🌟परभणी जिल्ह्यातील उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘इग्नाईट महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ते बोलत होते🌟 

परभणी (दि.05 डिसेंबर) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून जिल्ह्यातील उद्योजकांनी आपला उद्योग वाढविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘इग्नाईट महाराष्ट्र’ या एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.  यावेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्यासह मान्यवर आणि जिल्ह्यातील उद्योजक आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना विशेषत: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्यातील पोहचणे आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवे उद्योजक निर्माण होण्यास मदत होईल. ताकदीने स्टार्टअपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रोजगार मिळू शकेल. सीएमईजीपी तळागाळात पोहचवू शकलो, तर अनेक लोकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. बँकांनी देखील सकारात्मक दृष्टीकोन ठेवत नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे म्हणाले की, एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्याची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासासाठी राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग, त्याचे उपक्रम योजना उद्योग संचालनालयाकडून हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. डीजीएफटी, सिडबी, पोस्ट ऑफीस व ओएनडीसी इ. विभागाच्या राबविण्यात येणा-या योजनांमध्ये उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी कार्यशाळेत विविध मान्यवरांनी आणि उद्योजकांनी विविध उद्योगा विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, उत्पादक प्रक्रिया उत्पादक केंद्र तसेच राज्य शासन आणि संबंधित उपक्रमाचे अधिकारी, बँक प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या