🌟महाराष्ट्र लोकसेवा आयोग-2024 च्या स्पर्धा परिक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर.....!


🌟आयोगामार्फत 16 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत🌟

परभणी (दि.28 नोव्हेंबर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे.

शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापिठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादीकडून आयोजित  करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेवून आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहेत. आयोगामार्फत 16 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहेत. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. जाहिरत केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये  महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे.वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या