🌟शासकीय-निमशासकीय कार्यालयांत 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेला स्थान देऊन सन्मान व्हावा...!


🌟ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी🌟

परभणी : देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा आणि  महाविद्यालयात शासन धोरणानुसार अग्रक्रमाने लावल्या जातात. किंबहुना मराठी पत्रकारितेचे आद्य जनक 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा अन्य राष्ट्रीय महापुरुषांच्या बरोबरीने  सन्मानपूर्वक स्थानापन्न करुन तिचा आदर केला जावा, ज्यामुळे भावी सर्वच पिढ्यांना  'दर्पण'कारांच्या महतीचे ज्ञान अवगत होऊ शकेल, यासाठीची  आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा परभणी महानगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय वामनराव कराळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. 

        आपल्या देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या राष्ट्रीय महापुरुषांचा आदर्श देशभरातील नागरिकांच्या समोर सदैव ठेवला  जातोय. राज्य व देशासाठी त्यांनी  केलेलं उत्तुंग कार्य त्यांच्या प्रतिमांच्या माध्यमातून सातत्याने समोर आणलं जात असतं.  इतकंच नाही तर त्यांच्या त्या कार्याचा परामर्श कायम टिकून राहिला जावा यासाठी ते इत्यंभूत कार्य पाठ्यपुस्तकांमधूनही प्रकाशित केलं जातं. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि  नागरिकांसमोर अधोरेखित केलं जातं. ज्यामुळे संबंधित  महापुरुषांच्या प्रगत कार्यांला वारंवार उजाळा मिळत  असतो. किंबहुना त्याच भूमिकेशी बांधिलकी जपत शासनाने मराठी पत्रकारितेचे आद्य जनक 'दर्पणकार' तथा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सुध्दा सदर महापुरुषांच्या बरोबरीने स्थान देऊन त्यांचाही सन्मान वाढवावा. त्यांच्या कार्याच्या महतीला अधिक उंची मिळवून द्यावी. ज्यामुळे भावी पिढ्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते, ते निश्चितपणे उमगले जाईल. त्यांच्या कार्यालाही सदोदीत उजाळा मिळू शकेल व ते प्रत्येकाच्या स्मरणात ही राहिले जाईल, असा विश्वास व्यक्त करुन राज्य शासनाने महापुरुषांप्रति असलेल्या धोरणात किंचितसा बदल करावा आणि सद्यस्थितीत कोनाड्यात (म्हणजे प्रतिमा न लावलेले) असलेले बाळशास्त्री जांभेकर अधिकच उत्तुंग बनले जातील. नव्हे तर विद्यमान आणि भावी पिढ्यांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांप्रति अमुलाग्र असा वैचारिक बदल जाणवला जाईल, असे धोरण अंमलात आणावे. राज्य शासनाच्या वतीने ६ जानेवारीला पत्रकार दिनाच्या औचित्यावर भव्य असा 'पत्रकार दिन' सोहळा आवर्जून साजरा केला जातो. कांही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना  विविध पुरस्कार देऊन यथोचित सन्मानितही केले जाते. परंतु अशा सन्मानजन्य सोहळ्याचे स्वरुप केवळ मुंबईपुरतेच न राहता राज्यभरातील प्रत्येक जिल्हास्थानी तसे कार्यक्रम आयोजित करुन शासनाने त्या जिल्हा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण पत्रकारांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणे महत्त्वाचे ठरले जाईल. जेणेकरून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पूण्याईला महत्वाचे स्थान मिळून अधिकाधिक पत्रकारांनाही तशा कौतुकास्पद पुरस्कार सोहळ्यांमुळे नैतिक बळ मिळू शकेल. पत्रकारांच्या संरक्षणासाठी केलेले कायदे शासनाने अधिक कठोरपणे राबविले जाणे गरजेचे आहे तर आणि तरच बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळू शकेल, असे   सांगितले गेले तर ते चुकीचे ठरणार नाही अस मत दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केलं आहे. 

           राज्य व देशातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या व पूण्यतिथ्या शासनातर्फे प्रतिवर्षी साजऱ्या केल्या जातात. किंबहुना तसेच मागील काही वर्षांपासून बाळशास्त्री जांभेकर यांची सुध्दा जयंती व पूण्यतिथी शासनातर्फे साजरी केली जात आहे. ही बाब निश्चितच गौरवास्पद अशी म्हणावी लागेल. परंतु त्यामुळे म्हणावा तसा उजाळा जनमानसात होत नाही. केवळ पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधितांनाच तेवढे माहीत होतं असते. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. तर मग त्याच पत्रकारितेचे आद्य जनक असलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेच्या रुपाने का होत नाही परंतु देशपातळीवर कार्यरत सर्वच  कार्यालयांमध्ये त्यांनाही मानाचे स्थान मिळले जाणे महत्त्वाचे आहे. केवळ अपेक्षितच नव्हे तर अग्रहक्काचे आहे, असं बोललं गेल्यास मुळीच गैर होणार नाही. तद्वतच राज्य आणि देशातील सर्व शासकीय, निमशासकीय, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालयांमधून अन्य महापुरुषांचे सोहळे जसे साजरे केले जातात किंबहुना तसेच सोहळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याही जयंती व पूण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर महापुरुषांच्या बरोबरीने बाळशास्त्री जांभेकरांच्याही कार्याला अधिक प्रमाणात उजाळा मिळून विद्यार्थ्यांसह सामान्य जनांनाही त्यांची महती ज्ञात होणे गरजेचे आहे. त्यांच्याही कार्याला अन्य महापुरुषां प्रमाणे जोड मिळणे आवश्यक ठरणार आहे. किंबहुना त्यासाठीच मराठी पत्रकारितेचे आद्य जनक असलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा सुध्दा शासकीय, निमशासकीय, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती यासह कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या या व अशा सर्व स्तरातील कार्यालयांमध्ये सन्मानाने स्थानापन्न केली जावी. ज्यामुळे ते सर्वांनाच ज्ञात होऊ शकतील. त्यांच्या कार्याची महती अधिक प्रमाणात प्रकाशमय होईल, यात तिळमात्र शंका नसावी. 

        राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामाजिक आणि सर्वांगिण विकास विकासात्मक कार्यासाठी कर्तबगार आहेत. तळागाळातील नागरिक, विशेषतः महिला, दिव्यांग बांधव,  शेतकरी, कष्टकरी, मजदूर, आदिवासी, वंचित यांच्या प्रति त्यांना कमालीचा आदर आहे, जिव्हाळा आहे किंबहुना तसाच भावनिक आदर अन्य महापुरुषां प्रमाणेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रति सुध्दा निश्चितच आहे. त्यामुळे वरील प्रमाणे नमूद सर्व बाबींचा भावनिक दृष्ट्या विचार करुन माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरावर सर्वत्र आदेश द्यावेत आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा अन्य सर्व महापुरुषांच्या बरोबरीने लावण्यासाठी चे निर्देश द्यावेत, अशी आपणास आग्रही मागणी असल्याची विनंती दत्तात्रय कराळे यांनी केली आहे. आगामी पत्रकार दिनाच्या औचित्यावर म्हणजेच ६ जानेवारी २०२४ पासून सदरची प्रतिमा सन्मानाने स्थानापन्न केली जावी, अशी मनोमन इच्छा आहे. आगामी वर्ष निवडणूक काळाचे पर्व आहे. लोकसभा, विधानसभा, प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांसह  एकापाठोपाठ एक अशा सर्वच निवडणूका पार पाडल्या जातील. निश्चितपणे आपल्याला व शासनात सहकारी असलेल्या सर्वच घटक पक्षांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे आशीर्वाद निश्चितपणे मिळतील यात शंकाच नसावी......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या