🌟जय भिमचे तुफान व्हा : आता साता समुद्रापलीकडे ही लोक अभिमानाने 'जयभिम' म्हणू लागले....!


🌟प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ बहुजन नेते प्रकाश कांबळे यांचे प्रतिपादन🌟 


मराठवाडयातील परभणी जिल्ह्यातील पुर्णा जंक्शन या ठिकाणी झालेल्या मराठवाड्यातील पूर्णा,परभणी,अजिंठा,धम्म परिषदांचा मी साक्षीदार आहे या भव्य स्वरूपात झालेल्या धम्म परिषदानां थायलंड,श्रीलंका, ब्रम्हदेश,लद्दाख येथील बुध्द पर्यटक आणि भिक्खूनी आयोजकांचे निमंत्रण स्विकारून पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. इंग्रजी वगळता अन्य भारतीय भाषांचा त्यांना गंध नाही पण तरीही प्रत्येक परिषदेत हजारो-हजारो महिला आणि पुरुष परस्परांना 'जयभिम ' म्हणून अभिवादन करतात हे त्यानी हेरले. आणि परिषदेला संबोधित करण्यासाठी जेव्हा यापैकी जो पर्यटक, बौद्ध भिक्खु उठला त्या प्रत्येकाने 'जयभिम' म्हणून उपस्थितांना दोन्ही हाथ जोडून जेंव्हा जय भीम चा जयघोष केला तेव्हा माझे अंग-अंग शहारले. हृद‌याला भिडला तो त्यांचा जयभीम आणि हजारो-हजारों उपासकानी टाळ्यांच्या गजरात केलेला जयभिम आज ही माझ्या स्मरणातून जात नाही. आजही माझ्या मनात तो निनादतो तेव्हां खचितच भाऊसाहेब मोरे यांची आठवण येते. भाऊसाहेब तुम्ही हा आम्हाला कोणता मंत्र दिलात ज्याने भारतातील कोटी : कोटी लोक धन्य झाले. आणि साता समुद्रा पलीकडे ही लोक 'जयभिम' म्हणू लागले. भाऊसाहेब आपण दिलेले चार अक्षरांचे घोषवाक्य आज (जयभिम) कोट्यावधीच्या मुखात कृतज्ञतेने दररोज बोलले जाते तेंव्हा माझे डोके आपल्या चरणी नतमस्तक होते.आज              जयभिम ही आमची ओळख झाली आहे. आमच्या दैनंदिनीची सुरुवात जयभिमने होते. उगवत्या आणि मावळत्या सूर्य चंद्र आणि सर्व ग्रथ गृह ताऱ्यानां ऐकावा लागतो जयभिम ! जयभिम आहे तरि काय हो? जयभिम म्हणजे संवाद. जयभिम म्हणजे मनोमिलनाचा मंत्र ! जयभिम म्हणजे आमची ओळख ! जयभिम म्हणजे समतेचा पुरस्कार ! जयभिम म्हणजे माणूसकीला हुंकार ! जयभिम म्हणजे प्रज्ञा, करुणा ! जयभिम म्हणजे उर्जा ! जयभिम म्हणजे दया, क्षमा, शाती । जयभिम म्हणजे बौब्दांचा महामंत्र ! जयभिम म्हणजे आंबेडकरी जनतेचा स्वाभिमान ! जयभिम म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार आणि स्विकार ! जयभिम म्हणजे अस्पृश्यता, आत्मा, दैववादास नकार ! जयभिम म्हणजे हुकूमशाही, सरंजामशाही, विषमता आणि अन्याय आत्याच्याऱ्याना नकार ! जयभिम म्हणजे सम्पूर्ण मानसिक आणि भौतिक विकासदृष्टि ! जयभिम म्हणजे समानतेचा धागा ! जयभिम म्हणजे सदाचार, शिल ! जयभिम म्हणजे वैज्ञानिक दृष्टि ! जयभिमने आज विश्व आणि विश्वातील चल-अचल वस्तु आणि व्यक्तिंमधे जीव ओतला भाऊसाहेब, तो आता विश्वाचा ध्यास झाला आहे. व्यक्ती, कुटुंब आणि कदाचित एखादेवेळी समाजही संपेल पण जयभिम कधीच संपणार नाही. जयभिम 'अमर' झाला. 

                       राजे, महाराजे ,सरजांम आणि त्यांचे कुटुम्बिय त्यांची हुकूमशाही, सरंजामशाही कालांतराने संपल्याचा इतिहास आहे. पण जयभिम प्रत्येक काळात प्रेरणा देत राहील, तो अन्याय-अत्याच्याराच्या विरोधात, हुकूमशाहीच्या विरोधात मानवी मूल्यांसाठी लढणारे सूत्र जयभिम बनले. ते मानवतेची संजीवनी झाले. मृत्य वस्तु आणि शरीर कालांतराने नष्ट होते, पण संजीवनी कुठे मरते का? ती संजीवनी आहे जयभिम !भ. बुद्धना एकाने विचारले, भगवंत या जगात सर्वात महाग जागा कोणती ? भगवंत म्हणाले, 'आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो. ती जागा सर्वात महाग असते. तिची किमंत लावता येत नाही,' 'जयभिम' ने ही जागा घेतली. मनामनात रुजविली. ती विश्वाच्या कानाकोप-या पर्यंत पोहोचली, याचे सम्पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त भाऊसाहेब मोरे यानांच आहे. मराठवाड्यातील या भिम अनुयायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरानां समर्पित केलेले 'जयभिम 'घोषवाक्य क्षणाक्षणाला कोट्यावधींच्या मूखातून सदोदित उच्चारले जाते, यातच भाऊसाहेबांचे मोठेपण आणि स्मरण दडलेले आहे.

                    नामांतराच्या काळात महाराष्ट्र पेटला, चांदा ते बांदा सर्वत्र नामांतर विरोधकानी बौद्ध आणि दलितांना आपले लक्ष केले. अनेकांची घरे पेटवली, महिलांवर अत्याचार केले. दलितांच्या हाताशी आलेल्या पिकांत गुरं घुसवली, कित्येक  ठिकाणी उभी पिकं जकली, मोठे नुकसान केले. सार्वजनिक  पिठाच्या गिरण्या आणि पाणवठे दलितांना बंद केले. अनेक ठिकाणी मनुष्य वधही केले, त्याच्या झळा बाकी प्रांतापेक्षा मराठवाड्याला जास्त सहन कराव्या लागल्या तरिही मराठवाडा जातीयवाद्यांसमोर कदापि झुकला नाही. मला एक प्रसंग चांगला आठवतो, नांदेड जिल्हयात पोचीराम कांबळे ना जातीयवादी नराधमानी जीवंत जाकले. त्याला झाडाला बांधून त्याच्या शरीरावर तलवारीचे वार केले आणि सांगितले पोच्या राम-राम बोल, पोचीराम मात्र जयभिम-जयभिम 'ची घोषणा करीत होता. शरीरावर एकाएका वाराला जयभिम-च बोलत होता. त्याच्या रक्तातून निघालेला प्रत्येक थेंब आणि रक्ताने माखलेला मातीचा कण ऐकत होता. जयभीम.  पोचीराम कांबळेनी प्राण सोडतांनाची आरोळी होती 'जयभिम '! किती भिनला होता जयभिम पोचीरामच्या रक्तात ! किती स्वाभिमान आणि समर्पण आहे जयभिम मधे! तलवारीचे वार शरीरावर झेलतांनाही जयभिम आणि प्राण सोडतानाही जयभिम् ! किती रक्तात मिनला होता जयभिम् ! किती मनाशी एकरूप झाला होता जयभिम ! हे सहजासहजी होत नाही. हृढ़ निश्चय, निष्ठा आणि ध्येयवादाच्या केलेल्या संकल्पाशिवाय ते केवळ अशक्य. स्वतः साठी जगणारी माणसं मरतात, पण ध्येयाची एकनिष्ठ माणसं कधीच मरत नाहीत. ती अमर होतात. भाऊसाहेब जयभिमची आपण केलेली हवा- कधी वावटळ होवून घुमली आणि त्याचे कधी तुफान झाले कळलेच नाही.  शहीद पोचीराम कांबळे मराठवाड्याचा आणि आपणही मराठवाड्याचेच. पोचीराम कांबळेच्या शौर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाला तोड नाही तसे आपल्याही कर्तृत्वालाही तोड नाही. आपण तर जयभिम 'हे घोष वाक्य देवून तमाम आंबेडकरी-बौद्ध समाजात प्राण ओतले. पण मराठवाड्याचे मीठअळणी ,जय भिम हे घोष वाक्य देणाऱ्या भाऊसाहेबांबद्दल फारसे लिहीले गेले नाही. याची आजही खंत वाटते. मोरे कुटूाम्बंधाना तर ती नक्कीच वाटत असणार!

              आपला माणूस आपल्याला मोठा वाटतच नाही. हे दुःख आहे. आपले लेखक, कवि, विचारवंत, साहित्यिक यानी भाऊसाहेब मोरे त्यांचे कर्तृत्व आणि जयभिम 'वर आपली' लेखनी झिजवली पाहिजे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरानां कोण काय देणार? परतु भाऊसाहेब मोरे या मराठवाडयाच्या सपूताने बाचासाहेबांच्या ' भीम' या नावापुढे 'जय' हा दोन अक्षरी शब्द 'जय-भिम' चार अक्षरी करून समर्पित केला.त्याबद्दल सतत लिहीले गेले पाहिजे. ते फारसे लिहीले जात नाही. जे लिहीले जाते त्यात सातत्य नाही. या यांचे दुःख वाटते पाण्यातील माश्यांचे अश्रू कधी ढळताना दिसत नाहीत, ती मराठवाड्यातील भाऊसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आणि त्यांच्या  कुटुम्बिय आणि आप्तेष्ठांची झाली असावी, हे सांगायला नको. असे असले तरी जयभिम 'भारताच्या सिमा ओलांडून जगाभरात गेला याचे मानसिक समाधान मोरे कुटुम्बिना असणास्चं. ही समाधानाची शिदोरी त्यांच्या अंतीम श्वासापर्यन्त त्यानां लाभणार आहे.

            रोपटे लावणारा, बाग फूलविणारा माळी कुठे विचार करतो का, की त्याला त्या झाडांची सावली मिळेल आणि. रसाळ फळंही मिळतील? काटेरी रान तुडवित तो आपले कर्तव्य करीत राहतो. ते भाऊसाहेबानी मराठवाड्यात केले. निजामी सरांजामशाही आणि मनुस्मृतिने सांगितलेल्या चटक्यानी होरपळत असलेल्या दलित-पामरांची व्यथा बाबासाहेबाना दाखवावी, त्यांचे मराठवाड्यातील लोकानां दर्शन घडवावे यासाठी भाऊसाहेबानी प्रयत्न केले आणि- डॉ. बाबासाहेब आंबेडकराना मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या मक्रणपूर परिषदे साठी आणले. तेथे त्यानी मराठवाड्यातील लोकांची (दलितांची) कैफियत त्याच्यासमोर मांडली. ख-या अर्थाने मराठवाड्यात भाऊसाहेबांच्या प्रयत्नामुळेच क्रांती पर्वास प्रारंभ झाला, अंधश्रध्दा, गुलामी, गावकीची कामे, मेलेली जनावरे ओढणे आणि त्यांचे मांस खाणे आदि कुप्रथा संबंधि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  मक्रणपूर परिषदेत विवेचन करून या सर्व प्रथा बंद झाल्या पाहिजे असे प्रबोधन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केलेल्या प्रबोधनाचे लोन भाऊ साहेबानी आपल्या सहका-याना सोबत घेवून मराठवाडाभर बैठका, सभा घेवून पेरण्याचे काम केले. हे काम करताना नोकरीच्या बंधनामुळे फारसा वेळ मिळत नव्हता म्हणून त्यानी ध्येयआड येत असलेल्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित कार्याचे भार वाहक झाले. ध्येयाने प्रेरित झालेले लोकच क्रांति घडवू शकतात. डोक्यात एक आणि डोक्यावर दुसरेच अशा दुहेरी निष्ठेची माणसं क्रांतिला बाधक ठरतात. नव्हे ती समाज घातकीच असतात. अशा घातकी लोकांची संख्या वाढताना दिसते. अशा लोकानां समाजाने त्यांची जागा दाखविली पाहिजे नव्हे; त्याना ठेचूनच काढायला हवे. कुणाचीही टोपी घालून आंबेडकरवादी कसे होता येईल.? आर.एस.एस, भा.ज.पा आणि  तत्सम विचारधारेचे लोक हे विषमतावादी आणि आंबेडकर विरोधी आहेत अशा लोकांच्या सोबत बसून आपण आंबेडकर वादीच आहोत असे सांगणाऱ्या महाभागांबद्दल काय बोलावे ? ते समाजासाठी गद्दारच आहेत. समतेच्या, माणूसकीच्या चळवळीसाठी जे समर्पित झाले, त्यानां ते कलंकच आहेत. भाऊसाहेबानाही मिळाली असती मोठ्या हुद्ध्याची जागा, आमदारकी किंवा खासदारकी पण लाचारीने हे पद मिळविण्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानी वृति जोपासली. निजाम संस्थानात मिळालेली मोठी नोकरी त्यांनी त्यागली. खरे तर भाऊसाहेबाना मराठी, हिंदी, उर्दू, फारसी, तेलगु आणि कानडी भाषा चांगल्याच अवगत होत्या. फर्जा वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. त्याना कोणतेही - सन्मानाचे पद मिळणे सहज शक्य होते पण लाचारीने मिळणाऱ्या पदा पेक्षा स्वाभिमानी वृति जोपासने त्यांना महत्त्वाचे वाटले.  निजाम राजवटीत मिळालेली मोठी नोकरीही त्यांनी त्यागली.     फर्जा वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. त्याना कोणतेही - सन्मानाचे पद मिळणे सहज शक्य होते पण लाचारीच्यापदापेक्षा स्वाभिमानाची चळवळ जपणे महत्वाचे वाटले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी ते सावलीप्रमाणे, चिटकून राहिले. शरीर जिकडे सावली तिकडे अशा प्रकारे त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानां आणि जयभिम 'ला जपले. या मराठवाड्यातील कर्मवीर जयभिमकाराचे 'जयभिम 'विद्यापीठ व्हावे. यातून जयभिमचे काफिले बाहेर पडावेत. हा विचार मनाचा वेध घेतो. जयभिमचा पाऊस आंबेडकर जयंत्या, मोर्चे निर्देषणे, अन्यायाविरुध्द लढतानां बुलंद आवाजात धो-धो पडतो. तो भविष्यातील पिकांसाठी उपयुक्त ठरत नाही. ही जयभिमची वेदना संविधानाशी भिडावी. ती निधर्मी- व्हावी. तिला जातींची हवा मिळू नये. तिच्या ज्वालानीं आखिल मानव जातीचे सुख-शांती आणि समृद्धी होरपळून जाऊ नये. सोने ने सोनेच म्हणून ओळखले जावे. पितळे ला सोने म्हणणाऱ्याचे पितळ उघडे पडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिठावर वाढलेल्या लोकांची आज मोठी जबाबदारी वाढलेली आहे. बाबासाहेबांच्या निष्ठा जपणाऱ्या लोकांची तोंडे विष्ठे कडे वळू नयेत यासाठी प्रत्येकाने ध्यानी मनी जयभिम जपावा. यासाठी जयभिम चे तुफान व्हा !

                   (प्रकाश कांबळे) 

                    18-12-202

                   9423759667

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या