🌟वैभवने वाढवले वाशीमच्या अभ्यासकेंद्राचे वैभव : सावित्रीबाई फुले अभ्यासकेंद्राचा बहुमान....!


🌟वैभव बाबाराव सावंत याने नुकत्याच झालेल्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात रनिंगमध्ये विद्यापीठातून पटकावला प्रथम क्रमांक🌟  

फुलचंद भगत

वाशिम:-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशीम या अभ्यासकेंद्राचा विद्यार्थी वैभव बाबाराव सावंत याने नुकत्याच झालेल्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात रनिंगमध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी चमकदार कामगिरी करून वैभवने आपल्या अभ्यासकेंद्राला वैभव प्राप्त करून दिले आहे. 


मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव 2023 नुकताच नाशिक येथे 14 आणि 15 डिसेंबर रोजी पार पडला. या महोत्सवात पंधराशे मीटर रनिंगच्या स्पर्धेत वैभव सावंत याने हे यश संपादन केले. तो सावित्रीबाई फुले अभ्यासकेंद्राचा बीकॉम द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. हे यश मिळवून अभ्यासकेंद्राचा बहुमान वाढविल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मेघा देशमुख, केंद्र संयोजक डॉ. पी. एच. क्षीरसागर, डॉ. संजय चौधरी, डॉ. शुभांगी दामले, डॉ. महेंद्र भगत, डॉ. विजय पांडे, डॉ. कन्हाके, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. ए. यू. खाडे, केंद्र सहाय्यक दत्ता गिरी आदींनी त्याचा अभ्यासकेंद्रात गौरव केला. 

 सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय या अभ्यासकेंद्रांतर्गत मुक्त शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे कार्य नेटाने व जोमाने केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे याआधी मुक्त विद्यापीठाच्या 34 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल केंद्र सहाय्यक दत्ता गिरी यांना विभागीय केंद्राच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या अभ्यासकेंद्रात बीए, बीकॉमसह मराठी, इंग्रजी, इतिहास आणि उर्दू या चार विषयात एमए, एमबीए, एमकॉम, बीलिब आणि एमलिब सायन्स, मानवी हक्क प्रमाणपत्र, असे विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या सुरू असून, अ नामांकनाचा दर्जा असलेले हे अभ्यासकेंद्र आहे. वैभवने मिळविलेल्या या यशाबद्दल एसएमसी शिक्षण वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या