🌟परभणी जिल्ह्यात 3 लाखावर लाभार्थ्यांना मिळणार ‘शिधा संच’....!


🌟लाभार्थ्यांना 100 रुपयांमध्ये शिधा संच मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी सांगितले🌟 

परभणी (दि.23 जानेवारी) : राज्य शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजना नियमित मोफत धान्य योजना या व्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा शिधा संच मिळणार आहे. यामध्ये प्रत्येकी 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनादाळ, मैदा व पोहा या शिधाजिन्नसांचा समावेश असून, जिल्ह्यातील 3 लाख 13 हजार 882 पात्र लाभार्थ्यांना 100 रुपयांमध्ये शिधा संच मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी सांगितले आहे. 

 जिल्ह्यात अंत्योदय योजनेत  44 हजार 422 शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंब योजनेत 2 लाख 32 हजार 736 शिधापत्रिकाधारक आणि एपीएल शेतकरी योजनेत 48 हजार 714 शिधापत्रिकाधारक असे एकूण 3 लाख 25 हजार 872 शिधापत्रिकाधारकांची संख्या असुन यापैकी पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीत वितरीत करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी जिल्हा पुरवठा विभाग परभणीमार्फत शासनाकडे नोंदविण्यात आली असून, त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी शासनाकडून 3 लाख 13 हजार 882 शिधाजिन्नस संच मंजूर करण्यात आले आहेत.

शिधाजिन्नस संच कंत्राटदारामार्फत तालुका गोदामांपर्यंत पोहोचणार आहेत. शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस एफएसएसएआय मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून प्राप्त करून घेतल्यानंतरच हे स्विकारण्याच्या सूचना शासनास्तरावरून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिधाजिन्नसांचा समावेश असलेला ‘शिधासंच’ शिधापत्रिकाधारकांनी 100 रुपयांमध्ये संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या