🌟भारतीय राज्यघटनेने शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर...!


🌟चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन करण्यासाठी राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती🌟


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमीवर  जनसागर उसळला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो नागरिकांची गर्दी उसळली होती.

भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही डॉ बाबासाहेब आंबेडकर  प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले होते.  स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती

जातीव्यवस्थेने अस्पृश्य समाजाला दिलेल्या गुलामीच्या बेड्या तोडताना समाज परिवर्तनासोबत सशक्त भारताच्या निर्मितीसाठी दिशा दाखवण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक पुढील वर्षी तयार होणार -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

*पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.* *सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.*

 * विद्रोही,आंबेडकरी गीतांचा जागर ते पुस्तक खरेदीसाठी गर्दी :-

आंबेडकरी, विद्रोही गीतांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यात आले.काही शाहिरी कलापथकांकडून आंबेडकरी, विद्रोही गीते सादर करण्यात आली. तर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रतिमा घेण्यासाठीदेखील लोकांची गर्दी दिसून आली. त्याशिवाय, छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आणि परिसरात असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री होत असल्याने त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शासन आणि इतर प्रकाशकांच्या स्टॉलवर लोकांची गर्दी दिसून आली.

* चैत्यभूमी परिसरात व्यवस्था :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, मुंबई महापालिकेसह इतर अनेक संस्था संघटनांच्यावतीने चैत्यभूमीवर अनुयायांसाठी विविध व्यवस्था केली होती. तर, रेल्वेने अतिरिक्त वाहतूक सोडण्यात आली होती. तर, बेस्ट प्रशासनानेदेखील बसेस सोडल्या होत्या. तर, विविध संस्था, संघटनांच्यावतीने अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या