🌟हनुमान भक्ती म्हणजे संकटातून मुक्ती : धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे प्रतिपादन : परभणीतील हनुमान कथेस प्रारंभ...!


🌟पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीतील भव्य मंडपात अध्यात्मिक गुरु बागेश्‍वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या कथेस प्रारंभ🌟 


परभणी (दि.11 डिसेंबर) :  पवनसुत हनुमानाची भक्ती म्हणजे संकटातून मुक्तीचा मोठा मार्ग आहे, असे मत अध्यात्मिक गुरु बागेश्‍वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी परभणीत आयोजित केलेल्या तीन दिवशीय हनुमान कथेच्या सोहळ्यात सोमवार 11 डिसेंबर रोजी म्हणजे पहिल्या दिवशी व्यक्त केले.

            पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीतील भव्य मंडपात अध्यात्मिक गुरु बागेश्‍वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या हनुमान कथा सोहळ्या सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तीन दिवशीय कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पंडीत धीरेंद्र शास्त्री यांनी कथा सोहळ्यांचे महत्व अनन्य साधारण आहे, असे मत व्यक्त करतेवेळी भगवंतांची कथा ही ऐकलीच पाहिजे, तरच प्रत्येकाचे स्वास्थ्य राखले जावू शकते. त्यामुळेच भगवान कथा श्रवणाने विचारांचीसुध्दा मोठी शुध्दी होते, कथा मनःपूर्वक ऐकल्या पाहिजेत. त्याचे श्रवण केले पाहिजे. त्यातूनच चांगले बोध घेतले पाहिजेत. आचार आणि विचारात बदल केले पाहिजेत. त्यातच कथा श्रवणाचे यश दडलेले आहे.

            पवनसुत हनुमान कथेस असेच अनन्य साधारण असे महत्व आहे, असे स्पष्ट करतेवेळी पंडीत धीरेंद्र शास्त्री यांनी या हनुमान कथेस जे जे उपस्थित आहेत, ते खरोखरच भाग्यवान आहेत, असे म्हटले.  जो हनुमानाचा भक्त आहे, जो या कथेस हजर आहे त्याचे जीवन निश्‍चितच धन्य आहे, कारण हनुमान भक्ती हाच सर्वात मोठा भक्तीचा आणि परमार्थाचा मार्ग आहे. संपूर्ण विश्‍वात पवनसुत हनुमानजी हेच सर्वात मोठे वक्ते व श्रोते आहेत, त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक यशामध्ये हनुमान भक्ती हाच एकमात्र उपाय आहे. जो हनुमानजीचा भक्त आहे त्यास यश, प्रतिष्ठा निश्‍चितच आहे. हनुमान भक्ती म्हणजेच संकटमुक्तीचाही मोठा मार्ग आहे, असेही नमुद केले.

            हनुमान कथा म्हणजेच रामनामाचा गजर होय. प्रत्येकाच्या जिभेवर रामनामाचा जप असला पाहिजे. विशेषतः माता-भगिणींनी हनुमान व रामभक्तीचाच जप निश्‍चितच केला पाहिजे. कारण,  पुढची पिढी ही सुसंस्कृत घडावी या दृष्टीने प्रथम गुरु आईनेच पाल्यांमधून भक्तीचा मार्ग रुजविला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. हे कलयुग आहे. परंतु, या कलयुगातसुध्दा हनुमान नेहमीच भक्तीमार्गातून प्रगट होत आले आहेत. कथा सोहळ्यांमधूनसुध्दा हनुमानभक्तीचा प्रत्यय दिसून आला आहे. त्यामुळेच प्रत्येकाने कथा सोहळ्यांमधून सहभाग नोंदविला पाहिजे. भक्तीमार्गाचा अवलंब केला पाहिजे. सोहळ्या दरम्यान ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे. उपवास केला पाहिजे. चांगल्या मनाने, र्‍हदयाने कथा ऐकली पाहिजे, कथेचे श्रवण केले पाहिजे, कथा ऐकवली पाहिजे, असे ते म्हणाले.

* कामापुरताच मोबाईलचा वापर करावा :-

           सद्यस्थितीत माता-भगिणी आपल्या पाल्यांना संत-महंतांसह देवी-देवतांच्या कथा ऐकवित नाहीत. कारण, माता-भगिणीसुध्दा या युगात स्वतःच मोबाईलमध्ये गुंतल्या आहेत. घरात व्यक्ती असूनसुध्दा त्या घरात आहेत की, नाहीत इतपत या मोबाईलमुळे परिस्थिती उद्भवली आहे. परस्परांमधील संवाद, प्रेम, आस्था या मोबाईलमुळेच संपुष्टात आली असून आई आणि मुलांची नाते, संवादसुध्दा हळूहळू मोबाईलच्या माध्यमातूनच होतो आहे. त्यामुळेच आईचा मुलांवर, पाल्यांवर धाक राहीला नाही. अशी, खंत पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी व्यक्त केली.

* जो रामनाम गातो, तोच संसदेत जातो :-

          जो जो रामनाम गातो, तोच संसदेपर्यंत पोहोचतो, असे मत पंडीत धीरेंद्र शास्त्री यांनी या हनुमान कथा सोहळ्यादरम्यान व्यक्त केले. त्यामुळे कथा सोहळ्यांचे महत्व ओळखले पाहिजे. कथा सोहळे हे परमार्थाचा मोठा मार्ग आहे, हे समजले पाहिजे. परभणी परिसरात निश्‍चित रामभक्तांची मोठी मांदियाळी आहे. रामनामाने प्रत्येकजन एकमेकास जोडला गेला आहे, असे म्हटले.

* उद्या 12 वाजता दिव्य दरबार :-

           पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीतील भव्य मंडपात मंगळवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता अध्यात्मिक गुरु बागेश्‍वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा दिव्य दरबार भरणार आहे. त्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पंडीत धीरेंद्र शास्त्री यांनीच केले आहे.

* श्रीराम नामाच्या गजराने नगरी दुमदुमली :-

           श्रीराम जय राम जय जय राम या भजनाने या भव्य मंडपातील लाखो भाविक अक्षरशः तल्लीन झाले होते. यातील काहींनी रामनामाच्या या गजरात, निनादात धुंद होवून सुंदर अशी नृत्ये केली. बोलो श्री रामचंद्र महाराज की जय या जय घोषाने हा मंडप वारंवार दुमदुमला. विशेषतः रामचंद्र भगवान की जय, हरे राम हरे कृष्ण या भजनाने व जयघोषाने हा मंडप अक्षरशः दणाणला. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषानेही भक्तगणात उत्साह संचारला.

* उद्या 4 ते 7 कथा सोहळा :-

           अध्यात्मिक गुरु बागेश्‍वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराज  यांचा हनुमान कथा सोहळा मंगळवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत होणार असल्याची माहिती आचार्य धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या