🌟परभणी जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी वेळेत उपचार घ्या....!



🌟अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे आवाहन🌟 

परभणी (दि.10 ऑक्टोंबर) : परभणी जिल्हा लवकरात लवकर कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कुष्ठरुग्णांची नियमित तपासणी करावी तसेच त्यांना नियमित वेळेवेळी औषधोपचार द्यावेत. जेणेकरून जिल्हा कुष्ठरोगमुक्त करता येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले. 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन राज्य शासनाच्या धोरणानुसार वर्ष 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग हे उद्दिष्ट ठेवून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या  कृती आराखड्याचे आज अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहाय्यक संचालक डॉ. गजानन आईटवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. पंढरीनाथ लक्कमवाड आदी उपस्थित होते.  

    जिल्ह्यातील सर्व व्यक्तींची तपासणी करून लवकरात लवकर निदान करून वेळेवर पूर्ण उपचार देण्याच्या सूचना दिल्‌या. सन 2027 पर्यंत परभणी जिल्ह्यात कुष्ठरुग्ण निदान व उपचाराविना राहणार नाही याची दक्षता घेऊन जिल्ह्यात शून्य कुष्ठरुग्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी दिले.

   कुष्ठरोगाबाबत खालील लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करून कुष्ठरोग नसल्याबाबतची खात्री करून घ्यावी. शरीराच्या कोणत्याही भागावर न खाजणारा, न दुखणारा असा बधिर चट्टा किंवा चट्टे असल्यास, तांबूस किंवा पांढऱ्या रंगाचा व त्वचेच्या रंगापेक्षा फिक्कट असलेला चट्टा किंवा चट्टे, हातापायांना मुंग्या येणे व हातापायाला बधिरता येणे आणि कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा तेलकट व चकाकनारा दिसत असल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून कुष्ठरोग नसल्याचे निदान करून घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी केले आहे.  

     जिल्हा धोरणात्मक कृती आराखड्याचे विमोचन करताना अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, सहायक संचालक डॉ. गजानन आईटवार.... 

***** 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या