🌟गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन.....!


🌟 मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे प्रकाशन🌟

परभणी (दि.17 सप्टेंबर 2023) : राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.

येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रिटीश कालावधीत प्रथम परभणी जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) आवृत्ती सन 1967 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याच गॅझेटिअरची पुरवणी सन 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून त्याचे पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या परभणी जिल्हा मराठी गॅझेटिअरला 32 वर्ष झाल्याने याच जिल्हा गॅझेटिअरची पुरवणी काढून अमुलाग्र बदलांची संक्षिप्ताने नोंद घेवून मागील तीन दशकात लोककल्याणकारी गतिमान शासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विविध योजना व केलेल्या कामांचा आढावा घेणारी पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विशेष कामांची जाणीवपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. ही पुरवणी म्हणजे नवीन ग्रंथ नसुन सांख्यीकीय तक्त्यांच्या आधारे मूळ ग्रंथातील नोंदीनंतरचा टप्पा नोंदविण्यात आला आहे.  

परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीसाठी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या मार्गदर्शनात सहसंपादक श्रीमती सा.प्र. पिंपळे, संशोधन अधिकारी दि. वि. भगत, सहायक संशोधन अधिकारी श्रीमती स.सु. गोसावी आणि लघुलेखक वि. प. गुळगुळे यांनी मर्यादित वेळेत काम करुन ही आवृत्ती प्रकाशित केली आहे.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या