत हा युवकांचा देश आहे व त्यामुळे युवापिढीशी सहभागासाठी संवाद अत्यावश्यक आहे. येथेच नवतंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान आता प्रत्येक मतदाराच्या हाती आले आहे. त्यामुळे सभा घरबसल्या फोनवरच ऐकता येतात. त्यासाठी सभास्थानी जायची गरज नाही. यापुढची पायरी गाठण्याची वेळ आता आली आहे. मतदान केंद्रात न जाता मोबाइल अथवा संगणकावर आॅनलाइन व्होटिंग निवडणूक आयोगाने एक पर्याय म्हणून स्वीकारले पाहिजे. अनेक मतदारांना प्रत्यक्ष मतदान अनेक सबळ कारणाने इच्छा असूनही करता येत नाही. अशा मतदारांना हा पर्याय मिळेल व त्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स आणि नॉर्वे या देशांनी याचे प्रयोग केले आहेत. व्होटर हेल्पलाइन अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील मतदारांची नावे पडताळणीस मतदारांना ते वापरता येते. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्यांच्यासाठी निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचा वापर केल्याने अनेक गैरप्रकार टळत आहेत. मतदारसंघातील डि-डुप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करून मतदार यादीतील एकाच नावाच्या विविध व्यक्तींची ओळखपत्राद्वारे खातरजमा केली आहे. पूर्वी अनेक मतदारसंघांत समान नाव असण्यामुळे गैरप्रकार होत असत. मुख्यालयाशी सीसीटीव्ही जोडून रेकॉर्ड करणे, ड्रोन कॅमेरे मतदान केंद्रावर टेहेळणीसाठी वापरावे व त्या माहितीचे वेब अ‍ॅनॅलिटीक्सद्वारे पृथक्करण करून फक्त अपवादात्मक विशेष परिस्थितीचे नियंत्रण करता येणे शक्य आहे. निवडणुकांदरम्यान नागरिकांना आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाचा अहवाल देण्यासाठी सिव्हिजिल हे एक अभिनव मोबाइल अ‍ॅप आहे. कुठलाही नागरिक ही सेवा वापरू शकतो. या अ‍ॅपचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ स्थान ग्रहणासह थेट फोटो-व्हिडीओला अनुमती देते. कुठल्याही प्रकारची आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची घटना पाहिल्यानंतर काही मिनिटांतच आयोगाला कळू शकते व त्यावर गरज पडल्यास सुधारात्मक कृती करता येऊ शकते. पूर्वी ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ होती. आपल्याकडे सन २०१४ला झालेल्या निवडणुकीपासून सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय व्यक्ती आणि पक्षांच्या ध्यानात आले. या संवादमाध्यमाचा वापर खूप वाढला आहे. सतत बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, थ्रीडी होलोग्राम, इंटरअ‍ॅक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स आणि यूट्यूबचा वापर सर्व पक्ष आणि उमेदवार कमीअधिक प्रमाणात करीत आहेत. त्याचा युवा मतदारांवर सकारात्मक परिणाम होत आहे. सोशल मीडिया सामाजिक आहे आणि त्यानुसारच त्याची शक्ती वापरली जावी. जर कोणी प्रतिक्रिया दिली किंवा प्रतिसाद दिला तर हे एखाद्या नागरिकाचे डिजिटल पत्र समजून ऐकले पाहिजे. युवा मतदारांची वाढलेली जाणीव, जात, धर्म आणि वक्तृत्व यांच्या वक्तव्याच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. युवा पिढीचे प्रश्न साधे आहेत. रोजगार, राहणीमान, पायाभूत सुविधा, सुरक्षा यांसारख्या बाबी आता कुठलाही पक्ष दुर्लक्षित करू शकत नाही. 

     लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे ती सहभागाची! दुर्दैवाने अनेकांना असे वाटते की, जनता आणि लोकप्रतिनिधी हे दोन परस्परांपेक्षा भिन्न आणि संपूर्णत: स्वतंत्र असे घटक आहेत. वास्तवात लोकशाहीच काय? परंतु कोणतीही राज्यपद्धती ही नागरिकांच्या सहभागाशिवाय चालू शकत नाही. हा सहभाग निव्वळ मत देणे आणि व्यक्त करणे एव्हढ्या पुरता मर्यादित नाही. स्थानिक नगरसेवकाकडे महत्त्वाचे प्रश्न नेण्यापासून ते प्रसंगी शासन निर्णयाविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्यापर्यंत आपल्या सर्वांना लोकशाहीत नियमित सामील व्हायला हवे. आजची आधुनिक संपर्क माध्यमे हे आपल्याला गवसलेले नवे वाहन आहे. त्यातल्या प्रवासाचे गूज आपण सारेच आत्ता अनुभवत आहोत. तुम्ही निवडून दिलेले नेते- सरकार हे तुमच्या देशाची उन्नती साधक ठरेल. ते पोटभरू आपमतलबी व अधोगतीकारक ठरू नये. म्हणून भानावर राहून मतदान केले पाहिजे, उमेदवाराच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता! घोटभर दारू, पार्टी, धोतर-लुगडे हे क्षणाची किंवा काही महिन्यांचीच तुमची गरज भागवेल, मात्र पाच वर्षापर्यंत विकास शून्यावस्थेत राहून उलट भकासच भकास होत जाईल, म्हणून मतदार राजा, या दिवसाची मनोमन आठवण ठेऊन सावधपणे मतदान कर, मात्र अवश्यच कर!

!! राष्ट्रीय मतदार दिन चिरायू होवो !!

   श्री. एन. के. कुमार जी. (से.नि.प्रा.शिक्षक).

                              द्वारा- श्री गुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ.

                              मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.

                             जि. गडचिरोली, चलभाष- ७७७५०४१०८६


                            .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या