🌟सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनासाठी भरीव योगदान द्यावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟ध्वजदिन निधी संकलनास आजपासून सुरुवात🌟 


परभणी (दि. 06 डिसेंबर) : आपल्या देशाची सीमा सदैव संरक्षित ठेवण्यासाठी आपले शुर-वीर सैनिक प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत दिवस-रात्र सीमेवर आपले कर्तव्य निभावतात. सैनिकांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी 7 डिसेंबर हा दिवस देशभर सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. या ध्वजदिन निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजदिन 2024 निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सदाशिव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, संरक्षण दलाचे जवान हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगतो. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. मागील वर्षी जिल्ह्याला 35 लाख 45 हजार रुपयांचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 35 लाख 75 हजार इतका निधी आपल्या जिल्ह्याने संकलित केला आहे. संकलित करण्यात येणाऱ्या निधीचा वापर धारातीर्थी पडलेल्या तसेच अपंगत्व आलेल्या सैनिक, युद्धविधवा, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी वापरण्यात येतो. या निधीच्या माध्यमातून आपली देशाप्रती आणि आपल्या शुर सैनिकाप्रतीची भावना व आदर व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणून ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. पुढील वर्षाचे उद्दिष्ट देखील या महान कार्यासाठी वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी म्हणाल्या की, सन 1949 पासून प्रत्येक वर्षी 07 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. या दिवसापासून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात येत असतो. मागील वर्षी जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलासाठी 35 लाख 45 हजार रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच घटकांनी या निधीसाठी संकलन करून दिलेल्या उद्दीष्टापैकी 103 टक्के म्हणजेच रूपये 35 लाख 75 हजार इतका निधी संकलित केला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच वीर शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण  करण्यात आले. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मान्यवंराच्या हस्ते वीर माता-पिता आणि वीर पत्नीचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, वीर माता-पिता,वीर पत्नी, माजी सैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या