🌟परभणी जिल्ह्यातील लोकहिताची विकास कामे वेळेत पूर्ण करा - खा.संजय जाधव


🌟जिल्ह्यातील मातोश्री शेत पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत🌟


🌟ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा🌟

परभणी : ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना,  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांसह विविध योजनेंतर्गंत मंजूर लोकहितांच्या विकास कामांतील सत्यता तपासून पाहा तसेच ती कामे कोणाच्या ही दबावाला बळी न पडता वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव यांनी केल्या. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज आयोजित 'दिशा' समितीच्या आढावा बैठकीत खासदार श्री. जाधव बोलत होते. यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, महानगर पालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जीवराज डापकर यांची यावेळी उपस्थिती होती. 

लोकहिताची विकास कामे करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या कामासह इतरही कामे तातडीने सुरु करुन वेळेत पुर्ण करावीत. पाणंद रस्त्या अभावी शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागत आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पायाभूत सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पाणंद रस्ते हे गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे रस्ते असून, त्यांच्यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार संजय जाधव यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील कामामध्ये वर्षभरानंतरही कोणतीच प्रगती झाली नसून,  या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल खासदार श्री. जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या योजनेतंर्गत झालेल्या कामांची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरातील 71 झोपडपट्ट्यांचे  सर्वेक्षण करण्यासाठी कोणताच पत्रव्यवहार न झाल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.   

प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण‍ विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती खांडेकर यांनी यावेळी दिली.

केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील 5 हजार 542 बाकी असलेल्या घरांची नव्याने विगतवारी करा. त्यामुळे परिस्थितीचा नेमका अंदाज येईल, असे जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी सांगितले. जिल्ह्यात आवास योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांची संख्या किती आहे ? याबाबत खासदार श्री. संजय जाधव यांनी विचारणा केली असता, साधारणत: 20 हजार आवास योजनांतील घरांची आवश्यकता असल्याचे प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्वयं सहायता गट स्थापन झालेल्या पाथरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या बचत गटांना बँकांकडून निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचे श्री. जाधव यांनी विचारले असता, प्रकल्प संचालकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आयएफएससी कोडबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतू बचत गटांच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करुन त्यांना लाभ देण्यात येईल, असे श्रीमती खांडेकर यांनी सांगितले. 

यावेळी बैठकीत समितीचे अध्यक्ष श्री. जाधव यांनी राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, संजय गांधी निराधार योजना, डिजीटल भारत, सर्व शिक्षा अभियान आदी योजनांचाही यावेळी आढावा घेतला. 

महानगर पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेची कोणतीही माहिती दिशा समितीच्या अनुपालन अहवालासाठी सादर न केल्याबद्दल दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्री. संजय जाधव यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. 

यावेळी बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, ओमप्रकाश यादव, विशाल जाधव यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या