🌟आंतरराष्ट्रीय चहा दिन विशेष : जगात लागतो, पाण्यानंतर चहाचा नंबर.....!


🌟जगभरातील काही देशात १५ डिसेंबर हा दिवस वर्ल्ड टी डे- जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो🌟

जगभरात टी-चहाचे उत्पादन करणारे देश आज १५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करत आहेत, पण भारताच्या शिफारशीवरून युएन- संयुक्त राष्ट्राने  २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केला आहे. मिलान येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि एफएओ- कृषी संघटनेने आंतरसरकारी गटाच्या बैठकीत भारताने हा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने चहाच्या औषधी गुणधर्मासोबतच सांकृतिक महत्व मान्य केले आहे. दि.१५ डिसेंबर २००५ साली आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची सुरूवात नवी दिल्ली येथे झाली होती. त्यानंतर हा दिवस श्रीलंकेत साजरा केला गेला. तिथून तो जगभरात साजरा केला जाऊ लागला.        

           जगभरातील काही देशात १५ डिसेंबर हा दिवस वर्ल्ड टी डे- जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे.

          चहाचे बदलते स्वरूप: दैनंदिन जीवनात चहाचे महत्व वाढत चालले आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांचा ग्रीन टी, ब्लॅक टीकडे कल अधिक वाढत चालला आहे. चहाचे सेवन प्रमाणात केले, तर ते अमृताचे कार्य करते, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात आसामच्या पर्वत भागात सन १८२४ दरम्यान चहाची पाने सापडली. त्यानंतर इंग्रजांनी सन १८३६पासून चहाचे उत्पादन सुरु केले. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागात चहाच्या बियांचा वापर सुरू झाला. भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केले जात असे. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिद्ध आहे. भारतील अनेक नागरीकांची आनंदी व उत्साही सकाळ चहा पिल्यानंतर सुरू होते. भारत, चीन, केनिया आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. याव्यतिरिक्त, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया, टांझानिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते. चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यात कर्ता देश आहे. भारतातही चहाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पण स्थानिक स्तरावर त्याचे सेवनही मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केले जाते.

       चहाचे फायदे: चहामध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात. चहामध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो. चहामध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो. चहामध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो. चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढीच्या नुकसानापासून वाचवतो. चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. जगात पाण्यानंतर चहा हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे. उत्तर भारत, उत्तर म्यानमार आणि नैऋत्य चीन हे चहाचे उगमस्थान मानले जाते. येथील अनेक लहान-मोठी कुटुंबे चहाच्या शेतीत गुंतलेली आहेत. त्यामुळे चहाचा वापर आणि मागणी वाढवण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा उद्देश चहाचे उत्पादन वाढवून त्याबद्दल जागरूकता पसरवणे आणि भूक आणि गरिबीमध्ये त्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. चहाचा अर्थ फक्त दूध असलेला चहा असा नाही तर चहापानांचे इतरही अनेक प्रकार आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी अशा ५ हर्बल टी- चहाचा उल्लेख करतो, जे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. १) ग्रीन टी- हिरवा चहा: वजन कमी करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध ग्रीन टी प्यायला जाऊ शकतो. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असते, जे फॅट सेल्स कमी करते आणि फॅट बर्न करण्यास मदत करते. ते दिवसातून दोनदा प्यायला जाऊ शकतो. २) हळद चहा: हा हर्बल चहा घरी बनवता येतो. यासाठी तुम्हाला कच्ची हळद घ्यावी लागेल. कच्च्या हळदीचे छोटे तुकडे करून एक कप पाण्यात टाकून उकळा. त्यात तुम्ही सामान्य चहाच्या पानांचे काही दाणे टाकू शकता. तुमचा हळदीचा हर्बल चहा तयार आहे, तो गाळून प्या. हा चहा प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होते, वजन कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासही मदत होते. ३) तुळशी हर्बल चहा: हा चहा तुळशीच्या पानांपासून बनवून प्यायला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या सामान्य चहामध्ये तुळशीची पाने देखील घालू शकता किंवा काळ्या चहामध्ये तुळशीची काही पाने शिजवू शकता. हा चहा चयापचय प्रक्रियेसाठी विशेषतः चांगला आहे. ४) काळा चहा: जास्तीत जास्त ऑक्सिडेशन प्रक्रियेतून जावून ब्लॅक टी बनवला जातो. वजन कमी करण्यासाठी या चहाचा चांगला परिणाम होतो. काळा चहा दिवसातून  दोन ते तीन कपपर्यंत प्याला जाऊ शकतो. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही या चहाचे सेवन करू शकता. ५) ओलोंग चहा: ओलोंग चहा हा पारंपारिक चायनीज म्हणजेच चायनीज चहा आहे. त्याचा सुगंध फ्रूटी आहे आणि त्याची चव खूप वेगळी असते. चयापचय सुधारण्यासाठी आणि चरबी जाळण्याची शक्ती वाढवण्यासाठी ओलोंग चहाचे सेवन चांगले आहे.

          ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चहाच्या योगदाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी भारताने दिलेल्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. युएनच्या मते २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्याने त्याचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी मदत मिळेल. ही मदत ग्रामीण भागातील भूक आणि गरिबीशी लढण्यासीठी महत्वाची ठरेल. संयुक्त राष्ट्राने त्यांचे सदस्य असलेल्या सर्व देश, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्याचे आवाहन केले. भारत, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानिया व्यतिरिक्त इतर अनेक देश १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करत आहेत. परंतु मे महिना हा चहा उत्पादनासाठी सर्वोकृष्ट महिना मानला गेल्याने युएनने निवडला आहे. दरम्यान, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारतात काळ्या चहाचे उत्पादन २०२७पर्यंत १६.१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सन २०१७मध्ये ते १२.६ दशलक्ष टन होते. तर, त्याच वेळी जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या चीनमध्ये ग्रीन टीचे उत्पादन सन २०१७मध्ये १५.२ दशलक्ष टनांवरून २०२७पर्यंत ३३.१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, हे येथे विशेष उल्लेखनीय!

!! आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या सर्व भावाबहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

         - संकलन व सुलेखन -

                   श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                  रामनगर वॉर्ड, गडचिरोली, 

                  फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.


              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या