🌟परभणी जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त परभणी’ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन...!

 


🌟जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष🌟

परभणी (दि.५ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत ‘बालविवाहमुक्त परभणी’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी त्यांचे निबंध 17 सप्टेंबर 2023 पूर्वी पीडीएफ स्वरूपात dwcdopbn2023@gmail.com मेल वर पाठवण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल सुद-गोयल यांनी सुरू केलेल्या ‘बालविवाहमुक्त परभणी’ अभियानांतर्गत ही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जात आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला व बाल विकास आयुक्त प्रशांत नारनवरे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांच्या संकल्पनेतून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालविवाह :- एक सामाजिक कलंक, बालविवाह - बालकांच्या विकासातील अडथळा आणि मराठवाड्यातील बालविवाह - कारणे व उपाययोजना  हे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषय असून, ही स्पर्धा दोन वयोगटात विभागण्यात आली आहे. त्यामध्ये पहिला वयोगट 6 ते 18 हा शालेय स्तरील असेल.  तर दुसरा 18 वर्षापुढील राहणार आहे.  

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 5000 रुपये व प्रशस्ती पत्र, व्दितीय बक्षीस 3000 रुपये व प्रशस्ती पत्र, तृतीय बक्षीस 1000 रुपये व प्रशस्ती पत्र आणि चौथे प्रोत्साहनपर दोन बक्षीस प्रत्येकी 1000 रुपये व प्रशस्तीपत्र असे दोन्ही गटात दोन उत्तेजनार्थ बक्षीस राहणार आहे निबंध हा मराठी भाषेत स्वहस्तलिखित असावा. निबंधाची शब्द मर्यादा ही 1500 शब्दापर्यंत असावी. निबंध हा पीडीएफ स्वरूपात dwcdopbn2023@gmail.com मेल वर पाठवावा आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस हे वयोगटानुसार पहिल्या वयोगटासाठी तीन व दुसऱ्या वयोगटासाठी तीन व पहिल्या वयोगटातील प्रोत्साहनपर दोन बक्षीस व दुसऱ्या वयोगटातील प्रोत्साहनपर दोन असे दोन्ही वयोगटातील एकूण 10 विजेते निवडले जातील, असेही आयोजकांनी कळविले आहे. स्पधेत सहभागी होण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 पर्यंत निबंध पाठवावा. या स्पर्धेचा निकाल ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. 

निबंध स्पर्धेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकारी हे आयोजकांकडे असतील. निबंधासोबत वयाचा पुरावा म्हणून बोनाफाईड, टी. सी किंवा जन्माचा दाखला याची प्रत जोडावी, निबंधाच्या शेवटी स्वतःचे नाव, वय, संपूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. निबंध स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आम्रपाली पाचपुजे  (९६९७९७०३५८) आणि गजानन पटवे (७८७५२५१५७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या