🌟राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे परभणीत १२ ऑगस्टला आयोजन..!


🌟जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या विभागप्रमुखांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी 🌟


🌟अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित जिल्हा यंत्रणेच्या प्रमुखांना दिल्या 🌟

परभणी (दि.०२ ऑगस्ट २०२३): राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १२) ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या विभागप्रमुखांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित जिल्हा यंत्रणेच्या प्रमुखांना दिल्या. 

  येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. 

  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, महानगरपालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी राहुल देशपांडे, दादासाहेब थेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे व्यासपीठावर उपस्थित होते.   

परभणी येथे येत्या १२ ऑगस्ट रोजी 'शासन आपल्या दारी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, या अभियानांतर्गंत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्याचा या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे या अभियानात जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी सांगितले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जिल्हा संनियंत्रण समितीतील विभाग प्रमुखांनी योग्य समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी. पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्था अगदी चोख ठेवावी. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंचांना बोलावण्यात येणार असून, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे सरपंच आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी विविध विभाग राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी संबंधित विभागाने करावी. पोलीस यंत्रणेच्या चोख सुरक्षेसोबतच महावितरणकडून अखंड वीज पुरवठा सुरू राहील, याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना जिलहाधिकारी श्री. गावडे यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी आग प्रतिबंधक यंत्रणा, स्टेजवरील मुबलक जागा, मान्यवरांची राजशिष्टाचारानुसार बैठकव्यवस्था, माध्यम प्रतिनिधींची आसनव्यवस्था याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणेच्या विभागप्रमुखांना दिल्या.  

*

वृत्त क्र. 375                                                   दिनांक : २ ऑगस्ट, २०२३

योजनांच्या माहितीसाठी एकात्मिक आदिवासी

विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करावा

परभणी, दि. ०२ (जिमाका):आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गंत कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी त्या समाज माध्यमांवरून प्रसिद्ध करण्यात करण्यात आल्या होत्या. लाभार्थ्यांच्या यादीत त्रुटी होत्या. मात्र या त्रुटी पूर्ततेबाबत काही लाभार्थ्यांना संबंधित कार्यालयाव्यतिरिक्त इतर काही जण संपर्क साधत असल्यास त्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. त्रुटी पूर्ततेसाठी त्यांनी थेट एकातिम्क आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी येथे संपर्क साधावा. लाभार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये किंवा परस्पर कोणताही व्यवहार करू नये, असा कोणताही व्यवहार झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या