🌟परभणी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती : भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ....! 🌟पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज चोरीच्या घटना🌟

परभणी (दि.०६ सप्टेंबर २०२३) : परभणी जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मागील अनेक दिवसांपासून भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसू लागले आहे.

           गेल्या काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यात खरीप पीके धोक्यात आली आहेत. काही भागात पिके अक्षरशः करपू लागली आहेत. काळ्या मातीत ही खरीप पीके अद्याप तग धरुन आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल म्हणून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. दुर्देवाने पाऊस पडलाच नाही. त्यामुळे दिवसागणिक स्थिती गंभीर होत आहे. त्याचेच साद पडसाद आता तीव्रतेने जाणवत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पूर्णा तालुक्यात धनगर टाकळी, सावंगी, कंठेश्‍वर वगैरे भागात गेल्या काही दिवसांपासून अनोळखी व्यक्ती विशेषतः महिलांचा वावर सुरु झाला असून या भागात किमान अर्धा डझन भुरट्या चोर्‍यांचे प्रकार घडले आहेत. एकाच रात्री दोन महिलांच्या अंगावरील दागदागिणे या भुरट्या चोरट्यांनी लंपास केले. भुरट्या चोर्‍यांसंदर्भात चुडावा, ताडकळस व पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत. त्यामुळे दुष्काळीसदृश्य स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर या घटना लक्षवेधी ठरल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या