🌟अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत : पालकमंत्री संजय बनसोडे


🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी🌟 


परभणी (दि.29 नोव्हेंबर) : परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊसामुळे परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत, सोनपेठ, सेलू तालुक्यातील सुमारे 1 हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात यावा. तसेच अवकाळी पावसामुळे बाधित शेतीपिकांचे येत्या दोन दिवसांत वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे तात्काळ नोंदणी करावी. जिल्ह्यातील कोणताही नुकासनग्रस्त शेतकरी हा नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. शासन सदैव शेतकरी बांधवाच्या पाठीशी असुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री संजय बनसोडे यांनी कळविले आहे.

त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून, आज पुर्णा तालुक्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जावून पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती...... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या