🌟निवडणूक आयोगाकडून ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन...!


🌟वृत्तपत्रविद्या व कला शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे  

परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२३) : राज्य निवडणूक आयोगाकडून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा आहे. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आली आहे.

युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, आणि लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार हे या स्पर्धेचे विषय असून, स्पर्धक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत.

जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक एक लक्ष रुपयांचे, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार रुपयांचे असून, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ही प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार, द्वितीय २५ हजार तर तिसरे १० हजार रुपयांचे असून, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तर घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार, दुसरे १५ हजार तर १० हजार रुपयांचे तृतीय आणि ५ हजार रुपयांची प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या