🌟पुर्णा तालुक्यातील वझुरच्या बळीराजांसाठी राबविला विशेष उपक्रम : सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजन....!


🌟माझा एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे वझुर येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन🌟

परभणी (दि.०६ डिसेंबर) :  मराठवाडा विभागांतर्गत अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या कृषिविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना सुचवण्यासाठी वनामकृविचे कुलगुरू डॉ.इंद्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे पुर्णा तालुक्यातील वझुर येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.

               याप्रसंगी मार्दर्शन करतांना सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, डॉ.जया बंगाळे यांनी अवकाळी पावसामुळे उद्भवलेली आव्हाने पेलण्यासाठी शेतकरी बांधवांनी स्वतःचे मनोबल  वाढविणे आवश्यक असल्याचे विशद केले. यासाठी शेतकरी बांधवांनी अचानक आलेल्या संकटामुळे निराश न होता अशाही कठीण  परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कृषि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले. याबरोबरच गावातील प्रगतीशील  शेतकर्‍यांच्या संपर्कात राहून आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

              यावेळी डॉ. विद्यानंद मनवर यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या विविध पिकांबाबत जसे तूर पिकातील फुलगळ व चट्टेगळ, शेंग पोखरणारी अळी, कपाशीतील बोंडसड तसेच हरभरा पिकातील मर रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी वनामकृवितील शास्त्रज्ञातर्फे शिफारस करण्यात आलेल्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. यानंतर गावातील डेअरी फार्म, रामेश्‍वर दूध संकलन केंद्र, अवनी फूडस् दालमिल आदी कृषिपुरक व्यवसाय केंद्रास भेटी देऊन व शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या  विविध अडचणी जाणून घेत त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या. याबरोबरच शेतकरी महिलांचे शेतीकामातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन योजनेअंतर्गत विकसित केलेले तंत्रज्ञान कापूस वेचणी कोट, सोयाबीन हातमोजे, हळद पिकासाठी उपयुक्त अवजारे आदींबाबत प्रा.ज्योती मुंडे यांनी प्रत्याक्षिकांद्वारे माहिती दिली.

                 या गावातील शेतकर्‍यांना यशस्वीरीत्या डेअरी फार्म चालविण्यासाठी तसेच त्यांच्या पशुधनाची काळजी घेण्याबाबत प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे या भेटीदरम्यान आढळून आल्याने त्यासाठी निश्रि्चत प्रयत्न केले जातील असे यावेळी प्राचार्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रगतीशील शेतकरी तथा उद्योजक रमेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी  नामदेव पवार, श्रीकांत शिंदे, भारत पवार, संतोष पवार, राहूल पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या