🌟मार्गशीर्ष शुद्ध एकादशी- पवित्र गीता जयंती विशेष : गीतारुपी अमृत अर्जूनासह संपूर्ण विश्वाला अर्पण.....!


🌟मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो🌟

      _समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा दर्जा मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक प्रायः विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. संग्रही असावी अशी गीता ग्रंथाबद्दल माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींच्या पावन शब्दात... संपादक_

 मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषतः आणि महानता प्रकर्षाने दिसून येते, म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी म्हटले आहे की, "माझे शरीर आईच्या दुधावर पोसले; त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. गीता माझे प्राणतत्त्व होय!"

         "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः||

         न चैनं क्लेदन्त्यापो न शोषयति मारुतः||"

(पवित्र श्रीमद्भग्वद्गीता: अध्याय- २: श्लोक- २३)

[भावार्थ: यांना- आत्मा व परमात्मा यांना शस्त्रे तोड़ नाहीत, अग्नी जाळू शकत नाही. तसेच पाणी भिजवत नाही अथवा वायू सुकवित नाही.) याचा अर्थ असा की, आत्मा आणि परमात्मा अजरामर आहेत. त्यांच्यावर पंचमहाभूतांचा कोणताच प्रभाव पडू शकत नाही. म्हणून आपला आत्मा परमात्म्याशी तादात्म्य पावला पाहिजे, तो आत्म्यात विलीन होणे, मानवाच्या ब्रह्मज्ञान प्राप्तीनेच संभव आहे.

         समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा दर्जा मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला आहे. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतेसंबंधी म्हटले आहे की, "वेद, उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानशा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते." पांडुरंगशास्त्री पुढे सांगतात की, निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. 

        "यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।

        शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥"

[पवित्र श्रीमद्भग्वद्गीता: अध्याय- १२: श्लोक - १७ वा.]

(भावार्थ : असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.) याचा अर्थ असा की, एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदीत होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. आपला स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे.

        भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्‍गीता. गीतेतील शिकवण ही कालातीत असून, आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते. हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखित होते, असे सांगितले जाते. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटलेय गीतेत? जाणून घेऊया...

         "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

         मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥"

(पवित्र श्रीमद्भग्वद्गीता: अध्याय- २: श्लोक- ४७.)

[भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; पण, कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.] याचा अर्थ असा की, मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते, असे म्हणतात. 

         महाभारतात जेव्हा कौरव हे पांडवांना फसवतात आणि त्यांना त्यांचा वाटा देत नाहीत, तेव्हा महाभारताचे युद्ध सुरू होते. कुरुक्षेत्रात एका बाजूला कौरव आणि दुसरीकडे पांडव होतात. पण आपले भाऊ, शिक्षक, आजोबा बघून अर्जुन त्यांना मारण्याचा धाडस करत नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या विशाल रूपाची ओळख करून देतात आणि संपूर्ण सृष्टीला गीतेचे अनमोल ज्ञान देतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी करून गीतेचे अनमोल ज्ञान जीवनात आणण्याचा प्रयत्न केला जातो. गीता जयंती आज शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी गीता जयंती साजरी केली जाईल. गीता जयंती हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद्गीता यांचा जन्म आहे. यंदा गीताची ५१६०वी जयंती आहे. या दिवशी गीता, भगवान श्रीकृष्ण आणि वेद व्यासजींची पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो.

       "एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।

        सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥"

(पवित्र श्रीमद्भग्वद्गीती: अध्याय- १०: श्लोक- ७वा.)

[भावार्थ : जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरुपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही.] याचाच अर्थ असा आहे की, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, असे सांगितले जाते.

        "न हि देहभृता शक्यं त्यक्त्युं कर्माण्यशेषतः|

         यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते||"

(पवित्र श्रीमद्भग्वद्गीता: अध्याय- १८: श्लोक- ११वा.)

[भावार्थ: कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपपणे त्याग करणे शक्य  नाही. म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो, त्यालाच खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे.] याचाच अर्थ असा की, पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. मात्र त्या कर्मातून मला नेमके तेच फळ मिळायला हवे होते, ही भावना नको. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो, असे सांगितले जाते.

        "कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।

        इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते॥"

[पवित्र श्रीमद्भग्वद्गीता: अध्याय- ३रा: श्लोक- ६वा.]

(भावार्थ : मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र, मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्या विषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो.) याचा अर्थ असा की, दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या, निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते.

        गीता जयंतीला मोक्षदा स्मार्त एकादशी असेही म्हणतात. मोक्षदा एकादशीचे व्रत गीता जयंतीच्या दिवशीच ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि मोक्षदा एकादशी व्रताची कथा ऐकली जाते. त्याच्या पुण्यप्रद फळाने मनुष्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी समजूत रुढ आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली आहे. गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आहेत, ज्यामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञानयोग यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. भ.श्रीकृष्णजींनी अर्जुनाला माध्यम बनवून मानवाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. वर्तमानात जगणे आणि फळाशिवाय कर्म करणे हे माणसाच्या ताब्यात असते. आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. शरीराशी संलग्न होऊ नका, आत्मा शुद्ध करा आणि मोक्षाचे ध्येय ठेवा. जशा अनेक मौल्यवान शिकवणी गीतेत आहेत. सदर ग्रंथराज म्हणजेच आध्यात्मिक क्रांतीचा अनमोल ठेवा आहे, हे येथे उल्लेखनीयच!

!! पवित्र ग्रंथराज श्रीमद् भग्वद गीता जयंतीच्या सर्व हिंदू बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

   - संकलन व सुलेखन -

                    श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.

                    द्वारा: प.पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास,

                    मु.रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                    फक्त मधुभाष-  7132796683.


                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या