🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक घेण्याचे राज्य सरकारचे संकेत.....!


🌟शिख धर्मीयात आनंदाचे वातावरण🌟

नांदेड/प्रतिनिधी- सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकी संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व नांदेड दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात महसूल मंत्री विखे पाटील यांनी निवडणूक लवकरच घेण्यात येणार असल्याचे संकेत दिल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


  सिख धर्मियांची दक्षिण काशी मानले जाणारे जागतिक ख्यातीचे सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक मागील वर्ष 2021 पासून झालेली नाही. राज्य शासन नियुक्त प्रशासकांच्या माध्यमातून बोर्डाचा कारभार सध्या सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या हस्तक्षेपातून आलेल्या प्रशासकांमुळे गुरुद्वाराचा कारभार मनमानी होत असल्याने तात्काळ गुरुद्वारा बोर्डाची निवडणूक घेऊन लोकनियुक्त अध्यक्ष व्हावा याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी 2022 मध्ये उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका क्र.1005/2022 दाखल केली होती. या याचीकेवर निर्णय देत तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असताना राज्य शासनाकडून योग्य ती कारवाई केली नाही . त्यामुळे नंबरदार यांनी अवमान याचिका क्र.511/2023 दाखल केली आहे.  या याचिका संदर्भात व समाजातून निर्माण होत असलेला रोष लक्षात घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला असता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुद्वारा बोर्डाची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. महसूलमंत्र्यांनी निवडणूक घेण्याचे संकेत दिल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


   गुरुद्वारा बोर्ड निवडणूक घेण्यासंदर्भात याचिकाकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी वारंवार न्यायालयीन लढाई करून समाज बांधवांची बाजू मांडलेली आहे. याची दखल घेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आ. हंबर्डे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविल्याने नंबरदार यांनी दोघांचेही व्यक्तिशः  आभार मानले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या