🌟परभणी जिल्ह्यात नवमतदारांची टक्केवारी वाढली : जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांची माहिती.....!


🌟जिल्ह्यात 28 हजार 370 मतदारांची नोंदणी तर 25 हजार 199 मतदारांची वगळणी🌟

परभणी (दि.23 जानेवारी) : परभणी जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा महसूल प्रशासनाने अन्य यंत्रणांच्या सहकार्याने मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातून या जिल्ह्यात अंतिम मतदार यादीत नवमतदारांच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

           निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून 2024 च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबवला गेला.

            या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत 28,370 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 25,199 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 3,171 मतदारांची निव्वळ वाढ  होऊन एकूण मतदारांची संख्या 14,82,365 इतकी झालेली आहे. त्यानुसार 401 पुरुष मतदारांची 2,770 स्त्री मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 923 वरून 926 इतके झाले आहे.

           या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 9,951 मतदारांची नव्याने भर पडली आहे तसेच 20 ते 29 या वयोगटात 9,119 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 वयोगटाची मतदार संख्या 8,062 (0.55 टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीमध्ये 18,013 (1.22 टक्के) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मत संख्या 3,10,570 (21.00 टक्के) होती, ती अंतिम यादीत 3,19,689 (21.57) टक्के इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयामध्ये एकुण 44 मतदार नांदणी कॅम्प घेवून राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमध्ये या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या