🌟'गंगाखेड शुगर्स' या आमदार डॉ.रत्नाकर गुट्टें यांच्या मालकीच्या साखर कारखान्या विरोधात ११ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा...!


🌟खा.संजय उर्फ बंडू जाधव यांचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना निवेदन : जिल्ह्यात राजकीय संघर्षाची नांदी ?🌟 

परभणी (दि.३१ आगस्ट २०२३) : परभणी शहरातील रस्त्यांच्या विकासा संदर्भात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रसार माध्यमातून केलेल्या प्रखर टिकेसह तत्पुर्वी पालकमत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या विकासनिधी वाटपाच्या भेदभावपुर्ण नितीतून पेटलेल्या सत्ता संघर्षाची ठिणगी आता गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीच्या 'गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पा' पर्यंत पडण्याची चिन्हे दिसू लागली असून खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे या 'गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्प'कार्यक्षेत्रातील शेकडो शेतकर्‍यांच्या केलेल्या फसवणूकीची गांभीर्याने चौकशी करावी व पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन देऊन 'गंगाखेड शुगर्स' विरोधात येणाऱ्या दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी गंगाखेड उपविभागीय महसूल कार्यालयावर शिवसेना (उबाठा) गटाकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. 

परभणी जिल्हाधिकारी श्री.गावडे यांना खासदार जाधव यांनी काल बुधवार दि.३० आगस्ट २०२३ रोजी सादर केलेल्या एका निवेदनात गंगाखेड शुगर्स या कंपनीचे अध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे व इतर संचालकांनी कारखान्याचे सभासद असणार्‍या शेतकर्‍यांकडून विविध योजनांचा लाभ व कर्ज मोठ्या प्रमाणावर मिळवून देतो म्हणत शेतकर्‍यांकडून त्यांचा सातबारा व इतर महत्वाची कागदपत्रे जमा केली. या कागदपत्रांच्या आधारे आमदार गुट्टे यांनी हजारो शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले व शेतकर्‍यांसह बँकांचीही फसवणूक केली. हा प्रकार २०१५ या वर्षापासून सुरु आहे. आमदार गुट्टे यांच्या विरोधात या अनुषंगाने अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. शेकडो शेतकर्‍यांना थकीत कर्जाबाबत नोटीसासुध्दा बजावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी कमालीचे आर्थिक संकटात सापडले आहेत, असे मत खासदार जाधव यांनी या निवेदनातून व्यक्त केले. कोणतेही कर्ज घेतलेले नसतांना आलेल्या बँकांच्या नोटीसांमुळे शेतकरी चक्रावला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येत परभणी जिल्हा आघाडीवर आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणातूनसुध्दा या सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यामुळेच गंगाखेड शुगर्सकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याकरीता ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता मोठा मोर्चा आयोजित करीत आहोत, असे खासदार जाधव जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे म्हटले.

           दरम्यान,यावेळी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) विशाल कदम,अतुल सरोदे, काशिनाथ काळबांडे, विलास अवकाळे, बाळासाहेब गरुड, बालाजी काळबांडे आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या