🌟बोराळा येथील अनुसूचित जातीच्या वस्तीत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात....!


🌟अनुसूचित जाती आयोग सदस्य सुभाष पारधी यांनी घेतला बोराळा प्रकरणाचा आढावा🌟

फुलचंद भगत

वाशिम :- बोराळा येथे काही कुटूंबांने स्वत:चे साम्राज्य चालवून मनमानी कारभार ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला दिसतो.त्यांनी अनुसूचित जाती व इतर समाजात देखील दहशत निर्माण केल्याचे दिसून आले.बोराळा येथील अनुसूचित जातीचे कुटूंब ज्या भागात वास्तव्यास आहे,त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिसून आलेल्या नसल्यामुळे तातडीने या वस्तीत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात.असे निर्देश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले. 

मालेगांव तालुक्यातील बोराळा येथील अनुसूचित जातीच्या कुटूंबियांनी गावातील आरोपींच्या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे 15 डिसेंबरपासून गावाबाहेर उघडयावर राहण्याचा निर्णय घेतला.आयोगाचे सदस्य श्री.पारधी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेवून आज सकाळी 11 वाजता बोराळा येथे भेट देवून त्या कुटूंबियांशी संवाद साधला.या कुटूंबियांना सोबत घेवून ते गावात गेले आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलीमा आराज,तहसिलदार दिपक पुंडे व गटविकास अधिकारी कैलास घुगे यांच्याशी आयोजित बैठकीत श्री. पारधी बोलत होते.

श्री. पारधी म्हणाले,बोराळा गावात पोलीस चौकी लावण्यात यावी.गावात सामाजिक सलोखा राहील यादृष्टीने काळजी घ्यावी.जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये असे प्रकार होत आहे का याची खात्री करावी.बोराळा येथे ग्रामपंचायतीचे दस्तावेज रोजगार हमी योजनेचे रोजगार पत्रक,जन्म मृत्यू नोंदणी तसेच इतरही कागदपत्रे आरोपीच्या कुटूंबाकडे असल्याचे अनुसूचित जातीच्या कुटूंबियांशी संवाद साधतांना त्यांनी सांगीतले.12 लक्ष रुपये बौध्द समाजाच्या स्मशानभूमिसाठी मंजूर झाले पण तिथे काहीच दिसले नाही.गावातील समाज भवन त्यांच्याच ताब्यात असल्याचे दिसले.अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष निधीचा वापर कशाप्रकारे करता येईल याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष दयावे. या गावात 5 वर्षात कोणकोणती विकास कामे झाली त्याचा अहवाल सादर करावा.घरकुल किती जणांना मंजूर झाली आणि किती जणांची घरकुले बांधून झाली याची देखील माहिती दयावी.जिल्हयातील अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये त्यांच्यासाठी मिळणारा निधी त्यांच्यासाठीच खर्च होतो का याकडे देखील लक्ष दयावे असे त्यांनी सांगीतले.

वरिष्ठांनी प्रत्यक्ष गावात जावून त्या कामांची पाहणी करावी.असे सांगून श्री. पारधी म्हणाले,शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. मात्र बोराळा येथे या वस्तीमध्ये सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही. या गावात विकास कामांवर खर्च झाला की नाही याबाबत समिती गठीत करुन अहवाल सादर करावा. सर्वांकडे रेशनकार्ड आहे का याची खात्री करुन त्यांना रेशन मिळते का हे सुध्दा बघावे. खरोखरच ज्या वस्तींसाठी निधी मिळतो त्या वस्तींसाठी तो निधी खर्च होतो का याची पडताळणी करावी. 15 दिवसात समिती गठीत करुन या गावातील संपूर्ण विकास कामांची चौकशी करुन 30 दिवसात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे अहवाल सादर करावा. गावात सामाजिक सलोखा राहीला तर गाव सुरक्षित राहील. जिल्हयात ज्या गावांमध्ये आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही याबाबतची देखील चौकशी करावी असे ते म्हणाले.

श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. अनुसूचित जाती उपयोजनेतून कोणकोणती कामे या गावात करता येईल याचे नियोजन करण्यात येईल. तेथील घरकुलांचा प्रश्न सोडविण्यात येईल. अनुसूचित जातीच्या वस्तीतील ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, अशा शेतकऱ्यांना मनरेगा विहीरीचा लाभ देण्यात येईल. रेशनकार्ड व रेशनचे वाटप व्यवस्थीत होत आहे का तसेच मंदिर प्रवेश कोणत्या गावामध्ये होत नाही हे सुध्दा बघण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.श्रीमती पंत म्हणाल्या, 15 व्या वित्त आयोगातून बोराळा येथे कोणती कामे घेतली आहे ते बघण्यात येईल. अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये रस्ते, पाणी व घरकुलाची कामे देखील करण्यात येतील. या गावात आरोग्याच्या दृष्टिने आयुष्मान शिबीराचे आयोजन करण्यात येईल. ग्रामसभा घेवून गावाच्या विकास कामांबाबत निर्णय घेण्यात येईल. 5 वर्षात या गावात कोणकोणती कामे व किती खर्च झाला आहे हे बघण्यात येईल. असे त्यांनी सांगीतले.

श्रीमती आराज यांनी बोराळा प्रकरणाची यावेळी माहिती दिली.18 फेब्रुवारी 2023 रोजी उपसरपंच विश्वास कांबळे यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली.या घटनेचा 7 दिवसात तपास पूर्ण करुन आरोपींना अटक करण्यात आली.यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली. यातील 1 आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.आरोपींकडून घटनेबाबत पुराव जप्त करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. यापुढे गावात कायम शांतता राहील याकडे पोलीस विभागाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगीतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या