🌟राष्ट्रीय किसान दिन सप्ताह विशेष : कधी असतो बरं,राष्ट्रीय महिला शेतकरी दिन....?


🌟आज २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून भारत देशभर साजरा होत आहे🌟

आज २३ डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय किसान दिन आहे. आज शेतकरी प्रचंड आर्थिक तणावग्रस्त अन् मानसिक विवंचनेत आहे. चला तर, आजच्या दिनानिमित्त या परिस्थितीतून आपल्या अन्नदात्यास बाहेर काढण्याचा निर्धार आपण सर्वजण करुया! अत्यंत प्रेरणादायी असा शेतकरीपुत्र- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा लेख....संपादक


   आज २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून भारत देशभर साजरा होत आहे. एकीकडे भारत महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो, दुसरीकडे त्याच देशातील शेतकऱ्यांना त्याच्या शेती व्यवसायासाठी कुठलीही सुविधा मिळत नाही. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आहे. कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. शासनासह समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे  आहे.

     हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जून हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा हवा तसा परिणाम शेतकऱ्‍यांच्या जीवनात झाल्याचे दिसून येत नाही. राज्यात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी त्यांचे नातू आणि तत्कालीन राज्य सरकारमधील कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१७ पासून १५ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्याचीही अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हे सर्व पाहून शासन-प्रशासनाला राज्यातील शेतकऱ्यांबाबत फारच कळवळा आहे, असे दिसून येते. एवढा कळवळा शेतकऱ्यांविषयी आहे, तर मग त्यांच्यावर नवीन नियम व कायदे बळजबरीने का लादले जातात? त्यांना आपल्या क्षुल्लक मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आदी मार्गांचा अवलंब वारंवार का करावा लागतो? आज फार मोठ्या आर्थिक, मानसिक विवंचनेतून हा शेतकरी जात आहे. कोणत्याही समस्येने बळीराजाला-शेतकऱ्याला ग्रासले असेल, तर त्याला मदतीचा हात नक्की दिला पाहिजे. ही जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे.

     भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस २३ डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची- नाबार्ड त्यांनीच स्थापना केली. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये २००१ साली चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तो आजही सुरू आहे. देशातील मंत्री, अधिकारी, उद्योजक, कर्मचारी, व्यापारी यांना शेतकऱ्यांबद्दल काहीच निष्ठा नाही, असे खेदाने म्हणावे लागत आहे. प्रशासनात अनेक शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्यांनी बापाचे कष्ट जवळून पाहिले असतानाही त्याचा कैवार घेण्यास बहुतांश जण तयार होत नाहीत. नोकरदारवर्ग 'फिक्स रेट' सांगणाऱ्या व्यापाऱ्यांकडे भाव करत नाही. मात्र तो अन्नदात्याकडे शेतमाल व भाजीपाल्याचा भाव कमी करण्याचा आग्रह धरतो. व्यापारीसुद्धा ठोक व्यवहारात भाव कमी करण्यास भाग पाडतो व आपण मात्र चिल्लर विक्री म्हणून चढ्या दराने विकतो आणि शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेतीमालावर गडगंज पैसा कमावतो. म्हणूनच आज परत म्हणावसं वाटतंय, मातीतून सोन्याहून मोल्यवान असं अन्न उगवणारे तुम्ही, काळाच्या या ओघाला घाबरू नका! तुमच्या मनगटात ती धमक आहे, ज्याला घाबरून हा दुष्ट काळसुद्धा समोर उभारणार नाही. लढा, आत्तापर्यंत लढत आलात, तोच लढा चालू ठेवा. एक ना एक दिवस या जगाला तुमचे अस्तित्व मान्य करावेच लागेल. या निमित्ताने एवढंच सांगावंस वाटतंय, एक तास जेवायला उशीर झाला तर आपली काय अवस्था होते? जेवणात जर फक्त पाणीच मिळायला लागलं तर मग काय होईल? कल्पनाच करवत नाही! पण, आपले शेतकरी असेच मरत राहिले तर शेती उरणारच नाही. वेळीच उपाय, योग्य निर्णायक योजना, त्यांना मानसिक आधार, त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, या व अशा अनेक योजना राबवून या दृष्ट चक्रातून शेतकऱ्यांना वेळीच बाहेर काढावे लागेल. बळीराजाचं अस्तित्व नाकारलं, तर या जगातील समस्त मानवजातीचं अस्तित्व संपुष्टात येण्यास कितीसा वेळ लागेल? याचा विचार करा.

     सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे. त्याच्या कष्टाची कदर झाली पाहिजे. त्याच्यासाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष त्याच्या बांधापर्यंत पोचल्या पाहिजेत. अनेक बांधवांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा? हे त्यांना कळत नाही. समाजात कितीतरी शेतकरी आधुनिक आणि पारंपरिक शेतीत योग्य तो समन्वय साधून शेती करू शकत नाही. त्याला योग्य तो शेतीपूरक जोड-धंदा कसा करायचा? याबाबत माहिती आपण देऊ शकतो. शेतकऱ्यांना सुखी-समाधानी आणि तृप्त जीवन जगण्यास आपण त्यांना धीर देऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात आपल्याला या व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना या विषयी माहिती देऊन शक्य तेवढी मदत केली पाहिजे. चला तर मग आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त एक निर्धार करू आणि आज आपला शेतकरी ज्या परिस्थितीत जगतोय त्याला यातून आपल्या मदतीने बाहेर काढू. इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो, अशी मनोकामना उरी बाळगुया! भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. आज शेतकरी प्रचंड आर्थिक तणाग्रस्त अन् मानसिक विवंचनेत आहे. सततची अवकाळी स्थिती आणि नासधूस, दरवर्षीची नापिकी तसेच कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी राजा नाउमेद झाला आहे. चला तर, आजच्या दिनानिमित्त या परिस्थितीतून आपल्या अन्नदात्यास बाहेर काढण्याचा निर्धार आपण सर्वजण करुया!

!! राष्ट्रीय शेतकरी दिन चिरायू होवो !! 

         - संकलन व शब्दांकन -

                        श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                        (शेती प्रश्नांचे गाढे अभ्यासक)

                        मु. जि. गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६.


             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या