🌟आंतरराष्ट्रीय दयाळू दिवस विशेष : चारित्र्य चौफेर झळकविणारा दागिना.....!


🌟मानवाचे चारित्र्य दया नावाच्या निष्कलंक दागिन्यांमुळे चौफेर झळाळू लागते🌟 

कणव किंवा दयाळूपणा हा माणसाचा एक स्वभाव आहे. सद्गुण माणसास अलंकारासारखे सुशोभित करतात. दयाभाव आत्मसात केला की आपण आनंदी आणि हसतमुख राहू शकतो. त्यामुळे आपल्या आसपास नेहमी सकारात्मकता निर्माण होईल, शिवाय आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या जीवनाशी जोडू शकतो. बापू उर्फ श्रीकृष्णदास निरंकारी यांचा हा मार्गदर्शक लेख वाचकसेवेशी सविनय सादर... संपादक._

      मानवाचे चारित्र्य दया नावाच्या निष्कलंक दागिन्यांमुळे चौफेर झळाळू लागते. जो माणूस काया, वाचा आणि मनातून जीवजंतूवर दया व प्रेम करतो. त्या जीवजंतूंसह माणसेसुद्धा त्याच्यावर जीव लावतात. त्याचे ते शरीर सर्वांना सुख, समाधान, क्षमा व शांती प्रदान करणारे माहेरघर वाटू लागते. असे सर्वांशी स्नेहभाव ज्याचे जुळले त्याचे मनुष्यजन्म खरोखरच सार्थकी लागले, असे दासाला वाटते. संतवचन साक्ष देते-


    "दया क्षमा शांती! तेथे देवाची वस्ती!!"

       दि.१३ नोव्हेंबर हा जागतिक कणव अथवा दयाळू दिन म्हणून सन १९९८ सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे, माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. सद्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असतो. आपण आपल्या जगात इतके हरवलेले असतो की आसपास काय चालू आहे याचे, कित्येकदा आपल्याला भान नसते. आपण इतंराशी कसे वागतो याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. अनेकांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. त्यामुळे चिडचिडपणाची वृत्ती वाढत आहे. माणूस टेंशनमध्ये असला की एकाचा राग दुसऱ्यावर काढतो. त्यामुळे जवळचे व्यक्ती सुद्धा विनाकारण दुखावले जातात. त्यामुळे विनाकारण नकारात्मकरता आपल्यामध्ये निर्माण होत राहते. सांप्रतकाळी विश्वव्यापी संत निरंकारी मिशनच्या ज्ञानप्रवाहात स्वतःला झोकून दिल्यास आपसूकच आपल्या अंगी कणववृत्तीची रुजवण होते, हे मी आपल्या स्वानुभवाद्वारे व्यक्त करत आहे. संत निरंकारी जगताचे सुप्रसिद्ध ग्रंथकार संतश्रेष्ठ शहंशहा अवतारसिंहजी महाराज नेत्रांत अंजन घालतात- 

    "देह सभनां दी इक्को जेही इक्को रब संवारी ए। जात पात दे झगड़े काहदे काहदी लोकाचारी ए। हिंदू मुसलम सिख ईसाई इक्को रब दे बन्दे ने। बन्दे समझ के प्यार हैं करना चंगे भावे मन्दे ने।" (सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र.९-ख.)

   आपल्या सभोवती अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजांच्या पूर्ततेअभावी असहाय असलेली माणसे पुष्कळ आहेत. त्यांच्या विषयी थोडी थोडकी माणुसकी जागृत झाली पाहिजे. आपल्यामध्ये निर्माण झालेली ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला दयाळूपणा आत्मसात केला पाहिजे. रोजच्या जीवनात आपण कसे वागतो, बोलतो याकडे लक्ष द्यावे. नेहमी शांतपणे, नम्रपणे बोलावे. दयाळूपणा हा स्वभाव आहे. तो आत्मसात केला की आपण आनंदी आणि हसतमुख राहू शकतो त्यामुळे आपल्या आसपास नेहमी सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या जीवनात जोडू शकतो. आप-परभाव न करता सर्वांवर प्रेम, दया, माया आणि आपुलकी करतो, तोच साक्षात भगवंत असतो. जगद्गुरू संतशिरोमणी तुकारामजी महाराज म्हणतात-

      "जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।। दया करी जे पुत्रासी। तेचि दास आणि दासी। तुका म्हणे सांगो किती। तोचि भगवंताची मूर्ती।।"

      माणसाने दयाळूपणा जपताना स्वतःमध्ये वर्तनबदल आणले पाहिजे. सर्वात आधी स्वतः दयाळूपणा आत्मसात करावे. स्वतःसह इतरांसोबत दयाळूपणाने वागावे. प्राण्यांसाठी मनात दया ठेवावी. जे लोक आपली काळजी करतात, त्यांच्याशी आपुलकीने वागावे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करावी. आनंदी आणि हसतमुख असावे. चेहऱ्यावर नेहमी हलके स्मित ठेवावे. प्रत्येक व्यक्तींप्रती मनात नेहमी आदराची भावना असावी. कोणालाही कमी लेखता कामा नये. आपण काय बोलतो? यावर नियंत्रण ठेवावे. बोलताना आपले बोलणे मृदू असावे. समोरच्याचे म्हणणे ऐकूण घ्यावे. दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. रागावर नियंत्रण असू द्यावे. विनाकारण चिडचिड होऊ देवू नये, शांत रहावे. ताणतणाव आल्यास आपला आवडता छंद जोपासावा. गाणी ऐकावीत व पुस्तके नियमित वाचावित. एखादी व्यक्ती आपल्यावर चिडली असेल तर, त्या व्यक्तीला स्मितहास्य ठेवून सॉरी म्हणावे. कारण थोर विचारवंतांना दयाभाव हाच अख्ख्या विश्वातील सर्व धर्मांचे मूळ म्हणजेच माणुसकीधर्म असल्याचा आत्मानुभव आलेला आहे. संत निरंकारी मिशनचे युगदृष्टा सद्गुरू निरंकारी बाबा संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी म्हटले-

    "दया किसी पर तू भी कर ले दया तुझे जो चाहिये। दान क्षमा का तू भी दे दे क्षमा तुझे जो चाहिये। अपने लिए तू चाहता है जो सो औरों को देता जा। कहे 'हरदेव' सभी को सुख दे तू भी सुख को लेता जा।" (सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.५६)

     संपूर्ण दैवी सद्गुण व सदाचारासाठी संत निरंकारी मिशन जगात अग्रेसर आहे. या मिशनमध्ये सर्व ईश्वरभक्त जातपात, धर्मपंथ, गरीबश्रीमंत, काळागोरा, लहानमोठा, स्त्रीपुरुष, उच्चनीच किंवा आपलापरका आदी भेदभाव न करता प्रेमाने वागतात. कारण सर्व घटात एकच आत्मज्योत तेवत आहे, हे ते जाणतात. दया, माया, प्रेम, नम्रता, सहनशीलता, बंधुभाव, आपुलकी या सर्व भावनांची मुळे  ब्रह्मज्ञानात खोलवर रुजलेली असतात. जगात बहुतांश श्रीमंत व्यक्ती गरीबावर अन्याय करताना दिसतात. गरीबावर दया करण्याचा त्यांचा जणू काही जन्मच झालेला नसतो. त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण करण्याचा त्यांना परमेश्वराने वरदानच दिले असते की काय? कोण जाणे? अधिकांश अधिकारी व पदाधिकारी छोट्या कर्मचाऱ्यांना छोट्या मोठ्या कामासाठी लाच मागतात. अशांची खरेच कीव करावीशी वाटते. बिच्चारे कर्मचारी त्यांची कीव करतात. त्यांनी आपली गाय मारली, म्हणून ते त्यांचे वासरू मारत नाही. इतरांनी आपल्यावर केवळ दयाच करावी, असे सर्वांनाच वाटते. म्हणूनच प्रथमात प्रथम दयाळूपणा मला स्वतःला अंगिकारणे काळाची गरज आहे. आधी एखाद्यावर दया करून कसे वाटते बघाच. जीवनात काहीतरी कमविल्याचे समाधान वाटते, एकदम मस्त वाटते. जन्म सार्थक सार्थक झाले...! महान ग्रंथकार संतश्रेष्ठ तुलसीदासजी महाराजांनी कोरून ठेवले-

      "दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान! तुलसी दया न छोडियें, जबलग घट में प्राण!!"     

!! वर्ल्ड काईंडनेस्स डेच्या निमित्ताने समस्त बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

संत चरणधूळ -

                                बापू- श्रीकृष्णदास निरंकारी.

                               (आध्यात्मिक ज्ञान-विज्ञानाचे गाढे अभ्यासक व विश्लेषक.)

                                 द्वारा- श्री गुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ,

                                  मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.

                                  पो. ता. जि. गडचिरोली.

                                   फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.

                                   इमेल- krishnadas.nirankari@gmail.com

                                - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या