🌟नामदेव धोंडो महानोर जयंती विशेष : मानाच्या जनस्थान पुरस्काराने सन्मानित....!


🌟निसर्गकवी महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्यांजवळील पळसखेेडा येथे १६ सप्टेंबरला झाला होता🌟

सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी आद.नानदेव धोंडो महानोरांच्या कवितेचे वेगळेपण सांगताना लिहिले आहे, “बालकवींची कविता काय किंवा बोरकर-पाडगावकर यांची कविता काय, ती निसर्गाच्या शहरी कौतुकापासून जन्माला आलेली आहे. आधुनिक शहरी संस्कृतीच्या काळात माणूस निसर्गापासून तुटला व त्याला निसर्गाची ओढ लागली. या ओढीतून आजची निसर्गकविता लिहिली-वाचली जाते. येथे महानोरांच्या कवितेत कवी हा रानाचाच जणू एक भाग बनला आहे. या रानाने त्याची संवेदनशीलता घडवली आहे व ती या रानाला एक अर्थपूर्णता देत आहे. हे रान शेतकर्‍याचे आहे. हे रान व शेतकरी दोघेही बीजारोपण, अंकुर संवर्धन व बीजरक्षण या निर्मितिचक्रात मग्न आहेत. या रानाची वेगळी रूपे म्हणजे या निर्मितीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत.” - प्रतिष्ठान, मार्च-एप्रिल १९६९. अशी ज्ञानवर्धक माहिती श्री एन.कृष्णकुमार जींच्या या लेखातून...  संपादक.

     निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्यांजवळ असलेल्या पळसखेेडा या गावी दि.१६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. पाचशे लोकवस्ती असलेल्या या आडबाजूच्या गावात तेव्हा शेतीला पर्याय असणे शक्यच नव्हते. महानोरांचे आईवडीलही शेतीच करीत होते. दुष्काळी आणि कोरडवाहू शेतकर्‍याच्या मुलाला तेव्हा शेतात राबण्याशिवाय पर्याय नव्हता. पुष्कळ धडपड करूनही शिक्षण न घेता आल्यामुळे महानोरही शेतीच करू लागले.

       शिक्षण घेताना वाचलेल्या कवितांनी महानोर झपाटून गेले होते. बालकवी, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर यांच्या कवितांनी त्यांना वेड लावले. शिक्षण सुटले, तरी हे वेड सुटेना म्हणून त्यांनी कवितांचे वाचन सुरूच ठेवले. शेती आणि वाचन या परस्परविरुद्ध गोष्टींनी महानोरांना एकाच वेळी झपाटल्यामुळे त्यांची ओढाताण होऊ लागली. शेवटी महानोरांनी दोन्हीही गोष्टींत जीव ओतला आणि एक नवाच मानदंड निर्माण केला. तेव्हाची त्यांच्या मनाची अवस्था त्यांनी पुढील ओळींत मांडली आहे-

     "गुंतलेले प्राण ह्या रानात माझे,

      फाटकी ही झोपडी काळीज माझे,

      मी असा आनंदुनी बेहोश होता,

      शब्दगंधे तू मला बाहूंत घ्यावे."

      महानोरांच्या आधीही, रविकिरण मंडळापासून शेताशिवराची कविता लिहिली जात होतीच. जे शेतापासून दुरावले आहेत किंवा ज्यांनी दुरूनच शेत पाहिलेले आहे, अशांच्या कवितेपेक्षा महानोरांच्या कवितेला अनुभवांचा जिवंतपणा लाभल्यामुळे ती वेगळी होऊन उमटली. अनुभवांच्या जिवंत उत्कटतेबरोबरच अभिव्यक्तीसाठी स्वीकारलेल्या लोकलयींच्या चिरंजीव सौष्ठवामुळे जाणकारांबरोबरच सामान्य मराठी वाचकांनाही या कवितेने वेड लावले. या पार्श्वभूमीवर सन १९६७साली प्रकाशित झालेला रानातल्या कविता हा महानोरांचा पहिलाच कवितासंग्रह मराठी कवितेतील त्यांचे स्थान निश्चित करणारा ठरला. त्याच्या वेगळेपणाची आणि वाङ्मयीन गुणवत्तेची दखल मराठी वाङ्मयविश्वाने मोठ्या आस्थेने घेतली. नंतर वही-१९७०, पावसाळी कविता-१९८२, अजिंठा-१९८४, प्रार्थना दयाघना-१९९०, पानझड-१९९७, गाथा शिवरायाची-१९९८, तिची कहाणी-२०००, जगाला प्रेम अर्पावे-२००५, गंगा वाहू दे निर्मळ-२००७ असे त्यांचे एकूण दहा कवितासंग्रह प्रकाशित झाले. महानोरांचे एकूणच काव्यलेखन मराठी कवितेला समृद्ध करणारे ठरले.

     सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी महानोरांच्या कवितेचे वेगळेपण सांगताना लिहिले आहे, “बालकवींची कविता काय किंवा बोरकर-पाडगावकर यांची कविता काय, ती निसर्गाच्या शहरी कौतुकापासून जन्माला आलेली आहे. आधुनिक शहरी संस्कृतीच्या काळात माणूस निसर्गापासून तुटला व त्याला निसर्गाची ओढ लागली. या ओढीतून आजची निसर्गकविता लिहिली-वाचली जाते. येथे महानोरांच्या कवितेत कवी हा रानाचाच जणू एक भाग बनला आहे. या रानाने त्याची संवेदनशीलता घडवली आहे व ती या रानाला एक अर्थपूर्णता देत आहे. हे रान शेतकर्‍याचे आहे. हे रान व शेतकरी दोघेही बीजारोपण, अंकुर संवर्धन व बीजरक्षण या निर्मितिचक्रात मग्न आहेत. या रानाची वेगळी रूपे म्हणजे या निर्मितीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत.” - प्रतिष्ठान, मार्च-एप्रिल १९६९.

     सन १९७२साली महानोरांची गांधारी ही कादंबरी प्रकाशित झाली. गांधारी नावाच्या मराठवाड्यातल्या एका गावाची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा जीवनपट चित्रित करणारी ही कादंबरीदेखील बरीच गाजली. नॅशनल बुक ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने तिचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला. हिंदीतही या कादंबरीला लोकप्रियता मिळाली. सन १९८२साली महानोरांचा गावातल्या गोष्टी हा कथासंग्रह प्रकाशित झाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथालेखनाची आठवण करून देणारा हा कथासंग्रह खास देशी वाणाच्या मराठी वाचकांच्या पसंतीस उतरला. महानोरांच्या एकूणच लेखनाला लोकसाहित्याच्या अभ्यासाची जोड आहे. याला पुष्टी देणारे, गपसप हा लोककथांचा तर पळसखेडची गाणी हा लोकगीतांचा, असे दोन संग्रह महानोरांनी संपादित केलेले आहेत, तसेच पुन्हा कविता-१९६७ आणि पुन्हा एकदा कविता-१९९० हे समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संग्रह महानोरांनी संपादित केलेले आहेत. गीतलेखन हाही महानोरांचा आवडीचा प्रांत आहे. ग.दि.माडगूळकर आणि शांता शेळके यांची दर्जेदार गीतलेखनाची परंपरा महानोरांनी आपल्या गीतलेखनाने पुढे नेलेली आहे. मुळातच असलेली त्यांच्या कवितेतली लोकगीतांची लय, गीतलेखन करताना त्यांना उपयुक्त ठरली. हृदयनाथ मंगेशकर आणि आनंद मोडक यांच्यासारख्या प्रयोगशील संगीतकारांच्या साथीने महानोरांनी मराठी चित्रपट गीतलेखनात नवे युग निर्माण केले. जैत रे जैत-१९७८, सर्जा-१९८४, एक होता विदूषक-१९९४, अबोली-१९९४, मुक्ता-१९९५, दोघी-१९९६, उरूस-२००८ या चित्रपटांसाठी त्यांनी केलेली गीतरचना तुफान लोकप्रिय ठरली. साचेबद्ध झालेल्या मराठी चित्रपट गीतलेखनाला महानोरांनी प्रवाही केले.

     जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांनी स्वतः रस घेऊन तयार केलेली माझ्या आजोळची गाणी ही महानोरांच्या कवितांच्या गायनाची ध्वनिमुद्रिकाही अशीच गाजली. अभिरुचिसंपन्न मराठी रसिकवर्गात ना.धों.महानोर या नावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्यांच्या सहवासात महानोरांचे आयुष्य घडले, अशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आठवणीपर ललित गद्यलेखनही महानोरांनी पुष्कळ केलेले आहे. शेतकरी दिंडी आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्यांविषयक लेखनातून महानोरांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शेतकरी दिंडी-१९८०, यशवंतराव चव्हाण-१९९०, ऐसी कळवळ्याची जाती-१९९४, जे रम्य ते बघुनिया-२०००, हा काळोखाचा रस्ता आपुला नाही-२००६), शरद पवार आणि मी-२००७ अशा काही पुस्तकांतून त्यांचे ललितगद्यलेखन संकलित आहे. शेतीविषयक माहिती देणारे गद्यलेखनही महानोरांनी पुष्कळ केलेले आहे. शेतीसाठी पाणी-१९८७, जलसंधारण-१९९२, फलोत्पादन-१९९२, ठिबक सिंचन-१९९२ अशी काही शेतीविषयक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. कृषिशास्त्राला अनुभवांची जोड देऊन केलेले हे लेखन शेतकरीवर्गात मोठी मान्यता पावलेले आहे. यांतील अनेक पुस्तके वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. शेतीच्या क्षेत्रातले कृषिभूषणसारखे पुरस्कारही महानोरांना मिळालेले आहेत. महानोरांचे एकूणच कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरचे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले आहेत. राज्यपालांनी आत्तापर्यंत त्यांची दोनदा विधान परिषदेवर नियुक्ती केली आहे. या बारा वर्षांत महानोरांनी शेती, साहित्य व संस्कृती या क्षेत्रांतले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडून आपल्या कामाचा विधायक ठसा त्यांनी सभागृहावर उमटविला आहे.

     महानोरांचे सर्वस्पर्शी कर्तृत्व लक्षात घेऊन सन १९९१साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब बहाल केला. सन १९९७साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पानझड या कवितासंग्रहास राष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. महानोरांना मिळालेल्या या दोन राष्ट्रीय सन्मानांमुळे एकूण मराठी कवितेचाच राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सन २००९चा मानाचा जनस्थान पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मराठवाडा साहित्य संमेलन, जलसाहित्य संमेलन, औदुंबर साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. मराठवाडा साहित्य परिषद, मराठी साहित्य महामंडळ अशा संस्थांची अध्यक्षपदेही त्यांच्याकडे अविरोध चालत आले. जागतिक मराठी अकादमी, साहित्य अकादमी, महाराष्ट्रराज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळ, चित्रपट महामंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ अशा ठिकाणी त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. तिथेही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. यंदा दि.३ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.



!! निसर्गकवी ना.धों.महानोर जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

श्री एन. कृष्णकुमार जी.

  गडचिरोली फक्त मोबा. 7775041086.


                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या