🌟राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांच्या पुढाकारातून ते कुटुंब गावात परतले....!


🌟कुटुंबीयांशी आयोगाचे सदस्य श्री.पारधी यांनी साधला संवाद🌟


फुलचंद भगत

वाशिम:-मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील अनुसूचित जातीचे सर्वच 42 कुटुंब गावातील जुने राजकीय वैमनस्य आणि विहाराजवळ फटाके फोडण्याचा घटनेवरून गावातील काही व्यक्तींकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे 15 डिसेंबर रोजी गाव सोडून गावापासून एक किमी अंतरावर सर्व मुलाबाळांसह राहायला गेले. जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गावात परतणार नाही असा निर्णय या कुटुंबीयांनी सामुहीकपणे घेतला.या घटनेची दखल घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज 19 डिसेंबर रोजी बोराळा गावापासून एक किमी अंतरावर एका ई-क्लास जमिनीवर वास्तव्यास असलेल्या या कुटुंबियांची भेट घेतली.या कुटुंबीयांना त्यांनी सुरक्षेची ग्वाही देऊन थंडीच्या दिवसात उघड्यावर मुलाबाळासह आता न राहता सर्वजण गावात जाऊन आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करावी आणि मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबावावे अशी विनंती श्री.पारधी यांनी त्या कुटूंबांना केली.श्री.पारधी यांनी पुढाकार घेऊन त्या सर्व कुटुंबांना सोबत गावात घेऊन आले.

              तत्पूर्वी श्री.पारधी यांनी या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक अनुज तारे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीलिमा आरज, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, मालेगाव तहसीलदार दीपक मुंडे व गटविकास अधिकारी कैलास घुगे यांची उपस्थिती होती.   

             श्री.पारधी यावेळी म्हणाले, कुटुंबीयांनी आता त्या आरोपींच्या दहशतीत न जगता मोकळेपणाने जगावे. त्यांच्याकडून यापुढे जर धमक्या देण्यात आल्या तर तात्काळ पोलिसांना त्याबाबत कल्पना द्यावी. गावात तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात येईल.त्यामुळे आता घाबरून जाण्याचे कारण नाही. गावातील ज्या विशिष्ट कुटुंबांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतचे सर्व दस्तावेज त्यांच्या घरी ठेवले आहेत ते तातडीने सर्व ग्रामपंचायतमध्ये परत करण्यास सांगण्यात आले.गावातील वातावरण खराब होऊ नये.समाजात एकोपा राहावा.आरोपीविरुद्ध चार्जशीट दाखल झाली आहे.कोर्ट न्याय करेल. आपल्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या खोट्या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल. मुलाबाळांचे भविष्य बघून आपण गावात जावे.पोलीस विभाग याबाबत दक्षता घेईल.आपल्यावर अन्याय होणार नाही याकडे अनुसूचित जाती आयोग लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

               शासकीय दस्तावेज त्या कुटुंबीयांच्या ताब्यात असेल तर ही गंभीर बाब असल्याचे सांगून श्री.पारधी पुढे म्हणाले,त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावा. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड देखील त्यांच्याकडे असल्याने ते सर्व नोंदणी जॉब कार्डधारकांना परत करण्यात येतील. कुटुंबांचे ग्रामपंचायतकडे असलेले सर्व दस्तावेज त्यांना परत केले जातील. तसेच राहत असलेल्या जागेच्या आठ-अ, सर्व सरकारी दस्ताऐवज देखील ग्रामपंचायतमध्ये जमा करून घेण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. पाच वर्षात त्या कुटुंबांनी जो गावाच्या विकास कामात गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी करण्याचे निर्देशित श्री.पारधी यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.गावात ज्या ज्या निधीतून विकास कामे करण्यात आली. त्याची देखील सखोल चौकशी करण्यात येईल. एका महिन्याच्या आत याबाबतचे सर्व अहवाल मागण्यात येईल.असे त्यांनी या  कुटुंबियांना आश्वस्थ केले.

         श्री.पारधी हे गावाबाहेर राहणाऱ्या या सर्व कुटुंबीयांना सोबत घेऊन गावात गेले. उपसरपंच विश्वास कांबळे यांची 18 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील काही व्यक्तींनी अपहरण करून हत्या केली.मयत विश्वास कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी लिलाबाई कांबळे यांची भेट घेऊन या घटनेची माहिती जाणून घेतली.त्यांचे श्री. पारधी यांनी सांत्वन केले.ॲट्रासिटी कायदयाअंतर्गत श्रीमती कांबळे त्यांना 4 लक्ष 12 हजार 500 रुपये मदत करण्यात आली. आज उर्वरित 4 लक्ष 12 हजार रुपये 500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्यांना 5 हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात येईल.रमाई घरकुल योजनेतून घरकुल बांधून देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्री.वाठ यांनी यावेळी दिली.विद्यमान उपसरपंच ईश्वर कांबळे यांच्या घरी श्री.पारधी यांनी भेट दिली.उपस्थित कुटुंबीयांशी संवाद साधून काही अडचण निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तसेच माझी मदत लागल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे पारधी यावेळी त्या कुटूंबियांना म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या